Friday, 2 June 2023

मंदिरात देव असतो!

 

देव देव्हा-यात नाही, देव नाही देवालयी ! गदिमा लिखित बाबुजींनी गायलेलं फार सुरेख गीत आहे. सध्या राहुल देशपांडे गायले आहेत.  युट्यूब वर उपलब्ध आहे, निवांत पणे  ऐका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल.

                                          देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी

                                          देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई.

हे सर्व मनाला पटतंय आणि  जग विरोधाभासांनी भरलेले आहे याचं प्रत्यंतर  ताबडतोब येते . एक ठिकाणी देव देवळात नाही असं म्हणायचं आणि अतिभव्य मंदिरं उभारायची. देव आपलासा करण्याची पुण्याई आपल्या जवळ नाही. कशाला उभारायची ही देवालयं. तो तर चराचरी आहे. म्हणजे मंदिरं देवासाठी नाहीतच. ती आहेत आपल्या साठी. त्या सर्वाशक्तीमान तत्वापुढे नतमस्तक व्हावं, कृतज्ञता व्यक्त करावी. प्रार्थना करावी. प्रार्थनेचा एक अर्थ आहे स्वत:च्या  अंत:करणात स्वत:चा शोध घ्यायचा. हे तर घरी ही करता येईल. मग सार्वजनिक ठिकाणं का? कारण सृष्टीच्या निर्मात्यांने सहजीवनाची साखळी निर्माण केली आहे. एका वर्तूळीय कृतीमध्ये विश्वाची रचना केली आहे. कोणी प्राणवायु सोडायचा कोणी तो घ्यायचा. सोडलेला कार्बनडाय वायू कोणी शोषायचा. अश्या प्रकारे सृष्टीतील घटक एकमेकांवर अवलंबून आहेत.   मंदिरं   अश्यासाठी की आम्ही सामुदायिक रित्या एकमेकांच हित जपून प्रगती साधू. म्हणूनच  ॐ सह नाववतु । म्हणत असतोना. नराचा नारायण मध्ये प्रकटन व्हावं म्हणून मंदिरं असतात. कोणीतरी म्हटलंय नर मध्याबिंदुवर आहे. एका बाजूला वानर आहे तर दुस-या बाजूला नारायण आहे.  वानर बनायचं की नारायण बनायचं ह्या दोन्ही संधी  नराला समान उपलब्ध आहेत. वर उल्लेखलेलं गीत अनेक प्रश्न सोप्पे करून सांगते.

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे
तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही.

आपण देव मूर्तीत शोधत बसतो, ते सांगते, देव मूर्तीत मावत नाही सर्व व्यापून दशागुळे वर राहतो. थोडं  नतमस्तक व्हा. (शीर झुकवून पहा ) तो आपल्यात आहे. तुझ्या माझ्या मध्ये आहे. तो दिसण्यासाठी दुराग्रह , अंहकार  षडरिपू  सोडायला हवेत. एकदा तो सर्वाभूती आहे हे आकळले की एकमेकांना  समजून घेणे सुलभ होते. सहमत झालो नाही तरी आदर केला जातो.

देव स्वये जगन्‍नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही.

गावातील देवतेचे मंदिर म्हणजे ग्रामदेवता. गावाची देवता गावातील बाळगोपाळ , लेकुराची साभाळ, करते ( महालक्ष्मी मातेच्या गोष्टी ऐकिवात आहेत)  तिच्या कृपेने  गावात शांतता नांदते  रोगराई दूर पळते , आरोग्य नांदते.  अशी लोकभावना आहे.

नामदेव महाराज सांगतात

अहंकाराचा वारा न लागो राजसा |

माझ्या विष्णुदासा भाविकांसी ||||

नामा म्हणे तया असावे कल्याण |

ज्या मुखी निधान पांडुरंग ||||

 

देवतेच्या मनाविरुद्ध काही घडलं तर देवता काय करेल. कवी कुसुमाग्रज यांची गाभारा म्हणून  सुप्रसिध्द कविता आहे. कथा अशी आहे कि एका महारोगी भक्ताला देवळात प्रवेश नाकारला जोतो. देवाला हे कसं आवडणार. तो भक्त बाप्पा बाहेर ये अशी साद घालतो आणि देव गाभारा सोडून बाहेर पडतो.

पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव

उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला

कोणी एक भणंग महारोगी

तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”

आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय

गाभारा रिकामा  .

 

देवाची संकल्पना मानवाची, देवत्व जपण्याची, सामाजिक सलोखा , सांस्कृतिक एक राखणे ही जबाबदारी मानवाची.

देवाच्या उत्सवात एकोपा, सद्भावना जोपासायला हवी हीच सर्वांची  म्हणजेच प्रत्येक गावक-याची जबाबदारी आहे. गावातील या आनंदाच्या क्षणी सर्व सुखी आनंदी होवो.

1 comment:

  1. तसं पाहिलं तर रोज नवीन शिकण्याची, स्वतःला अपडेट करण्याची गरज आहे, कधी कधी एकोपा राखण्यासाठी स्वतःचे मन मारावे लागते. छान चिंतन..

    ReplyDelete