Sunday, 17 May 2026

आपले बुध्दिमान सोयरे

 

आपले बुध्दिमान सोयरे – सुबोध जावडेकर, राजहंस प्रकाशन

प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का?    

त्यांना मन असतं का? भाषा भावना का?
स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का?

काही वेळा  प्राण्यांची हुशारी बघून आपल्यालाच आश्चर्याने तोंडात बोट घालायची पाळी येते. कधी कधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावून जातो.

हे सगळं ते उपजत प्रेरणेने करतात की विचारपूर्वक?

माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुद्धिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय?

मुंग्यांपासून ते हत्तींपर्यंत आणि चिमण्यांपासून ते चिंपांझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाचशे वर्षांत — विशेषतः वर्तनशास्त्र या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे.  त्या आधारे या प्रश्नांचा छडा घेणारं हे पुस्तक.
 

बुध्दीमत्ता कशाला म्हणायचं ?  या प्रश्नाचं उत्तर सोप्पं नाही. काही तत्ववेत्या च्या मते  निर्णयक्षमता, उपक्रमाशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता, परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुध्दीमत्ता.

सुसंगतपणे विचार करण्याची, योजना आखण्याची, समस्या सोडवण्याची, अमूर्त पातळीवर विचार करण्याची, जटिल कल्पना समजून घेण्याची, नवीन गोष्ट पटकन आत्मसात करण्याची, अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुध्दीमत्ता.

संशोधक , अभ्यासक हॉवर्ड गार्डनर यांनी सिध्दांत मांडला आहे. ते म्हणतात बुद्धिमत्ता एकाच प्रकारची नसून तिचे अनेक प्रकार आहेत. नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता त्यांनी कल्पील्या आहेत. प्रत्येक माणसात या सर्व बुद्धिमत्ताचं कमी अधिक प्रमाणात मिश्रण असते.

१ तार्किक आणि गणिती बुद्धिमत्ता (Logical-Mathematical Intelligence) : तर्कशुद्ध विचार करायची क्षमता व हिशेब करायची क्षमता.

२ सांगीतिक बुद्धिमत्ता (Musical Intelligence) : सुरांची जाण असणं, लयीचा अचूक अंदाज असणं आणि संगीतातील सौदर्याचे आकलन होणे.

३ अस्तित्ववादी बुद्धिमत्ता (Existential Intelligence) : माणसाच्या अस्तित्वाबद्दल विचार करायची क्षमता,  या जगात का आलो, कुठून आलो, जगण्याचा अर्थ काय? जीवन, मृत्यू, विश्व, आत्मा, ईश्वर, अस्तित्व यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा विचार करण्याची क्षमता.

 भाषाविषयक बुद्धिमत्ता (Linguistic Intelligence) : भाषेचा वापर करण्याचे कौशल्य, भाषेतले बारकावे-खचाखोचा समजून घेण्याची क्षमता.

५ शारीरिक हालचालीशी संबंधित बुद्धिमत्ता (Bodily-Kinesthetic Intelligence) : मन, शरीर यातील ताळमेळ वस्तु हाताळण्याचे कौशल्य ..

६ स्वत:ला ओळखण्याची बुद्धी (Intrapersonal Intelligence) : मनातील विचार , भावना जाणून घेण्याची क्षमता.

७ दुस-याचं मन जाणून घेण्याची बुद्धिमत्ता (Interpersonal Intelligence) : दुस-याशी संवाद साधण्याची क्षमता. इतरांबद्दल संवेदनशीलता. त्याचे विचार समजून घेण्याची क्रिया. इतरांच्या भावना, हेतू, स्वभाव आणि वर्तन समजून घेण्याची क्षमता.

  अवकाशाशी संबंधित बुद्धिमत्ता  (Spatial Intelligence) : अवकाशाचं भान, त्रिमीतित विचार करायची क्षमता. चित्र, आकार, दिशा, अवकाश आणि प्रतिमा यांच्या माध्यमातून विचार करण्याची क्षमता.

९ निसर्गाशी संवाद साधायची क्षमता (Naturalistic Intelligence) : संजीव निर्जीव, निसर्गातील घटक, वनस्पती, प्राणी, पर्यावरण यांचे निरीक्षण व वर्गीकरण करण्याची क्षमता.

प्राण्यांच्या बुध्दीमत्तेबद्दल विचार करताना, त्यांच्याकडे असलेली उपजतबुध्दीचा  विचार करायला हवा. काही सूचना त्यांच्या मेदूत कोरलेल्या असतात ते समजून उमजून विचारपूर्वक वागत नाहीत तर मेंदूतील सूचनेप्रमाणे त्यांचं वागणे असते.

आनंद, राग, प्रेम, दू:ख  या भावना प्राण्यात असतात. त्यांना रागावताना, घाबरलेले, दू:खी होताना, खुश होताना आपण पहातोच.  

