इहलोकाच्या प्रवासातून स्वर्ग प्राप्ती
होईल असं थोरामोठ्यांनी सांगितलं आहे. स्वर्ग कुठे लांब नाही, हे जीवनच स्वर्ग आहे.
माणूस पायाने चालतो तेव्हा ती
यात्रा होते, पण प्राणाने चालतो तेव्हा जीवन होते.
हे जीवन, हे समोर दिसणारं मरण आणि
याच्या मधलं गोंधळ कोलाहलाने भरलेले जगणं, सगळ्याला किती त्याचं त्याचं वलय आहे
ना! तुम्हाला नाही वाटत का की यावर आपण मनापासून प्रेम करायला हवं?
कारण खरा खुरा स्वर्ग तर
या जगण्याच्या धडपडीतच सापडणार आहे. सुखदु:खानं भरलेलं हे जीवन त्याच्यापासून दूर पाळण्यासाठी, त्याचा त्रागा करण्यासाठी नाही. तर
त्याचा प्रेमानं स्वीकार करण्यासाठी आहे. इतरांशी जोडलं जाण्यासाठी आहे.
पवित्र मंदिरांमध्ये, स्वर्ग शोधायाचा
नाही.
तुमच्या आजूबाजूला जिथे सेवा करण्याची संधी आहे तिथेच
स्वर्ग आहे. भोवतालच्या जगण्याचा सुखदु:खांसह स्वीकार करायचा. कारण स्वर्ग
गंगेच्या अल्याड, पल्याड तीरावर नाही तो इथेच आसपास आहे.
इहलोकाची थोरवी गाताना कवी बोरकर काय मागतात,
स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन् सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉइडाचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन् मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्यांशीत प्रवास हवा