मादाम क्युरी शालेय जीवनात भेटली होती. रेडियम च्या शोधासाठी नोबेल पारितोषक मिळवणारी पहिली महिला शास्रज्ञ. मादाम क्युरीचं चारित्र्य वाचल्या नंतर कळतं कि अनेक क्षेत्रात ती सर्वप्रथम , एकमेव , अपूर्व , अव्दितीय होती आहे. फ्रान्सच्या जगप्रसिद्ध सोर्बोन विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवणारी पहिली विद्यार्थिनी , जगभरातून भौतिकशास्र विषयात हि पदवी मिळवणारी पहिली महिला. नोबेल पारितोषक मिळवणारी पहिली महिला तर होतीच शिवाय दोन वेळा नोबेल पुरस्कारावर नाव कोरणारी ती सर्वप्रथम व्यक्ती होती. एकापेक्षा जास्त नोबेल पुरस्कार पटकावणारी ती आजता गायत एकमेव स्री आहे.
मारिया स्कोदोवास्की चे आई वडील शाळेत शिक्षक होते. वडील व्लादिस्ताव स्कोदोवास्की गणित व भौतिकशास्र विषयाचे शिक्षक होते. आणि या विषयाचे ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असत. मारियाचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७.चार भावंड, मारिया सर्वात लहान. लहानपणा पासूनच मान्याला वाचनाची आवड होती. आईलाच तिला खेळायला जा असे सांगायची वेळ यायची. मारियाची भावंड अभ्यासात हुशार होती. १२ जून १८८३ साली मारियाने सुवर्ण पदक पटकावून शालेय शिक्षण पूर्ण केले. घरच्या गरबी मुळे पुढचे शिक्षण घेता येत नव्हते. त्याच वेळेला सर्व तरुण पिढीचं प्राथमिक स्वप्न, मातृभूमीची सेवा करण्याच होतं. पोलंड (पोलीश जनता) रशियाच्या अत्याचाराला कंटाळली होती. मारीच्या मोठ्या बहिणीला (ब्रॉन्याला ) परदेशी जाऊन (मेडिकल) वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पदवी संपादन करायची होती. मारीने आपल्या बहिणी बरोबर ठरवले, ती खासगी शिक्षिकेची नोकरी करेल व ब्रॉन्याला शिक्षणासाठी मदत करेल. ब्रॉन्याने शिक्षण पूर्ण झाल्या नंतर मारिला शिक्षणासाठी मदत करायची. जवळजवळ पाच वर्ष मारीने शिकवणी करून ब्रॉन्याला मदत केली. पाच वर्षा नंतर मारी पुढील शिक्षणासाठी पॅरिसला गेली, अत्यंत काटकसरीने राहून सोर्बोन विद्यापीठातून भौतिकशास्र (१८९३) व पुढच्यावर्षी गणित (१८९४) विषयात मास्टर डिग्री संपादित केली.
पिएर क्युरी एक प्रतिभासंपन्न फ्रेंच शास्रज्ञ, त्याच्या बरोबर प्रयोगशाळेत काम करत असताना दोघांच प्रेम झालं २६ जुलै १८९५ रोजी विवाहबद्ध झाले. आपल्या प्रेमाच्या माणसाबरोबरीने विज्ञान संशोधनात रत राहणे हे दोघांचे ध्येय झालं. रेडियम च्या संशोधनाच्या वेळी पिएरने आपले काम बाजूला ठेवून मारीच्या कामात मदत केली. त्याच्या कामात सुसंवादाची आणि उदात्त सहकार्याची भावना होती. त्यांनी जोडीने बत्तीस विविध शास्रीय लेख , प्रबंध प्रसिध्द केले. उदाहरणार्थ रेडियमच्या किरणाचे रासायनिक परिणाम , किरणोत्सारी पदार्थाविषयी इत्यादी. त्याच्या ह्या कामासाठी १० डिसेंबर १९०३ रोजी भौतीकशास्राचं नोबेल पारितोषक किरणोत्साराच्या संशोधनासाठी हेनरी बेकरेल आणि क्युरी दांपत्यास विभागून दिलं गेलं.
रेडियम च्या संशोधना विषयी पेटंट किंवा मालकी हक्क घेणं दोघांनाही मान्य नव्हतं. पेटंट घेणे शास्रीय नितीमुल्याच्या विरुध्द आहे असं त्याचं मत होतं मारीने लिहून ठेवलं आहे कि आपल्या संशोधनाचे कोणतेही व्यापारी फायदे आपण स्वीकारायचे नाहीत व संशोधनाची सर्व निरीक्षणं व निष्कर्ष शुद्धीकरण प्रक्रियेच्या कृतीसह संपूर्णपणे प्रसिद्ध केली. या दोन समसमान प्रज्ञावंता कडे एकमेकाबद्दल प्रेमभावना होतीच, आदर हि होता. १९ एप्रिल १९०६ रोजी पिएर च्या अपघाती निधनाने दोघे विलग झाले.