वरील बुध्दीमत्तेच्या वर्गीकरणाच्या कसोट्या वर  कीटक, सरपटणारे प्राणी, कावळे, इतर पक्षी, पाळीव प्राणी व्हेल, डॉल्फिन्स, कपी चिपांझी यावर करण्यात आलेल्या प्रयोगाची माहिती खूपच उद्बोधक आहे. त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. या प्रयोगांच्या विडिओ लिंक जागोजगी दिल्या आहेत. आपण त्या पाहू शकतो.

कपीकुलातील प्राणी  म्हणजे मानवसदृश प्राणी. यात बोनोबो, चिपांझी, ओरांगउटान आणि माणूस आशा पाच प्रजाती येतात. माणसाप्रमाणे यांना बोलता येत नाही परंतु भाषा समजते असे प्रयोगाने जाणवले आहे.  

बोनोबो  आणि चिपांझी चा डीएनए जवळपास ९८.५ टक्के माणसाच्या डीएनएसारखा असतो.

उत्तम बुध्दीमत्ता असलेल्या प्राण्यांमध्ये तीन गोष्टी असतात. मोठं आयुष्यमान (३०-४० वर्षे) अनुभवातून शिकण्याची क्षमता, समूहानं राहण्याची जीवनशैली.

प्राण्यांचं वर्तन , उपजत बुध्दी , आईबापांनी दिलेले ज्ञान, स्वतंत्र विचार करायची शक्ति यानुसार होत असते.

गेल्या काही वर्षात प्राण्यांच्या बुध्दीमत्तेसंबंधी संशोधनला विलक्षण गती आली आहे. डोकं चक्रावून टाकणा-या गोष्टी समोर येत आहेत. गैरसमज दूर होत आहेत. नवीन उत्तरं मिळत आहेत.


Friday, 8 May 2026

चांगुलपणा म्हणजेच देवपण.

 चांगुलपणा म्हणजेच देवपण.

 श्री.यजुर्वेंद्र महाजन . (संस्थापक दीपस्तंभ फाऊंडेशन.)      


चांगुलपणा म्हणजेच देवपण, आणि चांगुलपणा आपल्या सर्वात असतो. असे प्रतिपादन  दीपस्तंभ फाऊंडेशन, मनोबल प्रकल्पाचे संस्थापक श्री यजुर्वेंद्र  महाजन  यांनी संजीवनी व्याख्यानमाला २०२६ मध्ये  " चांगला माणूस घडताना”  या विषयावर बोलताना केले. अध्यक्षस्थानी टीआयएफआर मधून निवृत्त झालेले वरिष्ठ विज्ञान अधिकारी श्री. मनोज नाईक होते.   

यजुर्वेंद्र मास्तरांनी चांगला माणूस म्हणजे काय यावर संवाद साधला. या संवादातून एक एक मूल्य, गुण  उलगडून सांगितला. मानवी जीवन आपल्याला लाभलं आहे हे सर्वांत महत्त्वाचे. नातेसंबंध विषयी बोलताना म्हणाले  आजकाल आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसाचा वापर करतो. खरंतर  माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि वस्तूचा वापर. चांगला माणूस होण्यासाठी  आदरभाव, नम्र, प्रेमळ, संवेदनशील, सेवाभावी आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे. चांगला माणूस घडण्यासाठी आपण कुटुंब, समाज म्हणून काही योजना, नियोजन करतो का?  चांगल्या माणसाला महत्व द्यायला सुरवात करा, त्यांचा आदर करा, वाईटाला वाईट जर म्हटलं नाही आणि समाजाने चांगल्या माणसाला उत्तम वागणूक दिली नाही तर तुम्ही  भविष्यासाठी वाईट समाज निर्माण करत आहात. जीवन मूल्यांची अशी विशेषता आहे की, ती दिली की वाढतात, प्रेम दिलं की प्रेम मिळतं, आदर दिला तर आदर मिळतो, मदत केली तर मदत मिळते.  



दीपस्तंभ फाउंडेशनच्या कार्याला सुरवात कशी झाली हे सांगताना जीवनात चांगले मित्र असणे महत्त्वाचे आहे. माझा मित्र मला स्वामी विवेकानंदांवरील व्याख्यानाला घेऊन गेला. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकाल. जो विचार सातत्याने कराल ज्याच्यावर विश्वास ठेवाल, संपूर्ण झोकून द्याल (समर्पण) तेच तुमच्या  जीवनात घडते. तिथून माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. २५ व्या वर्षीच अत्यंत गरजू आणि गरीब लोकांना उत्तम,दर्जेदार (Quality Education ) शिक्षण देण्याचा संकल्प केला आणि  संस्था स्थापन केली जी आता   सर्वसमावेशक, सर्वांना खुली आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते. संस्था १४ प्रकारचे अपंगत्व तीन प्रकारचे अनाथ, दोन ट्रान्सजेंडर, आदिवासी, आर्थिकदुर्बल घटकांसाठी खुली आहे. आज या संस्थेतून महाजन मास्तरांची मुलं क्लासवन, ऑफिसर, बँक ऑफिसर, आयपीएस होत आहेत म्हणजेच संपूर्ण अंत्योदय होत आहे.


