शनिवारच्या (४ फेब्रु.२०१२) मुंबई वृतांत मध्ये एक बातमी होती. गांधी फिल्म फाऊंडेशन तर्फे विनोबा भावे यांच्या जीवनावर एक चित्रपट बनवण्यावर येणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांत होणार आहे. विनोबा विषयी तरुणांमधील गैरसमज दूर होण्यास यामुळे मदत होईल अशी आशा.
१९७५ च्या आणीबाणीला विनोबांनी अनुशासन पर्व म्हटल्याचे प्रसिध्द झाले. आणीबाणीत त्याचा खूप प्रचार करण्यात आला. ते टीकेचे धनी झाले. सरकारी संत म्हणून त्यांना संबोधले गेले. मला वाटते यामुळेच विनोबांच्या जनमानसातील प्रतिमेला ठेच लागली. लोकां मध्ये विशेषता तरुण मध्ये ते अप्रिय झाले, उपेक्षिले गेले. नंतर कुठे तरी प्रसिद्ध झाले होते कि , आणीबाणी पुकारल्यानंतर केद्रीय मंत्री श्री वसंत साठे , पवनारला विनोबाला भेटण्यासाठी आले होते. विनोबांच मौन होते. त्यांनी पाटीवर आणीबाणी म्हणजे अनुशासन पर्व? असे प्रश्नचिन्हा सह लिहून दिले. त्याचं सरकारी प्रसिध्द पत्रकात आणीबाणी म्हणजे अनुशासन पर्व असे झाले.
महानुभावांच्या बोलण्यातून विनोबांच मोठेपण अधोरेखित व्हायचं. बॉम्बे मेडिकल एड फौंडेशन च्या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकरिनी विनोबा विषयी आठवण सांगितली, विनोबांना म्हटले डॉक्टर मंडळी समोर बोलायचे आहे काय बोलू . आलोपॅथी श्रेष्ठ कि होमेओपॅथी श्रेष्ठ. विनोबा उतरले सिम्पथी श्रेष्ठ. गीता, गीताप्रवचन, उपनिषद विषयी बोलताना श्री सायनेकरसर विनोबांचा उलेख वारंवार करत असतात. ह्या सर्वा मधून खिडकी थोडी किलकिली झाली, त्या प्रकाश झोतात दिसलेले विनोबा.
कोकणातील कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी बुधवार ११ सप्टेम्बर १८९५ भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विनायकाचा जन्म झाला. वडील नरहरी व आई रुक्मिणीबाई. बालपण बडोद्याला गेले. घरचे ब्राह्मणी वातावरण व संस्कार या मुळे आठ वर्षाचा असतानाच विनायकांनी ज्ञानेश्वरी वाचली. स्वामी रामदासाचे बालपणापासून आकर्षण. इंटरची परीक्षा देण्यासाठी मुंबईला निघलेल्या विनायकांनी गाडी बदलली. घर सोडले. प्रथम कशी येथे गेले. नंतर गांधीजी च्या कोचरब आश्रमात स्थिरावले. काही दिवसानंतर आश्रमातून सुटी घेऊन ते वाई ला वेद , दर्शनशास्र शिकून घेण्यासाठी गेले. या काळात त्यांनी महाराष्ट्र दर्शन घेतले. गांधीजीनी साबरमती सारखा आश्रम वर्ध्याला सुरु केला त्याची जबाबदारी विनोबांना दिली.
विनोबांच जीवन एक प्रयोग भूमी होती. अहिंसा ,सत्य अस्तेय ब्रह्मचर्य, सर्वधार्मासामानात्व, स्वदेशी , स्पर्शभावना यातल्या एकेका व्रतावर त्यांनी साधना केली. अस्पृशता निवारण्या अंतर्गत तीन वर्ष त्यांनी पवनार जवळील सुरगाव या खेड्यात सतत सफाईचे ( भंगी ) काम केले. गरीबाच्या जीवनाशी एकरूप होण्याकरिता त्यांनी मजुरासारखे जीवन पत्करले फक्त दोन आण्यांत बसेल एवढाच आहार घ्यायचा प्रयोग केला, विचारशून्यतेचा, अकर्मावस्थेचा असे अनेक चढत्या भाजणीचे प्रयोग जीवनभर केले..
भूदान पदयात्रेत विनोबा |
१९५१ ला तेलंगणात अशांतीची आग भडकली प्रमुख कारण होते भूमिसामास्या पोचमपल्ली येथील ८० हरिजन कुटुंबांनी विनोबा कडे ८० एकर जमिनीची मागणी केली. आम्हाला जमीन मिळालीतर मेहनत करून आनंदानी राहू. विनोबांनी सांगितले मी तुमचा अर्ज सरकार कडे पाठवीन, तेवढ्यात गावातील एक साधन शेतकर उठले. त्यांनी १०० एकर जमीन दान केली. येथून भूदान चळवळीला सुरवात झाली. भूमिहिनांसाठी जमीनदाराकडून स्वच्छेने ४२ लाख एकर जमीन भूदानात मिळवून विनोबांनी चमत्कार केला होता. त्यासाठी भारतभर पदयात्रा केली.
