Wednesday, 21 May 2014

यंगीस्तान

आपल्या सर्वाना जीवन आनंदी, प्रसन्न आणि सुखदायी असावे असे वाटते. वेद,उपनिषदा  मधून या विषयी चर्चा उपलब्ध आहे.  डॉ राजेंद्र बर्वे ह्यांनी  त्याची चर्चा मनमोराचा पिसारा या सदरातून दिलेली आहे.खचितच आपणास उपयुक्त   वाटेल.   
 
मनमोराचा पिसारा:         युवास्यात      -डॉ. राजेंद्र बर्वे

 
युवास्यात् साधु युवा, अध्यायक:
आशिष्ठो, दृढीष्ठो वसिष्ठ:
तस्येयाम् पृथ्वी वित्तस्य पूर्ण स्यात
एको मनुष: आनंद:
अध्ययनशील,सरळ वृत्तीचा, आशावादी, सुदृढ , दृढनिश्चयी तरूणा साठीच पृथ्वी वरील संपती/समृद्धी आहे. या गुणांनीच जीवनात साफल्य , संतोष येतो. या सर्व गोष्टींनी माणूस तरुण होतो. त्याला मानवी जीवनातला आनंद लुटायला मिळतो
A young man should have character, should be studious, full of hope, determination and strength. For him all this earth should be full of riches.

उपनिषदामधील अनेक श्लोकांमध्ये मानवी जीवनामध्ये उद्दिष्ट काय? माणसानं का जगावं? 'माणूस' म्हणून आपण कोण, अशा गहन आणि गंभीर विषयावर चर्चा केली आहे.परंतु, हे सर्व विचार प्रत्यक्ष जीवनाकडे पाठ फिरवीत नाहीत. त्यामुळे या श्लोकांवर चिंतन करताना पोट भरल्यावर आरामखुर्चीत बसून तत्त्वज्ञान चघळावे अशा वृत्तीने त्यांचा विचार करता येत नाही. उलट आपलं जीवन अधिकाधिक 'अर्थ'पूर्ण कसं करावं? व्यक्ती आणि समष्टी या जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत, याची जाणीव होते. प्रस्तुत श्लोकामध्ये समाजाचे आर्थिक जीवन, आनंदमय समाज आणि नेतृत्व यांचा अत्यंत सुंदर मिलाफ आढळतो. किंबहुना नेता कसा असावा हे सांगताना, समाज कसा असावा आणि नेत्याकडे कोणती जबाबदारी असावी, यावर नेमक्या शब्दात भाष्य केलेलं आहे.नेत्याची सहा प्रमुख लक्षणं इथे मांडलेली आहेत. नेत्यामध्ये तरुणाची ऊर्जा असावी. कारण अशा ऊर्जेशिवाय, 'पॅशन'शिवाय समाजामध्ये अभिसरण होत नाही. नेतृत्वाच्या जबाबदारीमध्ये निरलस परिश्रम करावे लागतात, त्यासाठी अखंड ऊर्जेची आवश्यकता असते. अशक्त, आजारी अथवा खंतावलेल्या पुढाऱ्याकडे पुरेशी शक्ती नसते.शक्तिमान असलेल्या व्यक्तीमध्ये अहंभाव निपजतो. आपल्या ताकदीचा गर्व निर्माण होतो. त्यामुळे असा शक्तिमान नेता सुस्वभावी असावा. त्याचं वागणं, बोलणं यातून सद्भावाचा पडताळा यावा.सद्वर्तनी, शक्तिमान नेता सुशिक्षित असावा. शिक्षणाच्या आधारे जगामधल्या घडामोडींचा अभ्यास करता येतो. विद्याभ्यासामुळे इतरांच्या अनुभवाच्या परिशीलनातून शहाणपणा अथवा प्रज्ञा जागृत होते.
सद्वर्तनी, सशक्त, सुविद्य नेत्यामध्ये आणखी तीन गुणांची जोपासना होणे गरजेचं असतं.अशा त्रिगुणसंपन्न नेत्याच्या मनात सदैव 'आशा' पल्लवित असली पाहिजे. आशादायी व्यक्ती प्रयत्नशील असते.समाजपरिवर्तनाकरिता समाजाला आशावादी करणं, हे नेत्याचं कार्य असतं. आशावादी समाज उद्यमशील असतो. ही आशा नेत्याच्या बोलण्यातून, वावरण्यातून समाजाला प्रतीत झाली की समाज विकासकार्याला कटिबद्ध होतो. आशावादी व्यक्ती कधीकधी आरंभशूर ठरतात. एखाद-दुसऱ्या अपयशानं, कळतनकळत घडलेल्या चुकांमुळे आशावादाचा फुगा फुटतो. आशावाद जिवंत ठेवण्यासाठी दृढनिश्चय महत्त्वाचा ठरतो. दृढनिश्चयी स्वभावामुळे नेता हार मानत नाही आणि समाजविकासाकडे वाटचाल करीत राहातो.