सुरवातीला आनंद पाटील यांनी संजीवनीची पूर्वपीठिका व विविध उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरण उपक्रमात सर्वांना सहभागी होण्याचे, तसेच विद्यार्थ्यांनी संजीवनी स्टडी सेंटर सुविधाचा लाभ घेण्याचे  आवाहन केले. संजीवनी कृतज्ञता निधी मागची भूमिका मांडताना सांगितले की, समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणा-या संस्थेला काही मदत करते. या पूर्वी आदरणीय भारती ठाकूर यांच्या नर्मदालय संस्थेला, श्री. सागर रेड्डी यांच्या अनाथांचा नाथ या संस्थेला, गेल्यावर्षी सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणा-या सुमेधा ताई यांचा संस्थेला मदत केल्याची माहिती दिली. 



यावर्षी दीपस्तंभ फाऊंडेशनला आमदार श्री राजन नाईक, उपमहापौर श्री मार्शल लोपिस, श्री मनोज पाटील यांच्या हस्ते  एक लाख दहाहजारा हून अधिक कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला.  यावेळी आमदार राजन नाईक यांनी रु ५०००० देणगी दिली.




कार्यक्रमाच्या सुरवातीला मंगेश नाईक, कौस्तुभ पाटील, सौ. रीमा नाईक यांनी माणसानी माणसाशी माणसा सम वागावे हे  विषयाला समर्पक गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राप्ती पाटील आणि  अश्विनी पाटील यांनी सुरेखरित्या केले.

“देशाचे स्वातंत्र्य” हे सर्वाधिक मूल्य मानणारे सुभाष एकमेव स्वातंत्र्य सेनानी.

 “देशाचे  स्वातंत्र्य”  हे सर्वाधिक मूल्य मानणारे सुभाष एकमेव स्वातंत्र्य सेनानी -  संपादक आनंद हर्डीकर. 



देशाचे  स्वातंत्र्य हे सर्वाधिक मूल्य मानणारा, त्यासाठी तन मन धन अर्पण करून  झटणारा,  छत्रपती शिवाजी महाराजवादी सुभाषबाबू हे एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आनंद हर्डीकर यांनी संजीवनी परिवार आयोजित व्याख्यानमालेत सामवेद भवन उमराळे येथे  ‘नेताजी, तुमि कोथाय?` या विषयावर बोलताना केले. अध्यक्षस्थानी RCF चे निवृत जनसंपर्क अधिकारी श्री संतोष वझे होते. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन आणि  कदम कदम बढाए जा  हे समरगीत सौ. रीमा नाईक, सौ. सुविधा नाईक, कौस्तुभ पाटील, अनंत नाईक यांनी सादर करून वातावरण निर्मिती केली. 




  





 

ज्येष्ठ लेखक, संशोधक  आनंद हर्डीकर पुढे म्हणाले की सुभाषबाबूनी छत्रपती शिवाजीमहाराजांना प्रेरणास्थान मानले होते. १९२८ च्या मुंबईतील भाषणात सांगितलं होतं की, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर छत्रपतींच्या मार्गाने जायला हवे. ज्या साधनानिशी आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पुढचा टप्पा गाठता येईल, ते आपल्या कामासाठी आपण वापरले पाहिजे हे महाराजांचे तंत्र सुभाषबाबूनी आत्मसात केले होते. गांधीजीच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगामध्ये सहभागी झाले,मेयर झाले, लष्करी गणवेशातील कॉंग्रेसचे सेवादल उभारलं.ते कॉंग्रेसचे नियुक्त अध्यक्ष झाले, गांधीजींना विरोध करून कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 

      १९४० साली त्यांनी गांधीजीच्या पुढे "संपूर्ण असहकार" ची कल्पना मांडली तिला गांधींनी अनैतिक, संधीसाधू म्हटले. गांधींच्या नेतृत्वाखाली काम करणे अवघड झाल्यामुळे  ते देशातून निसटून आधी जर्मनी नंतर जपानला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.   

नेताजी कुठे आहेत असा प्रश्न आपल्या मनात आहे. सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ ला झालेल्या विमान अपघातात गेले नाहीत तर १६ सप्टेंबर १९८५ रोजी अयोध्या फैजाबाद या जोडनगरीतील रामभवन नावाच्या एका हवेली मध्ये गेले. तिथली कागदपत्रे हेच सांगतात. आजूबाजूला वावरणारे स्वाभिमान विसरलेले भारतीय, आपल्याच दूतांना पकडून देणारे भारतीय यामुळे ते प्रकट झाले नसतील.  

