( संक्षिप्त परिचय : श्री दिलीप कुलकर्णी - पर्यावरण जगण्यासाठी कोकणात सहकुटुंब स्थायिक. कुडावळे, दापोली येथून ते ‘गतिमान संतुलन’ हे मासिक प्रकाशित करतात. या पूर्वी ते विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे १९८४-९३ पर्यंत पूर्णवेळ कार्यकर्ते, " विवेक विचार " चे संपादक म्हणून काम. वैदिक गणित , निसर्गायण , वेगळ्या विकासाचे वाटाडे , सम्यक विकास ,अणु-विवेक , दैनंदिन पर्यावरण इत्यादी पुस्तके प्रसिध्द. पर्यावरण अभ्यास शिबीर , मराठी पर्यावरण साहित्य संमेलन, विविध सामाजिक विषयावर प्रबोधन इत्यादी उपक्रम.)
‘गतिमान संतुलन’ मधील आकार जीवनाला! हा लेख खाली देत आहे.
जीवनाला आकार देण्याकरिता माहिती आणि ज्ञान ह्यांच्या पलीकडे असणारी एक शहाणीव आपल्यात विकसित होणं आवश्यक असतं; ह्या शहाणीवेचा शैक्षिणिक पात्रतेशी काहीही सबंध नसतो हे प्रारंभीच लक्षात घेऊ या. ही शहाणीव अंत:प्रज्ञेचा भाग असतो; नि प्रचलित शिक्षण पध्दतीत तर्कप्र ज्ञने वर अतिरेकी भर असल्याने अंत:प्रज्ञा दुर्लक्षित राहते. अनेक मुलभूत प्रश्न आपण स्वत:ला कधी विचारात नाही.त्यांची एक सविस्तर यादीच देत आहे, जेणेकरून आपल्या जगण्याचा सारा आवाका आपल्या विचारांच्या कक्षेत यावा.
- माझं शिक्षण केवळ पुढे अधिक पैसे मिळवून देणाऱ्या नोकरीसाठी आहे; कि, जीवन सर्वांगानी विकसित व्हावं ह्यासाठी?
- अर्थार्जन आणि उपभोग ह्यांच्या व्यतिरिक्त माझ्या विकासासाठी मी काय काय करतो?
- अर्थार्जन आणि उपभोग ह्यांची माझी पद्धती माझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर चांगले /वाईट कोणते परिणाम करते.
- शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन, भावनिक विकास , बौद्धिक समृद्धी ह्यांच्यासाठी मी निश्चयपूर्वक वेळ काढतो का? तो माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनेल हे मी कटाक्षाने बघतो का?
- डाव्या मेंदूच्या विकासावर सध्या अतिरेकी भर आहे; उजव्या मेंदूच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करून ते असंतुलन दूर करणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मी तसे प्रयत्न करतो का?
- एकाच्या किंवा दोघांच्या अर्था
र्जनाचा कौटुंबिक जीवनावर, कौटुंबिक स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो आहे? आपला जोडीदार ,मुलं, घरातले अन्य नातेवाईक ह्यांच्या शी आपले संबंध कसे आहेत? - माझं अर्थार्जन आणि उपभोग ह्यांचा समाजाशी असणारा संबंध कसा आहे? माझा अर्थार्जनाचा मार्ग आणि प्रमाण अन्य समाजघटकांचं शोषण करणार आहे का? अर्थार्जनाचा मार्ग नैतिक आहे का? क्षमता असल्याने अधिक पैसे मिळविताना समाजातल्या कित्येकांना प्रामाणिक कष्ट करूनही किमान आवश्यक एवढाही मोबदला मिळत नाही, ह्याची जाणीव मला असते का? अर्थार्जनाला काही एक उच्च सीमा असावी असं मला वाटतं का? ही रेषा माझी मी ओढायची की सरकारनं लादायची?
- समाजातील दुर्बल , वंचित , आर्त ,विपन्न , संकटग्रस्त ह्यांच्याप्रती माझ काही कर्तव्य आहे अस मी मानतो का? त्यांच्या साठी वेळ देतो का?
- एक नागरिक म्हणून राष्ट्राप्रती माझी काही कर्तव्यं असतात त्यांचं पालन मी करतो का?
