Monday, 3 October 2022

देवत्वाची प्रचीती

 

 

देव्हारे माजलेत, देव आहे, देव नाही अश्या मतमतांतरा च्या गलबलात कधीतरी  गीत - गदिमा ,  स्वर-संगीत सुधीर फडके यांच “देव देव्हार्‍यात नाही” हे गीत ऐकण्यात आलं आणि मनाला खूप भावलं. गदिमा नी फार सुरेख शब्दात, देवाच्या  अस्तित्वाच्या खुणा, ठिकाणं दाखवली आहेत.  कुठे शोधायला पाहिजेत हे ही दर्शवलं आहे. बाबुजींच्या स्वर सुरांनी तर कमाल केली आहे. असं हे देवाचं ठाव घेणारे गीत राहुल देशपांडेनी अलीकडेच गायलं आहे. ते युट्यूब उपलब्ध आहे. आपल्या गायकीतून, आलापातून, शब्दातून एक वेगळीच अनुभूती देतात. नक्कीच आनंद घ्या!

https://www.youtube.com/watch?v=FMyUEXLIPqQ

 

देव देव्हाऱ्यात नाही  

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही देव भरूनिया राही


देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही

 

गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - सुधीर फडके स्वर - सुधीर फडके चित्रपट - झाला महार पंढरीनाथ.  

Friday, 30 September 2022

वाचावे , कसे ?

 

 

व्यवस्थापन गृरू श्री रॉबिन शर्मा यांच्या मी कसा वाचतो, या मेलचे स्वैर रुपांतर. वाचनाची आवड असलेल्या मंडळीना नक्कीच आवडेल.



पुस्तक  जीवन समृद्ध करतात जीवनाचा स्तर उच्चावतात,  आणि जीवनाला नवनवीन आयाम देतात.

जेव्हा सर्व काही  मनासारखे  होत असते तेव्हा  चांगली पुस्तकं    सर्जनशीलता, कलात्मकता, उत्पादकता आणि आनंद द्विगुणीत करतात

जेव्हा गोष्टी,परिस्थिती  कठीण असते   तेव्हा पुस्तकं आशावाद जागवतात,  दिशा दाखवतात, जीवनरूपी खवळलेल्या  सागरात दीपस्तंभ बनून प्रकाश दाखवतात.

 पद्धतशीर पणे कसं वाचावं, काय उद्दिष्टे असावीत  याविषयी काही मुद्दे.  

 # सतत शिकणे,  

तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचे कौशल्य अथकपणे वाढवणे. त्यासाठी त्या क्षेत्राशी संबधित पुस्तकं वाचणे , विषयांच ज्ञान अद्ययावत ठेवणे, जेणेकरून तुमच्या विषयात पारंगत व्हाल.

#  पुस्तके जवळ ठेवा, चांगली पुस्तकं खरेदी करा.

घरात पुस्तकं असतील तर मुलं वाचतील, पुस्तकं आनंद, ऊर्जा, आशावाद याची स्त्रोत आहेत. कुटुंबात पुस्तकं वाचा, चर्चा करा ,ती आपल्याला अधिक सुसंस्कृत करतील.

# वाचन चौफेर असावे.

महान व्यक्तीची चरित्र वाचा. इतिहास, मानसशास्त्र,  तत्वज्ञान, सकारात्मक विचार देणारी चौफेर विषयावरील पुस्तकं वाचा. वेगवेगळ्या क्षेत्रातील पुस्तकं जीवनाला व्यापक दिशा देतील.  

# अनुक्रमणिका पहा , वाचा.

पुस्तक हातात घेताच त्याचं मुखपृष्ठ , मलपृष्ठ चा अभ्यास करा. अनुक्रमणिका पहा त्यातील विषयावर लक्ष केंद्रित करा. मलपृष्ठ, विषय, प्रस्तावना पुस्तकाची कल्पना देतील. सरावाने मेंदू तल्लख होण्यास मदत होईल. थोडक्यात पुस्तकाचे सार समजून घेण्याची बुद्धी विकसित होईल.  

 # खुणा करा , नोंदी ठेवा.  

पुस्तक सावकाश लक्षपूर्वक वाचा, खुणा करा, मोकळ्या जागेत नोंदी ठेवा. पुस्तकाशी, विषयाशी एकरूप व्हा, विचारावर, जीवनावर त्याचा परिणाम पहा, जीवन घडावा.  

