Thursday, 26 April 2012

मसाला


वळू, देऊळच्या सुखद अनुभव नंतर आलेला मसाला पाहण्यासाठी बच्चेकंपनी बरोबर निघालो होतो. वाटेतच परिचित भेटले खबरबात झाल्या नंतर विचारले कुठे निघालास. त्यांना मसाला पाहण्यासाठी निघालो म्हटले तर तोंडाकडे अश्यातरेने  पहिले कि काय माणूस आहे?  मुलांना घेऊन सिनेमा पाहायला चालला आहे आणि तो सुध्दा मसाला या नावाचा. त्यांना माहित असलेल्या फिल्मी मसाला मुळे अशी प्रतिक्रिया होती.   त्यांना   वळू , देऊळ सारखे सुरेख चित्रपट देणा-या उमेश-गिरीश कुलकर्णी विषयी माहित नव्हते , नाही. त्यामुळे  त्यांची  प्रतिक्रिया बरोबर होती. त्यापेक्षा चित्रपट पहिल्यानंतर  आमचा गिरीश, उमेश विषयी  असलेला  विश्वास अधिक सार्थ  होता हे   कन्फर्म झाले. 
घरी येताना बच्चेमंडळीना विचारला कसा होता सिनेमा आणि काय आवडले. तर एक एक जण सिनेमातील एक एक घटनेबद्दल सागू लागले. रेवण ची  जशी सोडवणूक करून मेहता शेट मदत करतात  तशी रेवण व्यवसायात मोठा झाल्यावर दुस-याला मदत करतो.  एकानी  तर ठसक्यात संवाद म्हणून दाखवला आनंदसाठी नाही तर आनंदानी काम करतो. प्रयोगातील सततच्या  अपयशाबद्दल प्रतिक्रिया देताना.   शास्रज्ञ  सांगतात प्रत्येक वेळी नवीन काही शिकत असतो बूम!!. बूम अश्या प्रकारे आलं आहे कि अपयशा नंतर परत  नवे काही  करण्याची उभारी देणारं. रेवण आणि सारीकाची  कथा      सांगणारा चित्रपट. रेवण अल्पशिक्षित,  नोकरी करायची नाही तर धंदा  करायचा, त्यासाठी लागेल ती मेहनत करायची तयारी परंतु सततचे अपयश. देणी झाली कि एक गाव सोडून दुस-या गावी जाणे,  दुसरा धंदा असा एकंदरीत प्रवास. या सगळ्यात साथ देणारी हसतमुख सारिका. एकवेळ ठामपणे  रेवणला घेऊन मेहताशेट कडे जाते. मेहनत  आणि  अनुभवाने रेवण चे  शिकत जाणे, जसे  धंदा हा विश्वासावर चालतो व  विश्वास  माणूस ओळखून  त्यांच्यावर ठेवायचा असतो. उद्दिष्ट ठरवणे.( तुला काय व्हावयाचे आहे), कोणता धंदा करायाल हवा  अश्या अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे प्रसंग सिनेमात येतात. छोट्या छोट्या संवादातून  जीवनावर  भाष्य करणारे संवाद मसाला  अधिक  खुमासदार  करतात. 
 सर्वच  कलाकारांचा सहज सुंदर अभिनय हि बलस्थाने. एका वाक्यात वर्णन केल्यास सकारात्मक दृष्टीकोन देणारा सिनेमा असं  करता येईल.

Friday, 13 April 2012

कल्याणी बुवा


एप्रिल मध्ये नुकत्याच परीक्षा संपलेल्या असायच्या आणि परिसरातील यात्रेचा माहोल सुरु झालेला. तेव्हा कोणतीच यात्रा चुकवली जात नसे. यात्रेला जायची परवानगी पटकन मिळत असे. यात्रेत एकमेव कार्यक्रम म्हणजे हरी भक्त परायण ............  यांचे   सुश्राव्य  कीर्तन. त्याचा मात्र  कंटाळा. यात्रेच्या निमिताने टुरिग टाकीज मध्ये सिनेमे पाहिले जात. याच वेळी कधी तरी कल्याणी बुवा आपल्या परिसरात कीर्तना साठी आले आणि त्यांनी तरूणाना  कीर्तना कडे आकर्षित केले. त्यांच्या कीर्तनाला तरुण मंडळी गर्दी करू लागली.  कीर्त म्हणजे  गाणे,  गायन, हरीचे गुण गायन.  नारदीय , वारकरी, रामदासी व राष्ट्रीय असे कीर्तनाचे संप्रदाय  आहेत. कल्याणी बुवा हे रामदासी. 


कल्याण करी रामराया ..
 जनहित विवरी !!जनहित विवरी..!! कल्याण करी रामराया ..
तळमळ तळमळ होतची आहे ...
तुझा तूच सावरी ..दयाळा ...!! कल्याण करी रामराया ..
अपराधी जन चुकतची गेले ..
हे जन हाती धरी ..दयाळा ..!! कल्याण करी रामराया ..
कठीण त्यावरी कठीणचि जाले..
आता न दिसे उरी दयाळा.....कल्याण करी रामराया !!
कोठे जावे काय करावे ;
आरंभिली बोहरी ;दयाळा ....कल्याण करी रामराया !!
दास म्हणे आम्ही केले पावलो ..
दयेस नाही सरि...दयाळा ...कल्याण करी रामराया !! 


या नमनानी कीर्तनाला सुरवात होत असे.   राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय  राजकारण , राष्ट्रीय प्रश्न  या मुद्या वर पूर्वरंग रंगत असे दरम्यान  नामस्मरण , नंतर पुर्वारंगला अनुसरून  आख्यान. देवाकडे मागणे व आरती असा क्रम पाळला जात असे.
एकाच वेळी दोन दोन आख्यान घेण्याची कल्याणीबुवांची खासियत होती.  आक्रमकता , निर्भयपणा हा बुवांचा स्थायीभाव होता.   कीर्तन हे   लोकशिक्षण , जनजागृतीचे प्रभावी माध्यम. पुढील पिढी वर चांगले संस्कार करण्यासाठी संतसाहित्य , अभंग, भारुड ,कविता , फटके याचं गायन कीर्तनात होत असे. कल्याणीबुवांच पाठांतर अफाट होते. कवी आनंद फंदी चा  फटका त्यांच्या खूप आवडीचा होता. कित्येक  कीर्तनातून ते गायचे.   कसे वागावे ? ,काय पथ्य पाळावी?काय करावे ? काय करू नये? याच वर्णन या काव्यात आहे.
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको

नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको
 मायबापावर रुसू नको
तू एकला बसू नको
व्यवहारामधे फसू नको
कधी रिकामा असू नको
परी उलाढली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा; झटु नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको

हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
बहुत कर्जबाजारी हो‍उनी ओज आपुला दवडू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको

विडा पैजंचा उचलु नको
उणि तराजू तोलु नको
गहाण कुणाचे बुडवु नको
असल्यावर भिक मागू नको
नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा; भिड धरु नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको

दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको

आता तुज ही गोष्ट सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको

सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजनविण मरू नको

गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको
सत्किर्तीनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको

तरुणांना   नियमित  सूर्यनमस्कार, दंडबैठका घालण्याचा बुवांचा  आग्रह असे. कीर्तनाच्या दरम्यान   श्रोत्यांना    बोला महाराज असे आव्हान देत व दाद मागत. .  देवाकडे मागणे मागताना ते अखंड भारताची  कास धरत व कीर्तनाचा  उद्देश सांगताना   पाकिस्तान नाशार्थम नि शेवट करीत.