Sunday, 11 September 2022

सामान्यपणाचा अहंकार!

 

लोकसत्ता, रविवार दिनांक सप्टेंबर २०२२ च्या  लोकरंग मध्ये प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांचा सामान्यपणाचा अहंकार हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील काही अंश. जिज्ञासुंनी लेख मुळातून वाचावा.

काय म्हणतात मेहेश एलकुंचवार,

आमचा समाज अभिरुचीसंपन्न झाला, ना आम्ही उत्तुंग प्रतिभेची माणसे निर्माण झालेली पाहिली. महानतेची आम्ही वाटच पाहत आहोत, हे खरेच आहे.

दोष आपला आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत. आपले अग्रक्रम आपण कसे का ठरवतो, त्यात आहे. ‘आम्ही बाबा साधे, स्पार्टन लोक आहोत!’ असा पोकळ अभिमान ठेवता ठेवता आम्ही अभिजात होते ते तेव्हाही दूर लोटले की काय?

वाचावे, ऐकावे, पाहावे ही कोणाला गरजच वाटत नाही. मला शेकडय़ांनी कुटुंबे माहीत आहेत (उच्चशिक्षित, सधन, उच्चवर्णीय), की ज्यांच्याकडे दोन पुस्तके नसतात. एकही चित्रच काय, त्याचा प्रिंटही नसतो. अभिजात संगीत नसते. (एकेकाळीगीत रामायणअसे तो आमचा सांस्कृतिक मानबिंदू मानला जाई. आता तेही ऐकू येत नाही. आता फार सुंदर आवाज असलेली मुले-मुली गिटार घेऊन गाणी विव्हळत असतात. वाटते, की अरे, केवढा सुंदर आवाज.. पण शिकत का नाहीत ही गुणी मुले शास्त्रीय संगीत? असो. पुन्हा तो दुसरा विषय.)

संपूर्ण महाराष्ट्रीय समाजाची काहीएक सामूहिक अभिरुची आहे असे मला वाटत नाहीएकतर आपला समाज जाती, धर्म, वर्ण, सांपत्तिक राहणीमान यामुळे मुळातच विखंडित होता. आता तो शतखंड झाला आहे. एका तुकडय़ाचा दुसऱ्या तुकडय़ाशी संबंध आहे तो राग-द्वेषाचाच.

इथे मुळातच सगळे आपापल्या स्वतंत्र बेटांवर राहणार.. तिथे कसली आली आहे सामूहिक अभिरुची?

आपली अभिरुचीहीन असंस्कृतीकडे एवढय़ा वेगाने का वाटचाल सुरू आहे? याला कोण जबाबदार? कोठली धार्मिक, राजकीय, सामाजिक कारणे? मला कळत नाही.

पण सर्व विचार करणारी माणसे उदास उद्विग्न आहेत. हा काळोख लवकर दूर होईलसे वाटत नाही. कारण आपण अभिरुचीहीन आहोत असे कोणालाच वाटत नाही.

आम्ही आपले सामान्य! आम्हाला नाही कळत बाबा तुमचं ते!’ हे एवढय़ा आढय़तेने आम्ही म्हणतो!

सामान्यपणाचा एवढा अहंकार कशाला?

 

 link: 

https://www.loksatta.com/lokrang/musical-culture-of-maharashtra-transformation-in-marathi-literature-marathi-drama-zws-70-3108525/


No comments:

Post a Comment