 नेताजी तुम्ही कोठे आहेत असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल तेव्हा स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वेळेला जे जे करणे आवश्यक आहे ते ते करायला आपला संपूर्ण समाज तयार होईल तेव्हा नेताजी आपल्यातच प्रकट झाले आहेत असे वाटेल.

          संजीवनीच्या नरेश जोशी यांनी पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी संजीवनी स्टडी सेंटर ची माहिती देऊन या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले त्याच बरोबर संजीवनी परिवार देत असलेल्या कृतज्ञता निधीची माहिती दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सायली नाईक हिने उत्तमरित्या केले.

संजीवनी परिवार व्याख्यानमाला २०२६ पुष्प १ले.

 “असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे ”   प्रा. डॉ.  मृदुला दाढे. 




“असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे, फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत” ह्या कवयित्री शांता शेळकेंच्या कवितेवरुन आजच्या कार्यक्रमाचे शीर्षक दिलं आहे.  प्रा. मृदूलाताई  संजीवनी परिवार आयोजित संजीवनी व्याख्यानमाला २०२६ च्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलत होत्या.  पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक सौ. रीमा नाईक यांनी केले. आजचे व्याख्यान महान गायिका स्व. आशाताईंना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी  संगीत शिक्षिका सौ. मनीषा आपटे मॅडम होत्या. ईशस्तवन श्री. अरविंद पाटील, कौस्तुभ पाटील, सौ. सुविधा नाईक व सौ. मंगला नाईक यांनी सादर केले.




 डॉ . मृदूलाताईंनी प्रतिभावंत गीतकार, संगीतकार, गायक आणि वादक यांनी अनेक गीते अजरामर केल्याचं त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरण करुन सोदाहरण समजावून सांगितलं. आशताईंच्या "ही वाट दूर जाते"  ने  सुरवात करुन या गाण्यातील सौदर्यस्थळे उलगडून दाखवताना, तुमचं गाव ही गोवा, कोकणाची आठवण करुन देत असल्याचं म्हणाल्या. शब्द आणि भावना अर्थवाही करत पं. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिल्या. संगीतकारांची प्रतिभा, वैशिष्ट्ये दाखवताना बाबूजींचे  "का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला"  "जीवलगा कधी रे येशील तू"  या गाण्यातील शब्दाचे वजन, उकारातील मुलायमपणा  अर्थाप्रमाणे येणारे आरोह अवरोह गाऊन दाखवले. गाण्याचा ताल कसा जपला जातो हे त्यांनी "ज्योतीकलश छलके"   या बाबूजींच्या अजरामर गीतामधून दाखवून दिले. या गाण्याची संगीतकार अनिल विश्वास केलेल्या  थोरवीची कथा सांगितली. श्रीनिवास खळे यांचे वैशिष्ट्य नोंदवताना  "सुंदर ते ध्यान"  या अभंगाचा उल्लेख करून ‘ध्यान’ हा शब्द कसा उच्चारला आहे हे बघण्याचे आवाहन केले. इतक्या कमी वेळेत यासर्व मंडळीच्या कामाला न्याय देणे कठीण आहे. त्याच्या प्रतिभेला नमन असे म्हणत त्यांनी हिंदीमधील मदनमोहन यांच्या “ लग जा गले कि फिर ये हसीन रात हो ना हो”  या गीताचे सादरीकरण सर्वांची मने जिंकून गेले.  मदनमोहन शिवाय हिंदी सिनेमा संगीताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी हिंदीतील सलिल दाच्या न जाने क्यु , यस दी बर्मन यांच्या सोच के ये गगन झूमे अभी चाँद निकल आयेगा या गीताचा, आर डी बर्मन यांच्या मेरा कुछ समान आणि शेवट त्यांनी "नैना लागे रे, नैना लागे रे"  या गीतानी करून अधिक लक्ष देऊन या गीतांचा, संगीताचा आस्वाद घ्या असे आवाहन केले. कार्यक्रम संपूच नये असंच वाटत होतं श्रोते मंत्रमुग्ध, तल्लीन झाले होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ईशिका पाटील हिने सुरेखरित्या  केलं.

 

Thursday, 7 May 2026

सरस्वती स्तोत्रं

व्याख्यानमाला २०२६ चे दुसरे पुष्प गुंफताना श्री आनंद  हर्डीकर. यांनी सुरवात  स्वरस्वती स्तोत्र म्हणून केली उत्सुकता चाळवली गुगल गुरु वर शोधलं.  



 

नमस्ते शारदे देवि काश्मीर-पुर-वासिनी ।
त्वामहं प्रार्थये नित्यं विद्या-दानं च देहि मे ॥१॥

हे शारदा देवी (सरस्वती माता), काश्मीरमध्ये वास करणाऱ्या देवी, तुम्हाला माझा नमस्कार आहे. मी दररोज तुमची प्रार्थना करतो—कृपया मला ज्ञान (विद्या) द्या.

