Friday, 21 July 2023

अमरनाथ यात्रा २०२३

  

 

   



अमरनाथ भारतातील काश्मीर राज्यामधील अनंतनाग जिल्ह्यातील पवित्र तीर्थस्थळ!      येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा  श्रीनगर पासून साधारणपणे १४१ किमी वर आहे. दरवर्षी येथे बर्फाचे नैसर्गिक शिवलिंग तयार होते.त्यांना भूमनी शिवलिंग किंवा  बाबा बर्फानी असेही म्हटलं जाते. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रूप समजले जाते. या गुहेत शिवाने पार्वतीला जीवन मृत्यू,अमरत्वाचे रहस्य सांगितले. ते सांगत असताना कबुतराच्या जोडीने ते ऐकले अशी दंतकथा आहे.गुहेत दर्शनाच्या वेळी कबुतरांचे दिसणे पवित्र मानले जाते.

 

       



ही  यात्रा खडतर मानली जाते. तरी लाखो भाविक दरवर्षी श्री बर्फानी बाबाचं दर्शन घेत असतात.काय कारण असावं, जीवन  मृत्युचं रहस्य जाणावं क्षणोक्षणाला बदलणा-या निसर्गाचे रुद्र रूप पहावे, द-याखो-या तील  संगीत ऐकताना हृदयातील तार छेडली जाते की पहावे,स्वत:ची मर्यादा जाणावी,निसर्गाचे भव्य रूप न्याहाळावे. आम्ही पण अमरनाथ यात्रा केली.अशी अनेक उद्दिष्टे, एक साहस,गिर्यारोहण म्हणूनही या यात्रेकडे पाहिलं जाते.

 

एकमात्र नक्की की तुमची यात्रा पूर्ण होणे न होणे निसर्गावर अवलंबून असते. वातावरणातील बदल क्षणात घडत असतात. थंडी असतेच परंतु पाऊस,वादळवारे कधीही घोंघावू शकतात.डोंगर एकदम ठिसूळ त्यामुळे कडे कोसळणे नित्याचं. डोंगराकडे पहिले तर मातीवर असलेले थर दिसतात. हात लावला तर वरच्या मातीचा ठिसूळपणा जाणवतो. अशी  सर्व परिस्थिती मूळ भारतीय मानसिकतेला बळकटी देते.नतमस्तक होऊन दैवी कृपा असं म्हणून यात्रचे श्रेय ह्या महाशक्तीला देतात.


 दैवी कृपा म्हणून गप्प बसणारे भारतीय नाहीत. श्रीमद आद्य शंकराचार्य,आधुनिक काळातील स्वामी विवेकानंद यांचे आदर्श खुणावतात.कठीण परिस्थितीत दोन दोन वेळा भारतात पदभ्रमण करणारे हे महात्मे भारतीय मानसिकतेतील सुप्त ओढ जागृत करीत असावेत.अज्ञानतेचा शोध , 'चरवैती  चरवैती' या वृत्तीला साथ लाभली ती विज्ञान तंत्रज्ञानाची.             शारीरिक मर्यादेवर विज्ञानाने  हेलीकॉप्टर च्या रूपाने भरारी घेतली आणि अमरनाथ यात्रा असंख्य लोकांच्या आवाक्यात  आली. पंगु लंघयते गिरीम्.

अमरनाथ यात्रेसाठी प्रत्येकासाठी यात्रा परवाना आणि आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. अधिक माहिती श्री अमरनाथ श्राइन बोर्डच्या वेबसाईट वर आहे.




 अमरनाथ यात्रेतील भारत सरकार, भारतीय लष्कर याचं नियोजन,लंगर सेवेतील वेगवेगळ्या संस्थाचा सहभाग हा दैवी सहयोग.भारतीय सैन्य , सुरक्षाव्यवस्था,अतिरेकी, विघातक दानवी वृत्तीला  काह्यात ठेवून आहे.यात्रेकरुनी सर्व नियम पाळून व्यवस्थेला बळकटी आणणे अत्यंत महत्वाचे आहे.    अमरनाथ यात्रेचे दोन मार्ग आहेत. एक पहेलगाम -चंदनवाडी – पंचतरणी. दुसरा मार्ग सोनमार्ग, बालताल  – पंचतरणी.


 



श्रीनगर हून ८ जुलैला बालताल ला पोहोचलो तंबूत राहण्याची व्यवस्था होती.रात्रभर पाऊस आणि जोरदार हवा होती. जेवणाची व्यवस्था लंगर मध्ये होती मुक्त जेवण, अट एकच अन्न वाया घालवायचं नाही. ९ ला सकाळी बावताल ते निलग्राथ हेलीपॅड वर पोहचलो. खराब हवामानामुळे  ७ आणि ८ जुलै रोजी हेलिकॉप्टर सेवा बंद होती. ९जुलै सकाळी सेवा सुरु झाली आणि आमचा नंबर लागला. त्या अगोदर आरफ आयडी बनवून घेणे आवश्यक आहे. पुढे तुमची ओळख म्हणजे हे कार्ड. निलग्राथ ते पंचतरणी प्रवास हेलिकॉप्टरनी सात मिनिटाचा आहे. पंचतरणी वरून पवित्रगुफा सात किमी अंतरावर आहे.हा प्रवास घोड्यावरून किंवा डोली मधून करता येतो.दोन दिवस बंद असल्यामुळे गर्दी कमी होती. भोले बाबाचं छान दर्शन झालं. कबुतर दिसली.परतीच्या प्रवासात उशीर झाल्यामुळे पंचतरणीला तंबूत वस्ती केली व सकाळी पंचतरणी ते निलग्राथ,बालताल, व्हाया श्रीनगर असा परतीचा प्रवास झाला. दैवि कृपेमुळे अमरनाथ यात्रा सफल संपूर्ण झाली.



                                                                                 

 

 

 

1 comment:

  1. यात्रेचे महत्व आणि तेथील एकंदर वातावरणाबाबत दिलेली माहिती त्रोटक पण पुरेशी...👌

    ReplyDelete