असा गुणसंपन्न नेता, सुदृढ असावा. तो ठणठणीत असावा. त्यानं आपल्या शरीर वमनाची प्रकृती उत्तम ठेवावी. अशा नेत्याकडे समाजाने आपला अर्थव्यवहार सोपवावा. कारण समाजाच्या उन्नतीकरिता लागणाऱ्या 'वित्ता'चे व्यवस्थापन भोळसट आदर्शवादावर चालत नसतं, त्याला चतुर, चाणाक्ष आणि चतुरस्र व्यवस्थापन लागतं. अशारीतीने जो समाज आणि नेता वावरतो, तो सर्वत्र आनंदी, प्रसन्न आणि सुखदायी जीवन फुलवतो.

Wednesday, 7 May 2014

३० टक्के लोकांची प्रगती होऊन हा देश सुधारणार नाही


३० टक्के लोकांची प्रगती होऊन हा देश सुधारणार नाही तर ७० टक्के लोक गावात राहतात त्यांनाही बरोबर घ्यावे लागेल असे प्रतिपादन श्रीयुत प्रदीप लोखंडे यांनी संजीवनी व्याख्यानमालेत  केले. ते पुढे म्हणाले शहरी व ग्रामीण भागाचा दुवा म्हणून रुरल रिलेशन हि संस्था काम करते. थोडक्यात ग्रामीण भागाशी   रिलेशनच्या माध्यमातून दुवा साधणारी संस्था म्हणून रुरल रिलेशन. सात राज्यातील ५८०० ग्रामीण  तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. तरुणांना माझे सांगणे आहे कि कुठलीही गोष्ट करताना त्याची माहिती घेतली पाहिजे , त्याच्या खोल वर गेले पाहिजे मगच समोर गेले पाहिजे. जेव्हा एक व्यक्ती दोनशे वेगवेगळ्या प्रकृतीच्य व्यक्तींना भेटते तेव्ह्या त्याचे व्यक्तिमत्व बदलते,गावातील तरुण हि बदलत आहे.
त्यांनी रुरल रिलेशन च्या वेगवेगळ्या उपक्रमाची महिती दिली. "अनिवासी गावावासी चळवळ" अतर्गत २००१ ते २००९ मध्ये २०००० शाळांना २८००० संगणक दिले. यात कोर्पोरेट  व सामान्य  लोकांचा  सहभाग लाभला.  तर " ग्यान कि " वाचनालय  अतर्गत  गेल्या दोन वर्षात १२५५ ग्रामीण माध्यमिक शाळेत वाचनालय उघडली. या वाचनालयात सर्व विषयाची  मिळून १८०-२०० पुस्तके दिली जातात आणि हा उपक्रम महिलांच्या योगदानानी  चालतो. पुढच्या वर्षी १००० वाचनालय सुरु करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. 