पिएर चा वारसा चालवण्याची जबाबदरी मारी क्युरी वर आली तिने ती समर्थपणे पेलली व वेगवेगळ्या ठिकाणी रेडियम संशोधन केंद्र उभारली.
पिएर च्या पश्चात आपल्या दोन्ही मुलीं आयरिन आणि ईव्ह यांच्या संगोपनाची सगळी जबाबदारी पार पाडली. मुलींनी काटक आणि कणखर बनावं असा मारीचा प्रयत्न होता.मुलींना तासाभराचं शरीरिक व बौद्धिक काम नेमून दिलेलं असे त्यांच्या प्रगतीच्या नोंदी ठेवलेल्या असत. मुलीच्या वाट्याला फार जास्त आरामाचं आयुष्य यावं हेही मारिला नको होतं.
मारीच्या मतानं गरीब असणं हे गैरसोयीचं असतं खरं पण फार श्रीमंत असणं हे अनावश्यक अन धक्कादायक हि आहे. मुलींनी त्यांच्या उत्तरआयुष्यात स्वत:पुरतं कमावून उदरनिर्वाह करावा हेच तिच्या दृष्टीने निरोगी आणि स्वाभाविक होतं. म्हणूनच पिएर च्या मृत्यूनंतर सरकार तर्फे निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव आणला होता. मारीने तो नाकारला.
आपल्या शास्रज्ञ पतीच्या निधनानंतर संशोधनात सिद्ध केलेल्या कर्तबगिरी करिता मादाम क्युरीला १९११ या वर्षीचं रसायनशास्राचं नोबेल पारितोषक दिलं गेलं . तिने हा पुरस्कार आपल्या पतीला समर्पित करताना सांगितलं कि रेडियम आणि पोलोनियम या मूलद्रव्याचा शोध लावण्याच्या कामात माझ्या इतकाच माझ्या पतीचा पिएर चा वाटा आहे.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी मारीनी स्वय:सेवी संस्थेच्या मदतीने रेडियोलॉजीकल कार बनवली व जखमीच्या तपासणीसाठी उपलब्ध केली. अश्या वीस मोटारगाड्या व सुमारे दोनशे कायम स्वरूपी क्षकिरण केंद्र उभारून दिली. या केंद्रातर्फे युद्धकाळात तपासल्या गेलेल्या जखमी जवानांची संख्या अंदाजे दहा लाखात होती.
मादाम क्युरीनी दोनदा अमेरिकेला भेट दिली पहिल्या भेटीच्या वेळी त्यांना एक ग्राम रेडियम अमेरिकन अध्यक्षाच्या हस्ते भेट देण्यात आला. त्यावेळी भेटवस्तूच्या करारा मध्ये मादाम क्युरीने बदल करवून घेतला. भेट देण्यात आलेला रेडियम माझी नव्हे तर विज्ञानाची मालमत्ता आहे. माझ्या मृत्युनंतर रेडियम माझ्या मुलीची मालमत्ता होईल असं होता कामा नये रेडियम ची हि देणगी माझ्या प्रयोगशाळेला दिली जावी. अशीच दुसरी अमेरिका भेट मारिनी केली आणि त्यावेळी दिलेला एक ग्राम रेडियम वार्सो येथील रेडियम प्रयोगशाळेला संशोधना साठी देण्यात आला.
मादाम क्युरी चं सर्वोत्कृष्ट असण्याचं गुपित काय होत? त्यांच्या एक सहका-याने म्हटलं आहे. सर्वात मोठं आणि सर्वश्रेष्ठ कारण म्हणजे मदमाची रेडियम इ वर असलेली अढळभक्ती.
अनेक वर्षे किरणोत्सर्गी पदार्थ हाताळण्याचा दुष्परिणाम मारीच्या शरीरावर झाला होता. तीला पर्निशियस ऑनामिया ने गाठलं (रक्ताचा पंडुरोग ) त्यातंच ४ जुलै १९३४ रोजी जगाचा निरोप घेतला.
संदर्भ मादाम क्युरी मराठी अनुवाद अश्विनी भिडे-देशपांडे ग्रंथाली प्रकाशन.
Quotes of Madam Curie.
- “Be less curious about people and more curious about ideas.”
- “Nothing in life is to be feared, it is only to be understood. Now is the time to understand more, so that we may fear less.”
- “You cannot hope to build a better world without improving the individuals. To that end,each of us must work for our own improvement and, at the same time, share a genaral responsibility for all humanity, our particular duty being to aid those to whom we think can be most useful.”
- “Scientist believe in things, not in person ”
- “Nothing in life is to be feared. It is only to be understood.”
- “One never notices what has been done; one can only see what remains to be done.”
- “Radium is not to enrich any one. It is an element; it is for all people.”