Thursday, 24 January 2013

आत्मविश्वास व प्रेरणा जागृत करणा-या विध्यार्थिनी

 


प्रेमा जयकुमार

  प्रेमा जयकुमार ---- रिक्षाचालकाची मुलगी सीए परीक्षेत देशात पहिली  .
 जिद्द आणि परिश्रमाची तयारी असली तर यशस्वी होणे फार अवघड नसते. कठीण परिस्थितीवरही सहज मात करता येते, याचा प्रत्यय चार्टर्ड अकाउंटट (सीए) या कठीण मानल्या जाणा-या परीक्षेत देशातून पहिल्या आलेल्या प्रेमा जयकुमार या रिक्षाचालकाच्या मुलीने पुन्हा दिला आहे.
घरची परिस्थिती बेताची असूनही प्रेमाने ७५.८८ टक्के गुण मिळवून हा बहुमान मिळवला. मालाड पूर्वेला असलेल्या एस. बी. खान चाळीत एकाच खोलीच्या घरात ती राहते. सीए प्रवेश परीक्षेतही ती पहिलीच आली होती. नोव्हेंबर २०१२मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स इन इंडियाने घेतलेल्या या परीक्षेला देशभरातून ५१ हजार ९०६ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा देशातील ३४३ परीक्षा केंद्रांवर झाली होती. 

आपण चाळीत राहतोय याची खंत असली तरी त्याकडे मी कधीही लक्ष दिले नाही. मुंबई विद्यापीठातून बी. कॉम आणि पुढे एम. कॉमची पदवी पूर्ण करताना अनेक शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सीएच्या परीक्षेसाठी महागड्या क्लासेसला जाता आले नसले, तरी सीए व्हायचेच, हा ध्यास मी घेतला होता. अभ्यास आणि वेळेचे नियोजन केल्यामुळे यशाची खात्री होती. पण देशात टॉपर ठरेन असे वाटले नव्हते. या यशात आई-वडील आणि शिक्षकांचे सर्वात मोठे श्रेय आहे. - प्रेमा जयकुमार




धनश्री तोडकर

धनश्री तोडकर     झोपडीत राहणारी कोल्हापूरची झाली सीए  

पाच बहिणी, एक भाऊ,   आई-वडील अन् घरचे दारिद्र्य अशा दुर्धर स्थितीत मुळाक्षरे गिरविणेही कठीण ठरावे. पण 'शिकून मोठं व्हायचय' हे एकच स्वप्न उराशी बाळगलेल्या कोल्हापूरच्या धनश्री विलास तोडकर या विद्यार्थिनीने स्वप्नपूर्ती केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत धनश्री चार्टर्ड अकौटंटची कठीणतम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.  कोल्हापुरातील कमला कॉलेजच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमध्ये   तिच्या आजीसमवेत वडील ४० वर्षांपूर्वी  राहायला आले. आठवीपर्यंत शिक्षण झालेले वडील आणि सातवीपर्यंत शिकलेली आई यांचा गरिबीत संसार सुरू असताना एका पाठोपाठ एक सहा मुली जन्मल्या. त्यानंतर एक मुलगा. सुरुवातीची २० वर्षे नोकरी आणि पुढची तितकीच वर्षे चहाचा गाडा चालविणाऱ्या विलास तोडकर यांनी मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. दोन मुली शिक्षिका झाल्या. एक दवाखान्यात स्वागतिका अन् दोघी पदवीधर होऊन संसारात रमलेल्या.
धनश्रीने  मात्र  खूप शिकावे ही पालकांची इच्छा. १२ वीच्या वाणिज्य शाखेत शिकत असताना तिने ती पूर्ण केली. २००४ मध्ये गुणवत्ता यादीत ती १७ वी आली. त्याच दिवशी आताचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तिची भेट घेऊन शिक्षणाचा सर्व खर्च पूर्ण करण्याचा शब्द दिला. आज ती सी. ए. झाली असताना त्यांचा शब्दही खरा ठरला. १२ वी नंतर धनश्रीने सी.ए.व्हायचे ठरविले. कोल्हापुरातील आर. बी. भागवत अँड कंपनी या चार्टर्ड अकौटंट कंपनीत ती शिकत होती. तेथे नोकरी असलेली दीपाली गोरे व नीलेश भालकर यांनी शिकण्यासाठी तिला मदत केली. शिकवणीसाठी जाणाऱ्या प्रा. श्रीमती घेवारी यांनी तिचे मनोधैर्य वाढविले. थोरली बहीण उमा जाधव हिने तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
घरच्या गरिबीमुळे अनेकदा तिला शिक्षण थांबवून नोकरी करण्याची इच्छा होत असे.  सी. ए.  करताना अ‍ॅग्रीगेट सादर करताना तो विषय राहिला की तिला खूपच वाईट वाटायचे. एक विषय राहिल्यामुळे सगळ्या विषयांची परीक्षा पुन्हा देताना नव्याने अभ्यासाचे कष्ट उपसावे लागत असे. मुळातच अभ्यासासाठी घरी जागा नसायची. वडिलांचा चहाचा गाडा असलेल्या डॉ. निगडे हॉस्पिटलमध्ये अभ्यासासाठी जागा उपलब्ध झाली. तिचा पुरेपूर वापर करीत ती सी. ए. चा कठीण असणारा अभ्यास तेथे पूर्ण करीत राहिली. अभ्यासातून वेळ काढून धनश्री आईच्या मदतीसाठी उभी राहात असे. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करीत ती पुढे शिकत राहिली आणि आज सी.ए.होऊन आयुष्याच्या यशाचे गणित सोडविण्यात ती यशस्वी ठरली आहे.
          सीसा, डीसा यासारखे उच्च शिक्षण घेण्याचा धनश्रीचा मानस आहे.


               दोघींना मनापासून शुभेच्छा !!!

No comments:

Post a Comment