Obeisance to Thee, O effulgent Sarada, worshipped in the City of Kashmir, I always beseech Thee to vouchsafe to me Pure Knowledge.

 

या श्रद्धा धारणा मेधा वाग्-देवी विधि-वल्लाभा ।
भक्त-जिह्वाग्र-सदना शमादि-गुण-दायिनी ॥२ ॥

जी देवी श्रद्धा, एकाग्रता आणि बुद्धिमत्ता यांचे स्वरूप आहे, जी वाणीची देवी असून ब्रह्मदेवाची प्रिय आहे, जी आपल्या भक्तांच्या जिभेच्या टोकावर वास करते (म्हणजेच त्यांच्या वाणीमध्ये प्रकट होते), आणि जी मनःशांतीसह अनेक सद्गुण प्रदान करते—त्या देवीची मी स्तुती करतो.

You are faith, memory, intelligence, the divinity of speech, the Spouse of Creator, Brahma. You grace the devotees’ speech, You are the bestower of inner peace, and all other excellences.

 

नमामि यामिनीं नाथ-लेखालन्कृत-कुन्तलां ।
भवानीं भव-सन्ताप निर्वापण सुधा-नदीम् ॥३ ॥

मी त्या भवानी देवीला नमस्कार करतो, जिचे रूप रात्रीसारखे शांत व गूढ आहे, जिचे केश भगवान शंकराच्या चंद्रकोरेने अलंकृत आहेत, आणि जी संसारातील दुःख व क्लेश शमवणारी अमृतासारखी नदी आहे.

I bow down to Bhavani who is decorated with ear ornament studded with the flash of lightning, who is a river of nectar that cures the torments of worldly life.

 

भद्रकाल्यै नमो नित्यं सरस्वत्यै नमो नमः ।
वेद-वेदाङ्ग-वेदान्त-विद्या-स्थानेभ्य एव च ॥४ ॥

मी नेहमी भद्रकाली देवीला नमस्कार करतो आणि सरस्वती देवीला वारंवार नमस्कार करतो. तसेच वेद, वेदांची अंगे, वेदांत आणि ज्ञानाच्या सर्व स्रोतांना (स्थाने/केंद्रांना)ही नमस्कार करतो.

 

Constant Salutations to Thee, O Mother Beneficent! You are the home of the Vedas and the auxiliary branches of the Veda, of the Vedanta and all other forms of learning. Salutations to You, O Goddess of Learning.

 

ब्रह्म-स्वरूपा परमा ज्योति-रूपा सनातनी ।
सर्व-विद्यादि-देवी या तस्यै वाण्यै नमो नमः ॥५ ॥

जी देवी ब्रह्मस्वरूप, सर्वोच्च, प्रकाशरूप आणि शाश्वत आहे, जी सर्व प्रकारच्या विद्या निर्माण करणारी आहे—त्या वाणीस्वरूप देवीला मी वारंवार नमस्कार करतो.

O Mother, You are the personification of Brahman. You are the Supreme Spirit, the light Divine, the Eternal Being. You are the Presiding Deity in all branches of learning. Salutations to You, O Goddess of Learning.

 

यया विना जगत्-सर्वं शश्वज्जीवन्-मृतं भवेत् ।
ज्ञानाधि-देवी या तस्यै सरस्वत्यै नमो नमः ॥६ ॥

जिच्याशिवाय हे संपूर्ण जग जिवंत असूनही मृतासारखे होते, अशा ज्ञानाची अधिष्ठात्री सरस्वती देवीला मी वारंवार नमस्कार करतो.

Without You the whole world would appear lifeless. You are the Presiding Deity of Knowledge. Salutations to You, O Goddess of Learning.

 

या विना जगत्-सर्वं मूकमुन्मत्तवत् सदा ।
या देवी वागधिष्ठात्री तस्यै वाण्यै नमो नमः ॥ ७॥

जिच्याशिवाय हे संपूर्ण जग नेहमी मुके आणि वेड्यासारखे (अव्यवस्थित, असंबद्ध) होते, अशा वाणीची अधिष्ठात्री देवीला मी वारंवार नमस्कार करतो.

Without You the whole world would be mute (unable to speak) and demented. You are the Presiding Deity of Speech. Salutations to You, O Goddess of Speech.

 

Wednesday, 4 March 2026

स्वस्थता - आरोग्य - आहार

 

आयुर्वेदानुसार स्वस्थ असणे म्हणजे काय?  

समदोषः समाग्निश्च समधातु-मलक्रियः । प्रसन्नात्मेन्द्रिय-मनः स्वस्थ इत्यभिधीयते ॥    सुश्रुतसंहिता (सूत्रस्थान 15.41)

ज्याच्या त्रीदोष, अग्नि, धातू आणि मलक्रिया संतुलित आहेत, तसेच ज्याचे आत्मा-इंद्रिये-मन प्रसन्न आहेत, तो मनुष्य “स्वस्थ” मानला जातो.