 #  मनाचा कल पहा.  

 पुस्तकाचा  प्रभाव काही दिवस राहतो, ते चांगले बदल घडवतात ,कथा, कविता कल्पनारम्य गोष्टी रंजकता, रस निर्माण करतात. मनाचा कल पाहून आपल्याला जे आवडते, जे शिकायचे आहे त्याचं वाचन करावे

 # सारांश लिहून काढा.

पुस्तक वाचून झाल्यावर, पुस्तकाचे अंतरंग, आपले आकलन या विषयी लिहून काढा. लिहिण्याने विषय पक्का होतो.   

 #  काय शिकलो!

पुस्तकातून काय शिकलो, काय आत्मसात करायला हवं याचा आराखडा बनवा. त्यावर काम करा.

Sunday, 11 September 2022

सामान्यपणाचा अहंकार!

 

लोकसत्ता, रविवार दिनांक सप्टेंबर २०२२ च्या  लोकरंग मध्ये प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांचा सामान्यपणाचा अहंकार हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील काही अंश. जिज्ञासुंनी लेख मुळातून वाचावा.

काय म्हणतात मेहेश एलकुंचवार,

आमचा समाज अभिरुचीसंपन्न झाला, ना आम्ही उत्तुंग प्रतिभेची माणसे निर्माण झालेली पाहिली. महानतेची आम्ही वाटच पाहत आहोत, हे खरेच आहे.

दोष आपला आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत. आपले अग्रक्रम आपण कसे का ठरवतो, त्यात आहे. ‘आम्ही बाबा साधे, स्पार्टन लोक आहोत!’ असा पोकळ अभिमान ठेवता ठेवता आम्ही अभिजात होते ते तेव्हाही दूर लोटले की काय?

वाचावे, ऐकावे, पाहावे ही कोणाला गरजच वाटत नाही. मला शेकडय़ांनी कुटुंबे माहीत आहेत (उच्चशिक्षित, सधन, उच्चवर्णीय), की ज्यांच्याकडे दोन पुस्तके नसतात. एकही चित्रच काय, त्याचा प्रिंटही नसतो. अभिजात संगीत नसते. (एकेकाळीगीत रामायणअसे तो आमचा सांस्कृतिक मानबिंदू मानला जाई. आता तेही ऐकू येत नाही. आता फार सुंदर आवाज असलेली मुले-मुली गिटार घेऊन गाणी विव्हळत असतात. वाटते, की अरे, केवढा सुंदर आवाज.. पण शिकत का नाहीत ही गुणी मुले शास्त्रीय संगीत? असो. पुन्हा तो दुसरा विषय.)

संपूर्ण महाराष्ट्रीय समाजाची काहीएक सामूहिक अभिरुची आहे असे मला वाटत नाहीएकतर आपला समाज जाती, धर्म, वर्ण, सांपत्तिक राहणीमान यामुळे मुळातच विखंडित होता. आता तो शतखंड झाला आहे. एका तुकडय़ाचा दुसऱ्या तुकडय़ाशी संबंध आहे तो राग-द्वेषाचाच.

इथे मुळातच सगळे आपापल्या स्वतंत्र बेटांवर राहणार.. तिथे कसली आली आहे सामूहिक अभिरुची?

आपली अभिरुचीहीन असंस्कृतीकडे एवढय़ा वेगाने का वाटचाल सुरू आहे? याला कोण जबाबदार? कोठली धार्मिक, राजकीय, सामाजिक कारणे? मला कळत नाही.

पण सर्व विचार करणारी माणसे उदास उद्विग्न आहेत. हा काळोख लवकर दूर होईलसे वाटत नाही. कारण आपण अभिरुचीहीन आहोत असे कोणालाच वाटत नाही.

आम्ही आपले सामान्य! आम्हाला नाही कळत बाबा तुमचं ते!’ हे एवढय़ा आढय़तेने आम्ही म्हणतो!

सामान्यपणाचा एवढा अहंकार कशाला?

 

 link: 

https://www.loksatta.com/lokrang/musical-culture-of-maharashtra-transformation-in-marathi-literature-marathi-drama-zws-70-3108525/