प्रसिद्ध लेखक श्री सुमेध रिसबूड यांनी प्रदीप लोखंडे यांची मुलाखत घेतली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संदीप म्हात्रे होते. प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख राजू नाईक यांनी करून दिली. सुत्रसंचलन कु. धनाली जोशी ह्यांनी केले तर कु नेहा पाटील यांनी  ईशस्तवन सादर केले.                      

Friday, 2 May 2014

आपण चित्र कसे पाहतो ?

नुकतंच श्री माधव आचवल याचं किमया हे पुस्तक वाचनात आले, रोजच्या जीवनात आपण कसे वागतो , एखाद्या गोष्टी कडे कसे पाहतो, सृष्टीतील नवनविनता पाहण्याची दृष्टी कशी हरवून बसतो याची छान जाणीव करून दिली आहे. हे पुस्तक  संवेदना , जाणीवा , सौंदर्याच्या प्रस्फुरणाची नव्याने ओळख करून देते. चित्र , शिल्प, वास्तु यांचा आस्वाद कसा घ्यायचा हे आपल्याला सांगते.  
पाहणे आणि दिसणे
आपला नेहमीचा अनुभव आहे कि , पुष्कळ वेळां रस्त्यातून जातांना अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत असतात, पण आपण त्या पाहतोच असें नाही बायकोबरोबर फिरून आल्यावर तिच्या पातळाचा रंग कोणता होता, हे छातीठोकपणे सांगू शकणारा नवरा हजारांत एखादा त्याचे कारण असें कि पाहणे हि क्रिया नुसतें दिसणे या पेक्षा पुष्कळ निराळी आहे. हे साध्या व्यवहारातील गोष्टीबद्दल झाले कलाकृतीच्या बाबतीत हि क्रिया फारच निराळी आहे. आपण कोणतीही कलाकृती पाहतो म्हणजे काय करतो? ती कलाकृती आणि आपण यांत एक विशिष्ट प्रकारचे नातें जोडतो. कलाकृती आपणाला अनुभव देतात तो सौदर्याचा, तो स्वीकारण्यास आपलें व्यक्तिमत्त्वही त्या दृष्टीने सिद्ध हवे.  म्हणूनच सौदर्याचा अनुभव हा जितका कलाकृतीवर , तितकाच बघणा-याच्या मनोभूमिकेवरही अवलंबून असतो. खरे म्हटले तर सौदर्याचा अनुभव हि माणसाची मुलभूत प्रेरणा आहे. पण सौदर्याला साद देऊ शकणा-या माणसाच्या मनावर व्यवहारातीले अनुभव घेताना जडलेल्या सवयीची बरीचशी राख जमलेली असते. कलाकृतीचा अनुभव घेतांना ती दूर करणें प्रथम आवश्यक आहे.
आपण चित्र कसे  पाहतो  ?
चित्र प्रथम जाणवते ते संपूर्ण आकृती म्हणून; एक निर्मिती म्हणून ती  जाणीव हीच चित्राच्या आस्वादाची सुरवात आणि शेवटही.    हि एकताच चित्रांतील सगळ्या घटकांना संचालित करीत असते, त्यांना एक भावविश्वाचा भाग करीत असते, स्वतंत्रपणे त्या चित्रातील रेषांना , रंगांना, आकारण 'अर्थ' नसतो असे नाही. पण तो अगदी प्राथमिक पातळी वरचा. चित्रातून साधलेले भासाविश्व कधी अशा प्राथमिक अर्थानाच जास्त गहिरे करते. बदलविते क्वचित अगदी निराळे करते. चित्र पाहताना घटकांच्या या स्वतंत्र जाणिवाशी आपला सबंध नसतो असतो तो ते  घटक एका भासाविश्वाचे भाग असतात याच नात्यांत.
ज्यांना सजगता वाढवायची आहे त्यांनी हे पुस्तक वाचायला हवं.