समदोषता (Homeostasis): वात-पित्त-कफ यांचे संतुलन म्हणजे शारीरिक कार्यांची सुसूत्रता.

समाग्नि (Metabolic balance): पचन व रूपांतरण-क्रिया योग्य; अति/मंद अग्नि नसणे.  (जठराग्नि, भूताग्नि व धात्वाग्नि-पचन, पंचभुताचे अंशीकरण, सप्तधातूचे पोषण रूपांतरंण )

समधातु (Tissue integrity):  धातूंचे (सप्तधातू -रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) पोषण, निर्माण व क्षय - प्रक्रिया संतुलित.

मलक्रिया-सम्यकता (Elimination): मल ((पुरीष, मूत्र, स्वेद) निर्मिती व उत्सर्जन नियमानुसार.

मानसिक-आध्यात्मिक प्रसन्नता: केवळ रोगाभाव (फक्त रोगांचा अभाव) नव्हे; शरीर + मन + आत्म यांचे सम्यक स्वास्थ्य.

 

दिनचर्या, ऋतुचर्या, आहारचर्या  दिनचर्या कशी असावी आणि ऋतु प्रमाणे आपला आहार कसा असावा या विषयी मार्गदर्शक तत्त्वे.

ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत् स्वस्थो रक्षार्थमायुषः। दन्तधावनं तु कर्तव्यं कषायकटुतिक्तकैः।

 अभ्यङ्गं आचरेन्नित्यं स जराश्रमवातहः। अर्धशक्त्या तु व्यायामः।


आयुष्याचे रक्षण करण्यासाठी निरोगी मनुष्याने ब्रह्ममुहूर्ताला उठावे. कडू-तिखट-कषाय द्रव्यांनी दात स्वच्छ करावेत. दररोज तेलाने अभ्यंग करावा; तो वार्धक्य, थकवा व वात कमी करतो. आपल्या शक्तीच्या अर्ध्या मर्यादेपर्यंत व्यायाम करावा.

 

हेमन्तशिशिरौ शीतौ, वसन्तो ग्रीष्म एव च।
 
सहा ऋतू — हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद.

तत्रानुसारतः कुर्यात् आहारविहारविनियमम्।”
 प्रत्येक ऋतूनुसार आहार-विहार बदलावा.

ऋतु प्रमाणे काय खावे याचे संक्षिप्त नियम   निसर्ग जसा बदलतो, तसा आहार-विहार बदला.”
उष्णतेत शीतलता, थंडीत उष्णता, दमटपणात हलकेपणा, कोरडेपणात स्निग्धता. विरुद्धगुणांनी दोष संतुलित करणे हेच ऋतुचर्येचे तत्त्व.

( ऋतु , मराठी,इंग्रजी महीने , शरीरात होणारे दोष , आहाराची घ्यायची काळजी .)

वसंत:                चैत्र–वैशाख, Mar–May -  कफ प्रकोप लघु, रुक्ष, कडू-तिक्त-कषाय; उद्वर्तन, व्यायाम वाढवा.

ग्रीष्म:                 ज्येष्ठ–आषाढ, May–Jul     अग्नि मंद, वात संचय शीतल, द्रव, मधुर; श्रम कमी, दिवा-निद्रा अल्प.

वर्षा:                 श्रावण–भाद्रपद , Jul–Sep    अग्नि दुर्बल लघु, उष्ण, आंबट-लवण; उकळलेले पाणी, स्वच्छता.

शरद:                आश्विन–कार्तिक, Sep–Nov  पित्त प्रकोप तिक्त, मधुर, शीतल; सूर्यताप टाळा.

शीत ऋतु हेमंत:     मार्गशीर्ष–पौष,   Nov–Jan   अग्नि तीव्र गुरु, स्निग्ध, उष्ण आहार; अभ्यंग, व्यायाम.

शीत ऋतु शिशिर:  माघ–फाल्गुन, Jan–Mar     अग्नि तीव्र गुरु, स्निग्ध, उष्ण आहार; अभ्यंग, व्यायाम.

 

आहाराविषयी आयुर्वेद काय म्हणतो आहे.  इकडे मात्रा म्हणजे प्रमाण.

 

मात्राशी स्यात्। उष्णं स्निग्धं मात्रावद् जीर्णे वीर्याविरुद्धम्। अजीर्णे भोजनं विषम्।


योग्य प्रमाणात आहार घ्यावा. मात्रा-नियमन: अर्धपेट अन्न, चतुर्थांश जल, चतुर्थांश रिक्त. उष्ण, स्निग्ध, योग्य प्रमाणात

आधीचे अन्न पचल्यावर व विरुद्ध गुण नसलेले अन्न घ्यावे. 

अपचनावर भोजन करणे म्हणजे विषासमान.

Wednesday, 28 January 2026

माझी देवपूजा !

  भगवंताला प्रिय असलेली आठ पुष्पे. 

