Monday, 15 September 2025

सुंदर, देखणे असे!

 व्याख्यात्या आदरणीय धनश्री लेले यांनी एका व्याख्यानाचा शेवट करताना कवी भा.ब. बोरकरांच्या एका कवितेच्या ओळी म्हणून दाखवल्या.

 व्याख्यानाच्या विषयाला पूरक कविता. विषय होता “ विवेकें विचारें अंतर श्रुंगारीजे”.

कविता किती अर्थवाही आहे हे अनुभवा. खरे देखणेपण कश्यात आहे हे ही जाणा.

 

लावण्य रेखा

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे

गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा

वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

 

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे

आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

 

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती

वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया

लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

 

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

 

प्रांजळ चेहरा असणे हे खरं देखणेपण गोरा आहे की सावळा याला मोल नाही.

सुंदर डोळे जे जगाचं दु:ख पाहून कारुण्याने दाटून येतात,. जशी आकाशात चंद्रप्रभा पसरते.

सुंदर ओठ तेच जे गोड मधुर बोलतात, त्याच्या मृदू भाषेमुळे सत्य कटू वाटेनाशी होते.

देखणे हात जे नवं मंगल घडवतात.

देखणी पाऊले जी ध्येय पथावर चालतात, जीवन पथावर आपला ठसा ठसा उमटवतात.

देखणे खांद्ये जे प्राणीमात्राच्या हितासाठी स्वेच्छेने सूळ वाहून नेतात.  

सुंदर जीवन तेच ज्यात सुख, समाधान, पावित्र्य फाकते, जसा चांदण्यातून शुभ्र प्रकाश पसरतो.

सुंदर मृत्यू तोच आहे, जो सूर्यास्तासारखा तेजस्वी असतो , अंधारात तेजस्वी वारसा सोडून जातो.  

Friday, 12 September 2025

संशय का मनी आला?

 

 

एका बाजूला क्षत्रियधर्म दुस-या बाजूला आप्तस्वकीय यामुळे   अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झाला आहे. संशय का निर्माण होतो?  कसा मनाला घेरतो याचं वर्णन माउलीने खालील ओव्यात केलं आहे आणि उपाय सांगितला आहे. फक्त ज्ञानाने संशयावर विजय मिळविता येतो. आजच्या भाषेत अभ्यासाने डाउट दूर करता येतो.

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरीं मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥१९६॥
एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला ? पण जो त्याच्या बद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. ॥१९६॥

जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचीं आरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असें फुडें । जाणों येकीं ॥१९७॥
अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्यावेळेला स्वभावत:च येते, त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे. ॥१९७॥

तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेसींचि माजे । तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥१९८॥
त्याप्रमाणे जो विषयसुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जातो, यात संशय नाही. ॥१९८॥

मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥१९९॥
जो संशयात पडला त्याचा नि:संशय घात झाला असे समज. तो इहपरलोकातील सुखाला मुकला. ॥१९९॥

जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानीं ॥२००॥
ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो ॥२००॥

तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । सशयीं तो नोळखे । हिताहित ॥२०१॥
त्याप्रमाणे खरे व खोटे, प्रतिकूल व अनुकूल, हित व अहित, ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. ॥२०१॥

हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥२०२॥
जन्मांध माणसाला  रात्र-दिवस ज्याप्रमाणे ठाऊक नसते त्याप्रमाणे मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. ॥२०२॥

म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसि ॥२०३॥
म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. ॥२०३॥

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥२०४॥
एवढ्याकरता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. ॥२०४॥

जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥२०५॥
जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा संशय मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. ॥२०५॥

हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥२०६॥
हा फक्त हृदयालाच व्यापून रहातो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ॥२०६॥

ऐसा जरी थोरावें । तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ॥२०७॥
एवढ जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल ॥२०७॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥२०८॥
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ नि:शेष नाहीसा होतो. ॥२०८॥

याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥२०९॥
एवढ्याकरता अर्जुना, अंत:करणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू, ॥२०९॥