पदयात्रेच्या भ्रमणामध्ये विनोबांनी हिंदुस्थानच्या तीन कोपर्यात तीन व मध्य भागात तीन आश्रम स्थापन केले. प्रत्येक आश्रमाचे कार्य व उदिष्टे ठरवून दिली.
तत्त्वज्ञानाच्या अभ्यास व जीवनाच्या प्रयोग साठी समन्वय आश्रम बोधगया बिहार. स्रीयांच्या सामुहिक साधने करिता ब्राह्मविध्या मंदिर पवनार. हिंदू मुस्लीम ख्रिश्चन सर्वधार्माशी संपर्क व एकतेचे काम प्रस्थान आश्रम पठाणकोट. नगर अभियाना करिता इंदूर येथे विसर्जन आश्रम , येथील जवळच्या नदीत गांधीजीच्या रक्षेचे विसर्जन झाले होते म्हणून विसर्जन आश्रम म्हणजेच वी-सर्जन विशेष सर्जन.सीमा प्रदेशात मैत्री भावनेसाठी मैत्री आश्रम आसाम.शांती भक्ती आणि प्रीतीचे वातावरण निर्माण व्हावे या साठी वल्लभ निकेतन बंगलोर.
पदयात्रा मध्यप्रदेशात आली असता चंबळ नदीच्या खोर्यातील डाकुंचे हृदयपरिवर्तन करून समाजजीवनात घेतले.
विनोबांच्या स्वाध्याय व चिंतनातून अनेक ग्रंथ , अक्षर वाग्मय तयार झाले. सर्वधर्माच्या अभ्यासातून कुराणसार . ख्रीस्तधर्मसार ,भागवतधर्म सार, रुग्वेद्सार, जपुजी,समनसुंत धम्मपद आदी ग्रंथ. संत वाग्मयाच्या अभ्यासातून , तुकारामची भजने , एकनाथची भजने,रामदासाची भजने, नामघोष सार, नामदेवांची भजने, ज्ञानदेवाची भजने, गुरुबोध सार, इत्यादी ग्रंथ सिद्ध झाले. आईच्या सांगण्यावरून गीतेचा मराठीत पधानुवाद गीताई व गीता प्रवचने साकार जाहली. त्या वेळी धुळ्याच्या जेल मध्ये विनोबांनी गीते वर प्रवचने दिली व साने गुरुजींनी लेखणी बध्द केली. विनोबांनी एका ठिकाणी म्हटले आहे माझे सारे काही जाईल उरेल फक्त गीताई व गीता प्रवचने.
असे हे विनोबा प्राचीन भारतीय ऋषी परंपरेतील शेवटचे ऋषी. त्यांची इच्छा होती कि अमावास्येच्या दिवसी मृत्यू यावा. दिनांक ५ नोव्हेंबर रोजी बाबांना बारीक ताप आला. ९ तारखे पासून औषध - पाणी आहार याचा त्याग केला. १५ नोव्हेंबर १९८२ दिवाळीच्या दिवशी शेवटच श्वास घेतला. पायाने राम हरी चा ठेका अखंड सुरु होता.
विनोबांच्या विचारपोथीतील काही मोती
- " मला काय उपयोग?" असे न म्हणता माझा काय उपयोग असे म्हणावे
- जगाचा कर्ता कोण? - " माझ्या जगाचा मीच कर्ता आहे. " दुसर्या जगाची मला ओळखच नाही.
- स्वरूप सोडू नको. सिद्धांत सोडू नको. मर्यादा सोडू नको.
- आईवरून स्रीवर, स्रीवरून पुत्रावर ही प्रेमाची अधोगती. आई वरून संतावर, संतावरून देवावर ही प्रेमाची ऊर्ध्वगती
- माणसाचे तीन सर्वात मोठे शत्रू आहेत. आळस ,अज्ञान , अंधश्रद्धा
- माणसाचा मुख्य धर्म कोणता? माणुसकी
- दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही. सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.
- अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत.
- मी मैत्रीचे नाते सर्वश्रेष्ठ नाते मानतो. मी सर्वांचा मित्र आहे व सर्वांनी माझे मित्र बनावे हि माझी आकांक्षा आहे ... अर्जुन हा कृष्णाचा भक्त असूनही सखा होता.त्याची सख्यभक्ती मला फार आवडते. आता दास्याभाक्तीचे युग गेले आहे. साख्याभाक्तीचे आले आहे.
No comments:
Post a Comment