काल आदरणीय सुधा मूर्ती कडून एक श्लोक एकला,  त्यांत  विष्णू ला प्रिय असलेल्या आठ पुष्पा चे वर्णन आहे. 

अहिंसा प्रथमं पुष्पं पुष्पमिन्द्रियनिग्रहः । सर्वभूतदयापुष्पं क्षमापुष्पं विशेषतः ॥

ज्ञानपुष्पं तपः पुष्पं ध्यानपुष्पं तथैव च । सत्यपुष्पमष्टमं प्रोक्तं विष्णोः प्रीतिकरं भवेत् ||

 

दररोज देवपूजेत फुलेहारअक्षता अर्पण करतात . भारतीय आध्यात्मिक परंपरा सांगते की भगवंताला बाह्य फुलांपेक्षा अंतःकरणातील सद्गुण अधिक प्रिय असतात. हेच सत्य सांगणारा एक अत्यंत सुंदर श्लोक पद्मपुराण / स्कंदपुराण (भक्ती-कांड) मध्ये आहे — (अष्टपुष्पी).  श्लोकात भगवंताला अर्पण करावयाची आठ श्रेष्ठ पुष्पे सांगितली आहेत. हाच संदर्भ मा. सुधा मूर्ती देत होत्या. 

या श्लोकात पाठभेद आहे. काही ठिकाणी ज्ञान तप एवजी दान आणि योग असा भेद आहे. त्याचं कारण ही आहे. ज्ञान आणि तप कठीण आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना दान आणि योग आचरणात आणता येतील.  

 

अहिंसा प्रथमं पुष्पं पुष्पमिन्द्रियनिग्रहः । सर्वभूतदयापुष्पं क्षमापुष्पं विशेषतः ॥

ध्यानपुष्पं दानपुष्पं योगपुष्पं तथैव च । सत्यपुष्पमष्टमं प्रोक्तं विष्णोः प्रीतिकरं भवेत् ॥

 

पहिले पुष्प आहे अहिंसाकोणत्याही जीवाला विचाराने, शब्दाने किंवा कृतीनेही इजा न करणे. अहिंसा हीच सर्व धर्मांची मुळं आहेत.

दुसरे पुष्प आहे इंद्रियनिग्रहआजच्या भोगप्रधान काळात इंद्रियांवर संयम ठेवणे ही खरी साधना आहे.

तिसरे पुष्प आहे सर्वभूतदयासर्व प्राणीमात्रांविषयी करुणा ठेवणे. देव मंदिरात नसून प्रत्येक जीवामध्ये आहे, ही जाणीव.

चौथे पुष्प आहे क्षमाअपमान सहन करूनही द्वेष न बाळगणे. क्षमा ही दुर्बलतेची नव्हे, तर आत्मिक शक्तीची निशाणी आहे.

पाचवे पुष्प आहे ज्ञानआत्मा आणि परमात्म्याचा विवेक, अज्ञानाचा नाश करणारे तेज.

सहावे पुष्प आहे तपकेवळ उपवास नव्हे, तर मन, वाणी आणि आचरणाचे शुद्धीकरण.

सातवे पुष्प आहे ध्यानईश्वरचिंतनात मन स्थिर करणे, अंतर्मुख होणे.

आणि आठवे, अंतिम पुष्प आहे सत्यविचार, शब्द आणि कृती यांची एकरूपता.

पाठभेदतील दोन गुणां विषयी.

 दानगरजूंसाठी आपले काहीतरी देणे. दान म्हणजे केवळ धन नव्हे, तर वेळ, श्रम आणि ममत्व अर्पण करणे.

  योगजीवनात संतुलन. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय.

 

ही आठ पुष्पे जर आपल्या जीवनात उमलली, तर देव वेगळा शोधावा लागत नाही. आपले जीवनच पूजा बनेल.

Saturday, 17 January 2026

ईर्षा, तृष्णा

 

 रामधारी सिंह ‘दिनकर’ (1908–1974) हे आधुनिक हिंदी साहित्यातील श्रेष्ठ कवी, विचारवंत आणि निबंधकार होत. राष्ट्रीय चेतना, मानवी भावभावना आणि तत्त्वचिंतन यांचे दर्शन त्यांच्या साहित्यातून होते.

ईर्ष्यातू न गई मेरे मन से हा दिनकरांचा काव्यात्मक निबंध असून तो मानवी मनातील एका सूक्ष्म पण प्रभावी भावनेचे तात्त्विक विश्लेषण करतो. हा निबंध ईर्षेचे स्वरूप, तिची उत्पत्ती, तिचे सामाजिक व मानसिक परिणाम यांचा  विचार मांडतो.

