श्रीमत्-भगवत्-गीतेपासून
प्रेरणा घेणाऱ्या व्यक्तींची कार्यक्षेत्रे पाहिली तर त्यात विलक्षण
विविधता आढळते. जी गीता लोकमान्य टिळकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची
प्रेरणा देते, तीच गीता क्रांतिकारक असलेल्या अरविंदबाबूना
स्वातंत्र्याचा लढा सोडून देऊन योगसाधना करण्याला प्रवृत्त
करते. आठव्या शतकात गीतेवर भाष्य लिहिणारे आदिशंकराचार्य
सर्वसंगपरित्याग करतात, तर पाचशे वर्षांनी त्याच ग्रंथावर
भावार्थदीपिका लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज भक्तिमार्गाचा पाया रचतात. लोकमान्यांना
गीतेत कर्मयोग दिसतो तर महात्माजींना अनासक्तियोग.
गीतेपासून प्रेरणा घेणाऱ्यात जसे विद्ध्वंसक अस्त्रांचा शोध लावणारे वैज्ञानिक
आहेत तसेच अखिल मानवजातीच्या भल्याची चिंता वाहणारे मानवतावादी आहेत. निरनिरळ्या
काळात, निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या
कार्यासाठी लागणारी वैचारिक बैठक गीता पुरवते याचे
कारण गीता सिद्धांत सांगते, ज्ञान देते. धर्माज्ञा देत नाही.
ज्ञानाची सुरुवात गृहीतकापासून होते. गीतेचे
पहिले
मूलभूत गृहीतक पुढील श्लोकात
आहे:
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि
।। (गी.२.४७)
या श्लोकाचा शब्दश: अर्थ असा:
कर्मावरच तुझा अधिकार आहे. फळावर तू कधीही
अधिकार सांगू नकोस, फळाच्या हेतूने काम करू
नकोस, कर्म करणे टाळूही नकोस.
गीतेतील हा सर्वात प्रसिद्ध श्लोक आहे. याच्या
अर्थावर विस्तृत भाष्ये लिहिली आहेत. यातील पहिल्या अर्ध्या ओळीत गृहीतक आहे, उरलेला भाग उपदेशात्मक आहे.
कर्मावर अधिकार आहे याचा अर्थ विशिष्ट कर्म
करायचे की नाही, कशाप्रकारे करायचे इत्यादी ठरविण्याचे
स्वातंत्र्य व्यक्तीला आहे. मग कर्म करण्याचाच अधिकार
आहे असे कृष्ण का म्हणतो? या ‘च’चा अर्थ काय? याचे उत्तर मनुष्य स्वभावात आहे. सामान्य माणूस कोणतीही कृती फळाच्या
आशेने करतो. उद्देश्यहीन काम तो करत नसतो. त्यामुळे
कर्त्याचा कर्मावरच अधिकार आहे याचा अर्थ कर्मफळावर अधिकार नाही,
हे कृष्णाला ‘च’ने सांगायचे आहे.
फळाचा अधिकार नसण्याला
आणखीही एक कारण आहे. अधिकार वापरलाच पाहिजे अशी सक्ती नसते.
अधिकाराचा वापर टाळता येतो. पण वापरलेल्या अधिकाराचे फलित
टाळता येत नाही. अग्नीला स्पर्श करायचा
की नाही हे ठरविण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण स्पर्श केल्यावर हात भाजण्याचा
परिणाम तुम्ही नाकारू शकत नाही.
कर्म करणे टाळताही येत नसते. कारण कर्म न करणेही
एक कर्मच असते. (गी.३.४) नदीला महापूर आला आहे आणि माझे
घर चारी बाजूनी पाण्यानी वेढले आहे. पाणी वाढतच चालले आहे. मी कोणतीही कृती
करण्याचे नाकारले आणि स्वस्थ बसलो, म्हणून येणारे अरिष्ट टळत
नसते. कारण निर्णय न घेणे हाही एक निर्णयच असतो. कर्म न करणेही कर्मच असते. त्याचे
फळही असते. ते स्वीकारावेही लागते. त्यामुळे, गीता म्हणते
फळाचा हेतू मनात धरून कर्म करू नकोस, कारण फळावर तुझा अधिकार नाही. तसेच कर्म टाळण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ते टाळणे तुला अशक्य आहे.
