Sunday, 9 October 2016

शहाणं करणारं सप्तक



     
सप्तक ,प्रा महेश एलकुंचवार यांच्या सात भाषणांचं पुस्तक. वास्तवाचं भान आणून, विचारांना चालना देऊन  अंतर्मुख करणारी ही भाषणं.मुळातच वाचायला हवीत.  त्यांच्या नाटकांच्या विषया बद्दल , भाषे विषयी ते परखड आत्मपरीक्षण करतात. त्यातील काही त्रुटी बद्दल ते मोकळे पणे बोलतात आणि विकासातला एक टप्पा म्हणून स्वीकार करतात. आपल्या नाटकातील बलस्थानं, त्यातील भाषेचं महत्त्व विशद करून आपल्याला एक नवीन दृष्टिकोन ही देतात. 
.' वाडा चिरेबंदी' या नाटकाची पार्श्वभूमी सांगताना म्हणतात, स्वातंत्र्योत्तर काळात ब्राहमण कुटुंबाचं  विशेषतः खेड्यातल्या- गुदमरणे , त्यांची पडझड मला स्पष्ट दिसत होती. ही प्रक्रिया अजून संपलेली नाही. जुन्याची मोडतोड होते व नवीनचा स्वीकार करवत नाही अशा वेळी माणूस शाश्वत काहीतरी शोधात असतो आणि मानवी संबंधाइतकं, त्यातल्या ताणासह  शाश्वत दुसरं काय आहे? सर्व प्रक्रियेत माणसाचं हीण  आणि त्याचा भलेपणा असं काही हातात हात घालून येतात, की पाहणारा विस्मितच होतो. वाडा चिरेबंदी मधल्या माणसांसमोर अंधारच आहे. पण त्या अंधारात स्वतःचे क्षुद्र स्वार्थ जपता जपताच त्यांचा परस्परांसाठी जीवही तुटत असतो. सर्वांच्या तळाशी असते नितळ माणुसकी. मानवी जीवनातीलं,धूसरपणे का होईना, जाणवलेलं हे सत्य. 
आपली खेड्यातील संस्कृती  लोप पावत चालली आहे  याच वर्णन करताना म्हणतात, खेड्यात गिरणी आल्याबरोबर जातं गेलं व ओवीही गेली. विहिरीवर पंप आल्याबरोबर मोटेवरची गाणी गेली. टीव्ही  आल्याबरोबर देवळातली कीर्तनं ओस पडू लागली. 

मूळं  न हरवलेला समाज मागे वळून पहात नाही; त्याची नजर पुढेच असते- भविष्याकडे.  मागचा एखादा धागा, एखादी परंपरा जीर्ण झाल्यामुळे, निरुपयोगी झल्यामुळे तुटला; तरी त्या समाजाच्या आत्मविश्वासाला धक्का बसत नाही. कारण जुनं गेलं तरी नवीन परंपरा , नवीन विचार, नवीन कलाप्रकार हा समाज निर्माण करीतच असतो. 
 
ललित लेखना विषयी म्हणतात , या लेखनातली व्यैयाक्तिकता जर गळून पडली नाही, अनुभवाचं  साधारणीकरण झालं नाही तर लेखनाचा अर्थ संकुचिततेमुळे नष्टप्राण होईल. आपल्या अनुभवापेक्षा आपण नेहिमीच लहान असतो. अनुभव व्यक्त करताना लेखकानं स्वतःचा मी पणा एका मोठया सार्वभौम मी पणात वितळवला तर त्या अनुभवाला कलेचं स्वरूप प्राप्त होतं. ललित लेखनाचा प्रवास कसा असावा हे सांगताना रॉबर्ट फ्रॉस्टनंचं उल्लेख देतात अश्या लेखनाची सुरवात आनंदातून होते व त्याचा शेवट होतो तेव्हा आपल्याला एक शहाणपण आलेलं असतं.

भाषेविषयी काय म्हणतात बघा  ज्या मानवसमूहाने आपली भाषा गमावली, हरवली आहे त्यांची संस्कृती मृतप्राय व्हायला वेळ लागत नाही, कारण भाषा हा संस्कृतीचाच हुंकार असतो. 

