Sunday, 13 October 2013

देवाचा विश्वास असलेले चित्रकार वासुदेव कामत


शनिवारच्या (१२ ऑक्टोबर २०१३)  चतुरंग मध्ये चित्रकार वासुदेव कामत यांची   मैफल वाचली आणि २ ऑक्टोबर २०१० मध्ये मोगरा फुलला प्रदर्शन पहिल्याची  आठवण झाली. लोकसत्तेतील प्रदर्शनाची बातमी वाचून आम्ही सहकुटुंब जहागीर आर्ट , म्हणजेच कलेच्या पंढरीला गेलो होतो. प्रदर्शन पाहून सगळ्या संताच्या रुपात विठ्ठल दर्शनाचा आनंद मिळाला होतो. ज्ञानेश्वर, तुकाराम,एकनाथ,चोखामेळा , रामदासांपासून ते मीराबाई, जनाबाई, मुक्ताई,नरसी मेहता,शिखांचे गुरु गुरुनानक,शंकराचार्य,   कान्होपात्रा, कबीर,   सूरदास, कनकदास, निवृतीनाथ असे अनेक संत प्रदर्शनात अवतरले होते. एक एक संत वचनाचा/शिकवणीचा  अर्थ प्रकट करणारी चित्र मालिका, मनाला भावणारी. आनंद देणारी होती. कालच्या लेखाने पुनर्प्रत्येयाचा आनंद झाला  .

 
 
 
 
 
 
 
त्यावेळी  आचार्य विनोबा भावे यांच्या  चित्रा  सोबत    चित्रकार कामतांचे छायाचित्र  घेता आले होते त्याचा  आनंद  अवर्णनीय होता. 
 



 
चित्रकार कामतांचा वावर आपल्या परिसरात होता त्यांनी चितारलेले श्रीमत शंकराचार्य मंदिर , निर्मळ 
 
 
चतुरंग मैफल मध्ये सरांनी आपल्यातील चित्रकाराचे  सूर आळवलेले आहेत.त्यामुळे चित्रा मागची त्यांची भूमिका आपल्याला कळते व आपणास चित्र बघण्याची दृष्टी मिळते.  सर म्हणतात 
 
 कलेच्या क्षेत्रात सातत्यशील अभ्यास आणि सराव (रियाझ) तितकाच महत्त्वाचा आहे, कारण कलानिर्मितीसाठी वापरात येणारे साधन हे माध्यम आहे. त्याची यथायोग्य हाताळणी करणारे आपले हात आणि संपूर्ण शरीर हेदेखील माध्यम आहे आणि पुढे जाऊन असे म्हणू की, या शरीराशी संलग्न आपले मन-चित्त हेसुद्धा माध्यमच आहे. या मनाला आणि शरीराला एकाग्रतेचा सराव द्यावा लागतो. अशा सिद्धतेने तयार झालेल्या कलाकृतीमधून मनाला होणारी समाधानाची जाणीव करून घेणारा आपल्यामध्ये कुणी वेगळाच असावा असे वाटते. बहुतेक याच अनुभूतीला ज्ञानेश्वर 'नेणीव' असे म्हणतात. अशा अर्थाने आपण करीत असलेल्या कलानिर्मितीत 'आध्यात्मिक' अनुभूतीचा अंश आहे, असे समजणे गैर नाही.
बालपणी घरून चित्रकलेला प्रोत्साहन होते, तसेच चांगल्या कलाशिक्षकांचे मार्गदर्शनही मिळाले. याबरोबरच अंधश्रद्धेचा स्पर्श होऊ न देता घरातून भक्तिमार्गाची धार्मिक बसकण होती. पुढे योगायोगाने भगवान बुद्धांनी शिकविलेली 'विपश्यना' विद्येची शिबिरे केल्याने आपल्या प्रत्येक कृतीशी आणि विचारांशी स्थितप्रज्ञ होऊन जागरूकतेने पाहण्याची कला आत्मसात करता आली. भगवान बुद्ध 'प्रज्ञा' विषयाचे तीन टप्प्यांत वर्गीकरण करतात. श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा आणि भावनामयी प्रज्ञा. जे जे आपण पाहतो, वाचतो, ऐकतो, इंद्रियांनी अनुभवतो ते श्रुत ज्ञान. याला आपण निरीक्षण (Observation) म्हणू. ही ज्ञानाची पहिली पायरी. त्यानंतर येते ते निरीक्षणासंदर्भातले चिंतन. (Thoughtful Process) या ठिकाणी आपण अनुभवलेल्या गोष्टींचे मूल्यांकन, योग्य-अयोग्य निवड करतो आणि तिसरी पायरी 'भावनामयी प्रज्ञा'ची. याचा प्राचीन अर्थ प्रत्यक्ष कृतीमधून अनुभूती. या तीनही पायऱ्या अभिजात कलेच्या सर्जनप्रक्रियेत अंतर्भूत असतात. यातली एक जरी पायरी वगळली तर ती कलाकृती कमजोर ठरेल. निरीक्षणामुळे त्या निर्मितीला सत्याचा आधार असतो. चिंतनामुळे निरीक्षणाला योजकता आणि रचना कुशलता (creativity) प्राप्त होते. ती कलाकृती केवळ अनुकरण ठरत नाही आणि शेवटी प्रत्यक्ष कृती ही कलाकृतीला साकार रूप देत असते. प्रा. कोलते सरांचे एक चांगले वाक्य आहे. ते एका ठिकाणी म्हणतात की, 'मी पाहून चित्र काढत नाही, तर काढून चित्र पाहतो.' सरांचे हे विधान त्यांच्या कलानिर्मितीचे मूलाधार आहे; अनेक कला विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. माझ्या 'बोध' चित्रांमध्येदेखील मी जे काही दाखवतो ते नुसते पाहून काढलेले नसते तर माझ्या विचारांचे मूर्त स्वरूप असते. 'विचार' हा माझ्या चित्रांचा विषय असतो आणि पूर्ण चित्रांतून तो अभिव्यक्त करण्याचा माझा प्रयत्न असतो.
 