मानवी मनात निर्माण होणाऱ्या भावनांपैकी ईर्षा ही अत्यंत स्वाभाविक पण गुंतागुंतीची भावना आहे, असे लेखक सांगतो. जेव्हा एखाद्याचे यश, सुख, सामर्थ्य किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा अधिक आहे, असे जाणवते, तेव्हा मनात अस्वस्थता निर्माण होते; हाच ईर्षेचा उगम आहे. ही भावना केवळ दुर्बल मनांची नसून, ती अनेकदा संवेदनशील, महत्त्वाकांक्षी आणि जागरूक माणसांतही आढळते.

ईर्षा आणि द्वेष यांत फरक आहे. द्वेष थेट नकारात्मक आणि विध्वंसक असतो; तर ईर्षा ही तुलनेतून जन्मते. दुसऱ्याचे यश आपल्याला टोचते, कारण ते आपल्याला स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव करून देते. त्यामुळे ईर्षा ही माणसाला आत्मपरीक्षणाकडे नेऊ शकते, पण ती अनियंत्रित राहिली तर ती मनाला विषारी बनवते.

लेखक सांगतो की ईर्षा समाजात स्पर्धा वाढवते, पण त्याचबरोबर तणाव, कटुता आणि नात्यांतील दुरावा निर्माण करते. अनेकदा ईर्षाग्रस्त माणूस स्वतःच्या प्रगतीपेक्षा दुसऱ्याच्या अपयशाची अपेक्षा करू लागतो—आणि तेथून नैतिक अधःपतन सुरू होते.

दिनकर सांगतात की माणूस जीवनात कितीही प्रगती केली, यश मिळवले किंवा अनुभवसंपन्न झाला, तरी दुसऱ्याच्या यशाशी तुलना होताच मनात अस्वस्थता निर्माण होते. हीच ईर्षा. ती केवळ दुर्जन किंवा दुर्बल व्यक्तींची भावना नसून, महत्त्वाकांक्षी व संवेदनशील माणसांत ती अधिक तीव्रतेने आढळते. कारण अशा व्यक्ती स्वतःकडून मोठ्या अपेक्षा ठेवतात.

दिनकर नीत्शेच्या विचारांचा संदर्भ देतात—मानवी महत्त्वाकांक्षा ही सर्जनशीलही असू शकते आणि विध्वंसकही. ईर्षा जर स्वतःला घडवण्याची प्रेरणा देत असेल, तर ती उन्नती साधते; पण ती जर दुसऱ्याच्या अपयशात आनंद शोधू लागली, ती जर सूड, तुच्छता किंवा अहंकारात बदलली तर नैतिक अधःपतन घडते.

 शेवटी लेखक असा निष्कर्ष काढतो की ईर्षा ही मानवी स्वभावाची अपरिहार्य छाया आहे. तिचे अस्तित्व नाकारण्याऐवजी तिच्यावर विवेकाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. आत्मविश्वास, समाधान आणि आत्मभान यांमुळेच ईर्षेचे विष औषधात बदलू शकते.

कवी दिनकर म्हणतो की जीवनात अनेक अनुभव, सुख-दुःख, यश–अपयश आले; वयही पुढे गेले. तरीही मनाच्या आत खोलवर रुजलेली अतृप्त इच्छा (तृष्णा) कमी झालेली नाही. बाह्य जग बदलले, पण अंतर्मनातील ओढ कायम आहे.

संपत्ती, प्रतिष्ठा, ज्ञान किंवा कर्तृत्व मिळूनही समाधान मिळत नाही. जे मिळाले ते अपुरेच वाटते. मिळालेल्या गोष्टी समाधान देण्याऐवजी नवीन अपेक्षा जन्माला घालतात, अशी मानसिक अवस्था कवी व्यक्त करतो.

कवीला जाणवते की ही तृष्णा केवळ भौतिक गोष्टींची नाही; ती मान-सन्मान, ओळख, अर्थपूर्ण अस्तित्व यांचीही आहे. मन स्वतःशीच संघर्ष करत आहे—“आता थांबावे” असे कळते, पण मन थांबत नाही.

जीवनातील वेदना, संघर्ष आणि थकवा असूनही इच्छा मरत नाही. उलट, दुःखातूनही काहीतरी अधिक मिळवण्याची धडपड वाढते. तृष्णा ही दुःखाचे मूळ आहे, हे समजूनही ती सुटत नाही, ही शोकात्म जाणीव येथे आहे.

कवी मानवी स्वभावावर भाष्य करतो—मनुष्य जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत इच्छांच्या मागे धावतो. तृप्ती हा क्षणिक भास आहे, पण तृष्णा ही कायमची सोबतीण आहे.

अखेर कवी एका तत्त्वज्ञानात्मक निष्कर्षापर्यंत येतो:
तृष्णा ही मानवी जीवनाची शापही आहे आणि प्रेरणाही. ती नसेल तर प्रगती थांबेल; पण ती अनियंत्रित राहिली तर माणूस कधीच शांत होऊ शकत नाही. मानवाच्या अंतर्गत द्वंद्वाचे हे प्रभावी चित्रण कवी करून जातो.