Wednesday, 13 July 2011

वनराईतून गर्द देवराई!

निर्मळ येथील संजीवनी परिवाराचा उपक्रम निशिकांत म्हात्रे

वसई तालुक्यातल्या निर्मळ या प्रसिद्ध तिर्थक्षेत्री , रानवेड्या तरूणांनी गर्द देवराई उभी करण्याचा चंग बांधला आहे . सहा वर्ष नेटाने आधी वनराई आणि त्यातून देवराई अस स्वप्नं बघणारी तरूणाई आहे ती ' संजीवनी परिवाराची '. झाडांपासून जगणं शिकायचं या ध्यासातून उमराळे येथल्या ' संजीवनी परिवारा ' ने तमाम वसईकरांना तेथली वनराई जपायची हाक घातली आहे . बोळींजपासूनचा वसई गावापर्यंत पसरलेला सामवेदी समाज . आपल्या समाजाचा शैक्षणिक आर्थिकस्तर उंचावण्यासाठी , नवतरूणांना दिशा देण्यासाठी , एकमेकाच्या सहकार्यातून उभा राहिला तो ' संजीवनी परिवार ', तरूणांचा गट !

प्रा . सायनेकर यांची प्रेरणा :संजीवनी परिवार त्यासाठी आबालापासून वृध्दापर्यंत सगळ्यांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवतो आणि त्यांना सामावून घेते , महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विचारवंत , तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केली जाणारी व्याख्यानमाला , बालमेळावा , मार्गदर्शन शिबीर आणि दर रविवारी चुकता राखली जाणारी झाडांची निगा . निर्मळ हे तिर्थक्षेत्र महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते आठवे जगतगुरू श्री शंकराचार्यांचे समाधी स्थळ कार्तिक स्वामींच्या बंदिस्त मंदिरासाठी . उंच टेकडीवर असणाऱ्या या मंदिराचा परिसर उजाड बोडका तर पायथ्याला मोठ्या तलावांतील पाण्याने हिरवा , समृध्द . एका व्याख्यानाचा निमित्ताने संजीवनी परिवाराच्या संपर्कात आलेले , ठाण्यातील विचारवंत लेखक प्रा . मुरलीधर सायनेकर यांनी या मंदिराचा बोडका परिसर पाहिला आणि इथल्या परिसराला हिरवं लेणं देण्याची प्रेरणा देत , स्वत : च्या प्रत्यक्ष सहभागाची तयारी दाखवली . त्यासाठी त्यांनी इथे वृक्षारोपण करून दर वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस जुलैच्या पहिल्या रविवारी साजरा करण्याची कल्पना मांडली . त्यांची प्रेरणा , कल्पना प्रत्यक्ष सहभाग यातून इथे देवराई फुलू लागली आहे . कांचन , देवदार , कदंब , सप्तर्षी , ओक , कैलासपती , पलाश , टबुबीया , पाम , बहवा , मधुकामिनी , बकुळ , पारिजात , कुडुनिंब , पिंपळ , अशोक अशी सर्व ऋतुमानानुसार फुलणारी , फळणारी झाडे या परिसरात तगवली आहेत . त्यासाठी संजीवनी परिवाराची तरूणाई दर रविवारी चुकता , सकाळी सात ते दहा या वेळेत हजर राहून निर्मळ टेकडीवरच्या झाडांची काळजी घेते तर प्रा . सायनेकर वर्षभर चौकशी तर कधी व्याख्याना निमित्त वसईत आल्यावर चुकता झाडांना भेट देणारे मात्र इथल्या झाडांच्या वाढदिवस साजरा करण्या करता दरवर्षी सहकुटुंब हजर राहत आहेत .  

 वीणा गवाणकर यांचाही सहभाग :संजीवनी परिवाराने इथल्या झाडांचा सहावा वाढदिवस गेल्या रविवारी साजरा केला . त्या करता प्रा . सायनेकरां बरोबर झाडांचा वाढदिवस साजरा करण्याकरता हजर होत्या प्रसिद्ध लेखिका श्रीमती वीणा गवाणकर . त्यानी श्री शंकराचार्यांच्या मंदिरामागे वृक्षारोपण करून , उपस्थित वृक्षप्रोमींना त्यांच्या वृक्ष , पर्यावरण जगविण्याच्या सत्यकथा कथनाने विचार करायला भाग पाडले . सहारा वाळवंट वाचविणाऱ्या रुपर्ड बेकर यांची कथा सांगितली . त्या म्हणाल्या , या अशा कथा वाचल्या की कळत , माणसाचं आयुष्य झाड बदलतात . सायनेकर सरांनी सांगितले की प्रत्येकाने उपयुक्तवादी भूमिकेतून झाडे लावावीत . झाडांना आपण जगविले तर ती आपल्याला जगवितात . झाड आपल्याकडे असलेले सर्व ते औदार्याच्या भूमिकेतून माणसाला देतात . जगतगुरू श्री शंकराचार्यांचे समाधी स्थळ असणारे हे तिर्थक्षेत्र देवराईच्या रुपाने जपायची आस संजीवनी परिवाराला आहे . त्यासाठी पाठबळ हवे ते सर्व जातींचे श्रध्दास्थान असणाऱ्या भोवतीच्या समाजाकडून अनधिकृतपणे टेकडी व्यापत वनराईचा वृक्षसंहार करणाऱ्या स्थानिकांकडून . खडकाळ असणारी ही टेकडी हिरवाईकडे नेताना झाडांचं संरक्षण करण्याकरिता निदान तारांच्या कुंपणाची तरी गरज आहे . एखादा दानशूर , लोकनेता वृक्षपुत्र , वृक्षमित्र या झाडांच दत्तक विधान घेणारा भेटला त्याने कुंपणाची पाखर घातली तर या वनराईचा प्रवास देवराई पर्यंत सुखकर होईल . त्यासाठीच ही सामवेदी हाक आहे ती झाड वाढविण्यासाठी , जगविण्यासाठी सर्व समाजांसाठी . श्रध्दास्थांनांभोवती देवराई फुलविण्यासाठी .