- नवरा आणि बायको ह्या दोघांनीही अर्थार्जन करण्यामुळे दुप्पट पैसे घरात येतात ते मुलभूत गरजांची पूर्तता करण्यापुरते असतात कि अधिकाधिक चैनीच जीवन जगण्यासाठी? पती पत्नी मिळून आपण ह्याचा विचार कधी करतो का? अशानं वाढणार्या सामाजिक विषमतेच भान आपल्याला असते का? एकाच कुटुंबातल्या दोघांनी नोकर्या / व्यवसाय करण्यामुळे काहीना रोजगारापासून वंचित राहावं लागतं ह्याची जाणीव आपण ठेवता का?
- आपलं अर्थार्जन आणि उपभोग ह्यांचे पर्यावरण वरही परिणाम होत असतात ह्याची जाणीव आपल्याला असते का? निसर्गातली संसाधन, उर्जा,मर्यादित आहेत; ती फक्त पैसेवाल्यांसाठी नसून सर्वासाठी आहेत, ह्या सर्वा मध्ये पशु , पक्षी, जलचर , सूक्ष्मजीव ह्यांचाही समावेश होतो ह्याची जाणीव मला आहे का? माझे उपभोग , संचय ह्यामुळे त्यांचे अधिवास उद्ध्वस्त होतात; प्रजातीच नाश पावतात ह्या हानीचा भान मला आहे का?
- मानवी जीवनाचं ध्येय जाणीवेचा विस्तार हे आहे हे मला ठावूक आहे का? त्यासाठी आवश्यक असणार्या देह धारणेसाठी उपभोग हे साधन मात्र आहेत ते जीवनाचा ध्येय नव्हे हे मी जाणतो का?
अश्या त-हेचे प्रश्न स्वत;ला विचारण्यातून माहिती आणि ज्ञान ह्याच्या पलीकडची एक सजगता ,सहानुभूती , संवेदनशीलता आपल्यात विकसित होऊ लागते. हे प्रश्न सातत्यानं स्वत;ला विचारत राहावे लागतात. जिला continuos assessment म्हणतात.जीवनाचं ध्येय निश्चित करण्यासाठी तर हे प्रश्न उपयोगी आहेतच; त्यातून जीवनाची जी दिशा जो मार्ग निश्चित होतो; त्यावरून आपली वाटचाल चालू आहे ना,ह्याची खात्री करून घेण्य साठी हे सततचं आत्मपरीक्षण आवश्यक असतं.
तुमच्यापैकी काहींच्या मनात असा एक प्रश्न निश्चित येईल की इतका व्यापक विचार करण्याचे कारणच काय? माझ्यापाशी बुद्धिमत्ता आहे; तिच्या जोरावर मी उच्च शिक्षण घेतलं आहे, त्याच्या बळावर चांगली नोकरी मिळवली आहे त्या पैशातून मजेत, चैनीत जगणार आहे हे करताना फार तर कुटुंबाचा विचार मी करीन; समाज,राष्ट्र , पर्यावरण ह्याचा पदोपदी क्षणोक्षणी विचार करण्याचं कारणच काय? त्याचं कारण असं आहे की, हे सगळे घटक, स्तर परस्पराशी जोडलेले आहेत,ते परस्परावर चांगले किंवा वाईट परिणाम करत असतात त्यांचा सुटा-सुटा विचार करताच येत नाही. कोणाचंही व्यक्तिगत जीवन हे पूर्णांशान व्यक्तिगत नसतच. कौटुंबिक स्थिती , सामाजिक स्थिती , राष्ट्राची पर्यावरण स्थिती ह्यांचा परिणाम व्यक्ती वर होतच असतो.ही स्थिती जर वाईट असेल तर कोणाचंही व्यक्तिगत जीवन सुखा-समाधानाचं असूच शकणार नाही. त्यामुळे आपल्या जीवनाला सुयोग्य आकार देताना अन्य सर्व स्तरांवर सुस्थिती सुनिश्चित करणं हि आपलीच जबाबदारी ठरते. म्हटले तर हा व्यापक स्वार्थच आहे; पण हरकत नाही ; त्या स्वार्थापोटी सर्व स्तरांवर सुस्थिती निर्माण होत असेल तर ती भालीच गोष्ट आहे.त्या स्वार्थातून परम-अर्थ आपोआपच साधला जाणार आहे.
‘गतिमान संतुलन’
कुडावळे ४१५ ७१२
ता, दापोली - जि. रत्नागिरी