संत कबिरांच्या काही दोह्य़ांवर आधारित मी चित्रे रंगविली त्या वेळी त्यांच्या एका दोह्य़ाने अत्यंत प्रभावी झालो.
कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर।
पीछे पीछे हरि चले कहत कबीर कबीर।।
हरी जाणून घेण्यासाठी हरीचा नामजप करीत भजन करणाऱ्या कबिराचे मन गंगाजलासारखे निर्मल झाले, त्यात आता कुठलीच आसक्ती राहिली नाही. अगदी हरीच्या साक्षात्काराचीदेखील आसक्ती उरली नाही. त्यामुळे ज्याचा नामजप करायचा तो हरीदेखील कबिराच्या मागे राहिला. आत्मज्ञानाचा साक्षात्कार झालेला कबीर आपल्या मस्तीत चालला आहे आणि त्याच्या मागून हरी कबिराच्या नामाची माळा जपत अनुसरण करतोय असे हे चित्र. या चित्रात भगवंताचा चेहरा दाखविलेला नाही. जणू तो आपला 'नेति नेति' असा परिचय घेऊन चालला आहे.
जेव्हा हे चित्र तयार झाले तेव्हा सर्व संतांच्या ओळींचा साक्षात्कार त्या त्या संतांना कसा झाला असावा याचा विचार करून 'मोगरा फुलला..' हे चित्रमालिका रंगविण्याचे ठरविले. या चित्रमालिकेने मला खूप काही दिले. विचारांना आणि चित्रांना आध्यात्मिक रंग कसा चढतो याची अनुभूती मला आली. आकाशगुंफेच्या उंबरठय़ावर बसलेले ज्ञानेश्वर, ताटी उघडा म्हणून साद घालणारी मुक्ताई, मंदिराच्या बंद दरवाजाबाहेर विठू रूप घेऊन नाचणारा चोखामेळा, 'इथं का उभा तू श्रीरामा' म्हणून विठ्ठलाला जागविणारे रामदासस्वामी, 'ठुमक चलत रामचंद्र' म्हणणारे संत तुलसीदास आणि असे एकेक करीत नास्तिकालाही आस्तिकतेचे भान आणणारे अगदी अलीकडचे संत विनोबापर्यंत अनेक संतचित्रांनी माझ्या मनावर खोलवर संस्कार केले. प्रदर्शनात साश्रुनयनांनी चित्रातल्या भावार्थाशी तादात्म्य पावणारा रसिक प्रेक्षक पाहिला. तो अपूर्व सोहळा होता.


No comments:

Post a Comment