गीतेचे दुसरे गृहीतक कर्मफळावर कर्त्याचा अधिकार
का नाही याचे कारण सांगते.
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ (गी.
३.२७)
जे घडते तो परिस्थितीचा परिपाक असतो.
‘मी कर्ता आहे’ असे कोणी मानत असेल तर तो त्याचा अहंकारातून निर्माण
झालेला भ्रम असतो.
येथेही श्लोकाच्या पहिल्या भागात गृहीतक आहे.
त्यात कर्मावर कर्त्याचा का अधिकार नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे. दुसऱ्या भागात
श्रीकृष्णाचे निरीक्षण आहे.
पानिपतात
मराठ्यांचा पराभव का झाला याची अनेक कारणे दिली जातात. त्यात एक कारण असे सांगितले
जाते की, अब्दालीला अनपेक्षित रित्या यमुनेला एके ठिकाणी
उतार मिळाला. सदाशिवरावाने पंधरा वर्षांचे रेकॉर्ड पाहून व्यूहरचना केली होती. पण
त्यावर्षी अकल्पित घडले.
कर्मफळ परिस्थितीचा परिपाक का असते याचे कारण
गीतेच्या शेवटच्या अध्यायात सांगितले आहे. गीता म्हणते, कर्मफळ पाच घटकांवर अवलंबून असते: १.अधिष्ठान, २.कर्ता,
३.कर्त्याला उपलब्ध असणारी साधने, ४.कर्त्याने
केलेले प्रयत्न, ५.दैव (गी.१८.
१४)
यातील अधिष्ठानाला गीता
प्रथम क्रमांक देते, याचे कारण अधिष्ठान
दूरगामी परिणाम करते. ते गुणात्मक दृष्ट्याही अन्य घटकापासून भिन्न
आहे. इतर कारणे सर्व पशूंना लागू आहेत. अधिष्ठान मनुष्येतर प्राण्यांना लागू नाही.
उरलेल्या चार घटकांपैकी, कर्ता, साधने,
आणि प्रयत्न, यांचे महत्त्व सर्वमान्यच
आहे. पण दैव इहवाद्याना अमान्य होण्याची शक्यता आहे. परंतु दैवाला
समाधानकारक इहवादी अर्थ देता येतो. आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे, आपल्याला जे समजून घ्यायचे असते त्याचा अनंत
आपण समजू शकत असलेल्या गोष्टींच्या अनंतापेक्षा दोन पायऱ्या पुढे असतो. त्यामुळे
नेहमीच काही घटक आपल्याला अज्ञात राहणार असतात किंवा आपल्या नियंत्रणात नसतात.
अशा घटकांना दैव म्हणता येईल.
या श्लोकावर भाष्य करताना गीता-रहस्यात शेतीचे
उदाहरण घेतले आहे. शेतीतून मिळणाऱ्या फळासाठी कर्ता
म्हणजे शेतकरी जाणकार असणे महत्त्वाचा आहेच. पण केवळ जाणकार असणे पुरेसे नाही,
त्याने श्रमही करावे लागतात. साधनामध्ये
जमीनीचा पोत, बी, खत, बैल, ट्रॅक्टर, वीज, मजूर यांचा समावेश आहे. पण येव्हढ्याने भागत नाही. पाऊस योग्य वेळी योग्य
प्रमाणात पडावा लागतो. आणि ते शेतकऱ्याच्या हातात नसते. ऐन वेळी पाऊस ओढ खातो अथवा
जरुरीपेक्षा अधिक होतो आणि श्रम वाया जातात. त्याला दैव म्हणणे भाग आहे.
______________________________________
डॉ. ह. वि. कुंभोजकर
४०३, पूर्वरंग
अपार्टमेन्ट, राजारामपुरी १३ वी गल्ली, कोल्हापूर , ४१६ ००८
Mobile: 9834336547,
e-mail: hvk_maths@yahoo.co.in