गुंतवणुकीची गुरुकिल्ली कार्यक्रम ठरत असताना , आठवत होती लहानपणी ऐकलेली गोष्ट . एक मजूर होता. तो दिवसमजुरी करायचा. दिवसाला त्याला एक रुपया मजुरी मिळत असे. एक दिवस छोटा मालक मजुरी वाटप करण्यासाठी आला. त्याने मजुरी दिल्या नंतर, त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला. मजुराची एक रुपयात गुजराण कशी होत असेल. त्याने मजुराला विचारले या मिळालेल्या रुपयात तू घर कसे चालवतो. मजूर हुशार होता तो म्हणाला चार आणे व्याजी लावतो , चार आण्यानी कर्ज फेडतो आणि आठ आण्या मध्ये आम्ही नवरा बायको गुजराण करतो. मालकांनी विचारले, तुजे व्याजी लावणे आणि कर्ज फेडणे माझ्या लक्षात येत नाही. तू नेमके काय करतो ते सांग. मजूर म्हणाला चार आणे मी आईबाबा साठी खर्च करतो, त्यांनी मला लहानाचे मोठे करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचा उतराई होण्याचा प्रयत्न करतो व चार आणे मी मुलांवर खर्च करतो जे म्हातारपणी माझी काठी (आधार) होतील. वरील गोष्टी तून दोन तीन काय अनेक गोष्टी पुढे येतात. रुपया कसा येतो? आणि कसा जातो? व्याजी लावण्यात व कर्ज फेडण्यात कमीत कमी धोका होता. सामाजिक , कुटुबिक व्यवस्थेमुळे गुंतवणूक बुडत नव्हती. मुंल आईबाबाची काळजी घेत. तसेच गरजा कमी असल्यामुळे कर्ज फेडता येत असे. गुंतवणुकीची पद्धत पूर्वी पासून चालत आली आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ कसा करावा याचा एक विचार होता. अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजेच आपला खर्च उत्पन्न पेक्षा कमी करणे. ऋण काढून सण साजरे करू नये. अशी विचारसरणी होती. उत्पन्न वजा खर्च राहिलेली बचत हा फंडा आता थोडा बदलतोय. उत्पन्न वजा बचत उरलेला खर्च. म्हणजे सक्तीची बचत असा दृष्टीकोन काही मंडळी बाळगताना दिसतात. आर्थिक स्थिती पाहताना मालमत्ता (Assets) व देणी (Liabilities) याचा लेखाजोखा मांडतात. घर पाहावं बांधून लग्न पाहावं करून. हि म्हण घर,लग्न ह्या खर्चिक बाबी म्हणजेच देणी (Liabilities) आहेत असं दर्शवतात पण आपण मात्र घर, चारचाकी, दुचाकी ... इत्यादी गोष्टी (Assets) मालमत्ता समजतो. तसेच मोठे मोठे लग्न , मुंज ,समारंभ या वरती खर्च करणे प्रतिष्ठेच मानतो. मालमत्तेचा सोपा अर्थ ज्या मूळे आपल्या हातात उत्पन्न येते.. व देणी म्हणजे ज्या मुळे आपल्या खिश्यातून पैसा बाहेर जातो. आपल्या मध्ये एक म्हण आहे, पैस्यावाल्या कडे पैसा जातो. कसा जातो हा पैसा हे विचार करण्याची गरज आहे. पैसेवाला आपले पैसे मालमत्तेत गुंतवतो व हेच पैसे त्याला जास्त पैसे मिळवून देत असतात. हे गुंतवणुकीचे तंत्र आपल्याला शिकायला हवे. आपल्या कडे असलेला पैसा आपणासाठी कस काम करेल हे जाणून घ्यायला हवे. पैस्या मधून पैसे निर्मित करणे म्हणजेच पैशाच झाड लावणे.
No comments:
Post a Comment