Wednesday, 13 July 2022

सिद्धार्थ -आपला आपला


नोबल पारितोषिक विजेते (१९४६) लेखक  हरमन्न  हेस यांची ,1922 मध्ये प्रकाशित झालेली " सिद्धार्थ" ही कादंबरी बुद्धाच्या सुरुवातीच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी तरुण ब्राह्मण सिद्धार्थच्या आत्मसाक्षात्काराच्या शोधाबद्दल आहे. आपले  आरामदायी जीवन आणि त्याच्या सभोवतालचे कठोर वास्तव यांच्यातील विरोधाभासा मुळे व्यथित, अस्वस्थ असतो. तो एका परीवज्रकाच जीवन जगतो  पण  विरक्त , अनासक्त  जीवन व्यतीत करून   मनःशांती मिळत नाही, अपूर्णतेची जाणीव त्रास देत राहते. उद्योग व्यापार करून एक सुखवस्तू जीवन ही जगतो परंतु जीवनात निराश होतो, त्या  स्थितीत  तो नदीकाठी  नावाड्याला भेटतो , त्याच्या पासून प्रभावित होतो, त्याच्या झोपडीत राहतो.  तिथे शांतपणे बसतो आणि शांततेत  स्व कडे प्रवास सुरू होतो, आपलं  अंतर्मन, आतील आवाज जाणवू लागतो. शेवटी,त्याला जीवनाच्या पूर्णतेचा आणि शहाणपणाचा अनुभव घेतो. जीवनाच्या परिपूर्णतेची अनुभूती येते.  

 

सिद्धार्थ हा मानवी जीवनातील गहन प्रश्नांशी निगडित असा स्वतः ला शोधण्याचा जीवन प्रवास आहे. 

या प्रवासातील काही वैचारिक टप्पे. विचार .. 

 

नदीच्या प्रवाहाचे एक गुपित आहे. पाणी सतत वाहत असते, प्रवाह कायम तोच असतो परंतु पाणी नित्य नूतन नवीन असते. हे कोण समजू शकेल, कल्पना करू शकेल.

 

खूप कमी लोकांना चांगल्या प्रकारे "ऐकता" येते. नदीने मला ऐकायला शिकवले, तुम्हालाही ऐकायला शिकवेल. नदीला सर्व काही माहीत आहे, तिच्यापासून  सर्व शिकता येते. एखाद्या गोष्टीच्या तळापर्यंत कसं जावंखोली पाहणे, स्वतःचं अस्तित्व मिसळवून टाकणे. 

 

नदी एकाच वेळी उगमस्थानी, पर्वतावर, धबधब्यावर, पठारात, महासागरात  सर्वत्र असते. ती फक्त वर्तमानात असते. भूतकाळाची, भविष्यकाळाची सावली तिच्यावर नसते. ती शिकवते  'काळ' असं काही नसतो.

शोधण्याची प्रामाणिक इच्छा असणारा साधक इतर कोणाची शिकवण घेणार नाही.  

ज्याला साक्षात्कार झाला आहे तो प्रत्येक ध्येयाविषयी , प्रत्येक मार्गाविषयी सहानुभूती दाखवेल. 

 

जेव्हा नदी किनारी बसतो तेव्हा नदी अनेक गोष्टी सांगत असते, मनात अनेक विचार तरंग येतात. विचारात एकात्मतेचि भावना जागृत होते. 

काही मिळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा डोळ्यासमोर घडणा-या अनेक गोष्टी कडे दुर्लक्ष होते. काही पाहू शकत नाहीत, काही शिकू शकत नाहीत. 

उपजत शहाणपण कोणालाही शिकवता, सांगता येत नाही. विद्वान माणूस जेव्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा विषय अधिक गहन होते.  ज्ञान देता येते परंतु शहाणपण नाही. 

काळ म्हणजे. अनंतकाळ आणि जग, दुःख आणि आनंद ,चांगलं आणि वाईट याना विभागणारी एक रेषा आहे. तो भ्रम आहे. 

प्रत्येक पापी माणसात  बुद्ध दडलेला असतो. त्याचा पाप्या पासून ते ब्रहम, निर्वाण , बुद्ध असा प्रवास ही निश्चित असतो. त्यासाठी लागणारा काळ अनिश्चित, अशाश्वत आहे.  

सखोल ध्यानाच्या वेळी  वेळ काळाची बंधन गळून पडणे शक्य आहे. एकाच वेळी भूत, वर्तमान, भविष्य काळाची जाणीव असणे शक्य आहे. सर्व काही चागंले आहे , सर्व काही परिपूर्ण आहे. सर्व ब्रह्म आहे. म्हणून, जे काही अस्तित्वात आहे ते चांगले आहे -  जीवन आणि मृत्यू , पाप आणि पुण्य, शहाणपण आणि  वेडगळपणा.

शब्दात सर्व काही सांगता येत नाही. अनेक अर्थ , अनर्थ निर्माण होतात. एखाद्याचे शहाणपण दुस-याला मूर्खपणाचे वाटू शकते. 

 स्मित गौतमाच्या हास्यासारखे परिपूर्ण, शांत, नाजूक, दयाळूकिंचित उपहासात्मक असावे.