ज्याला एक भाषा उत्तम येते, त्याला दुसरीही भाषा उत्तमच येते  . कारण अशा व्यक्तीनं भाषा मूल्यवान आहे , तिला स्वयंशिस्त आहे व शुद्धता हा तिचा निकष आहे हे तत्त्व अंगी बाणवलेलंच असतं. असं तत्त्व अंगीभूत केलेल्या माणसाला जबाबदारीची जाणीव असते व भाषेची मोडतोड करून तो भाषेचा व स्वतःचाही सन्मान खंडित होऊ देत नाही. 

भाषा हरवलेला समाज,परक्या भाषेवर गुजराण करू पाहणारा  समाज  नकळतच कणाहीन होतो. स्वतः जवळ बढाई मारण्यासारखं काही उरलं नाही की ती उणीव मोठे मोठे शब्द वापरून आपण भरून काढतो.


घरोघरीचं चित्र  कसं नेमकं उभं केलं आहे . दुस-याला जबाबदार धरण्याची आणि स्वतःची जबाबदारी टाळण्याची  वृत्ती. कशी मांडली आहे बघा.  

अ ब्लू स्टॊकिंग म्हणजे विदुषी ,   वर्गात विचारलं सांगा बरं महाराष्ट्रातल्या ब्लू स्टॊकिंग  कोण? वर्गात शांतता , मग मीच म्हटलं पंडिता रमाबाई , इरावती कर्वे , दुर्गाबाई भागवत , मालतीताई बेडेकर , शकुंतला परांजपे ही नावं माहित नाही तुम्हाला? शांतता. ८० मुलांचा वर्ग, पण ८० घरात ही वंदनीय नावं निघत नव्हती, त्या पोरांना काय दोष द्यायचा. या दु:स्थितीला जबाबदार कोण हे स्पष्ट आहे. या अनुभवावरून आपण आता तरी सावध होणार की नाही?

जन्मलेला प्रत्येक जीव छळणारे प्रश्न घेऊन येतो आणि जन्मभर उत्तरं शोधत राहतो. अखेर आयुष्यात सापडतं काय? तर आणखी प्रश्न. उत्तरं सापडतच नाहीत. असंही असेल की उत्तरं नसतातच. प्रश्नच फक्त असतात. 

जीवनाचा अर्थ सांगण्यासाठी , उपनिषदांपासून अगदी कृष्णमूर्तीपर्यंत सा-यांनी उत्तरं देऊन ठेवलेली आहेत. पण ती उपयोगाला येत नाहीत. कितीही मूलभूत असली, तरी ती दुस-याची उत्तरं. त्यानं आत्मप्रत्यय कसा येईल? वाचून माहिती मिळते. त्या माहितीचं आधी ज्ञान झालं, भाग्यवान असाल तर, ते ज्ञान अनुभव झालं तरच काही विसावा. वाचलेल्या उत्तरांनी बुद्धीचं समाधान होईल कदाचित; पण मन शांत नाहीच होत.


भाषा आपलं बोलणं ,वागणं  देहबोली , संस्कृती कसं बदलतं हे पहा. 
तरुण पिढीची मराठीची झालेली फारकत व इंग्रजीशी सलगी त्यांच्या देहबोलीतूनसुद्धा व्यक्त होऊ लागली आहे. इंग्लिश भाषेबरोबर येणारी देहबोली त्यांनी अंगिकारली आहे. कुठल्याही फुटकळ कारणानं आनंद झाला की ही मंडळी उजव्या हाताची मूठ उंचावून हे $ $ असा चित्कार करतात. त्यामागोमाग किंकाळ्या,मिठ्या व उपहारगृहात जाऊन खाणं, अभिजात संस्कृती नाही. आनंदच्या आविष्काराची ही आवाजी व उथळ पद्धत आली तरी केव्हा व कशी आपल्यात? मग केव्हातरी लक्षात आलं की मनात आनंद नसतोच मुळात. मग बाह्य कारणं शोधावी लागतात, किंकाळून स्वतःला खात्री करून द्यावी लागते की आनंद झाला आहे बरं आपल्याला. 

 


असे अनेक विचार या भाषणातून व्यक्त झालेलं आहेत जे आपल्याला अंतर्मुख करून विचार करायला लावतात व अंतरी शहाणपण जागवत राहतात.  वाचायलाच हवं श्रेणीतील पुस्तक 

No comments:

Post a Comment