Saturday, 2 September 2017

विंदांच्या सहवासात एक स्मरणीय कार्यक्रम
                                



विंदांच्या जन्म शताब्दीनिमित्त्य २३ ऑगस्ट २०१७ लापॉप्युलर प्रकाशनतर्फे यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमात सत्याचा शोध घेणारे विंदा, विज्ञान आणि कविता यांचा मिलाफ घडवून आणणारे, मार्क्स ,ज्ञानेश्वर यांना आपल्या कवितेत आणणारे विंदा, खोडकर-मस्तीखोर छोटे होत छोटय़ांच्या विश्वात धम्मालमज्जा करणारे विंदा.. अशा विंदांच्या बहुपेडी व्यक्तित्वाचे वैभव विदांचे पुत्र आनंद ,उदय करंदीकर, कन्या जयश्री काळे, ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र, किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी उपस्थितांना उलगडून दाखवले.

सुरवातीलाच श्री रामदास भटकळ यांनी विंदाचं ६० वर्षांच्या सहवासानंतरही कसे कळले नाही हे त्यांच्याच कवितेचा आधार घेऊन सांगितलं

असा मी तसा मी कसा मी कळेना,

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी
कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे
कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!
कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे
टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!
कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!






कवी आपल्या मनातील द्वंद्व फार छान पद्धतीने मांडतात जणू ते आपल्या समोर आरसाच धरतात. आपलं प्रतिबिंब या कवितेमधून दिसतं आणि कविता आपली होऊन जाते.

काव्य गायनाची सुरवात विंदांच्या कन्या जयश्री काळे यांनी त्या काळात दीडशे मुलांच्या वर्गात तीन-चारच मुली असत. त्याही उच्चभ्रू. हा किस्सा सांगून त्यांना उद्देशून विंदांनी केलेली कविता, सादर करून कायर्क्रम एका उंचीवर नेला.



माझी घाई काहीही
जाणून आहे अंतरी
लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी

तू झुंजू-मुंजू हासशी
जाई जुइचे बोलशी
मी वेंधला मग सांडतो थोड़ा चहा बाहिवरी

तू बोलता साधे सुधे
सुचवून जाशी केवढे
मी बोलतो वाचाल सा अन पंडीती काहीतरी

होशी फुलासह फूल तू
अन चांदण्या सह चांदणे
ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी

म्हणतेस तू मज आवडे
हा रांगडा सीधेपणा
विश्वास मी ठेवू कसा ह्या हुन्नरी शब्दावरी

लिहिती बटा भालावरी
उर्दू लिपीतील अक्षरे
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी

लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी...

कर्तव्य चांगल्याप्रकारे निभावून मानसिकता कशी ठेवायला हवी हे सांगणारी दुसरी कविता म्हणली,

केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती;
त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!
त्याला तयारी पाहिजे.

पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे

कवी सौमित्र यांनी विंदाच्या लघुनिबंधांचे आपल्या खास शैलीत वाचन केले.त्यापैकीपुरुष आणि पिशव्याया लघुनिबंधात लग्नानंतरमाणसाळलेलेपुरूष कशा पद्धतीने मान खाली घालून पिशव्या घेऊन बाजारहाटला जातात, याचे जे काही वर्णन विंदांनी केले आहे, ते सौमित्रच्या तोंडून ऐकताना मजा आला. सकाळचा कैफ ह्या निबंधाने अंतर्मुख केलं.

ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी विंदांच्या सहज आणि मोकळ्या स्वभावाचे त्यांना आलेले अनुभव कथन केले. खास करून NCPA मध्ये स्वतः बद्दलची लघुफिल्म पाहिल्यानंतर विंदांनी म्हटलं होतं " सुमे, लघुफिल्म मधला विंदा पाहून झाला असल्यास -या विंदा बरोबर चल घरी.

लहानपणी मला अनामिक भीती वाटायची, ती दूर करण्यासाठी विंदांनी बालकवितांचा उपाय शोधून काढला आणि तो यशस्वी झाला असं सांगून त्यांच्या लहान मूलगा उदय करंदीकर यांनी बालकविता म्हणून दाखवल्या. आपला पत्ता गणपती बाप्पा एटू लोकांचा देश ,



तिबेटाच्या
जरा खाली
हिमालयाच्या
जरा वर
एटू लोकांचा
अद्भुत देश
प्रत्येकाजवळ
उडते घर,
टिंग म्हणता
येते खाली,
टुंग म्हणता
जाते वर..









जीवन विषयक दृष्टी, तत्त्वज्ञान , हिंदू संस्कृतीतील प्रतिमाना नवे अर्थ देण्याचं काम ,मार्क्सचा विरोधविकासवाद, भौतिकवाद इत्यादी विषय विंदांच्या कवितेचे भाग होते, असे सांगून विंदांचे जेष्ठ पुत्र आनंद करंदीकर यांनी जनता अमर आहे , ब्रम्हानंद,सदगुरु वाचून सोय ह्या कविता सादर केल्या.

जनता अमर आहे

जनतेच्या पोटामध्ये
आग आहे, आग आहे;
जनतेच्या डोळ्यांमध्ये
शंकराचा राग आहे ...
जनतेच्या ऐक्यामध्ये
लाव्हाची लाट आहे;
जनतेच्या पायांपुढे
प्रकाशाची वाट आहे ...
जनतेच्या हृदयामध्ये
अन्यायाची कळ आहे;
जनतेच्या बाहूंमध्ये
सागराचे बळ आहे ...
जनतेच्या एच्छेमध्ये
नियतीचा नेट आहे;
जनतेच्या हातांमध्ये
भविष्याची भेट आहे ...
जनतेच्या नसांमध्ये
लाल लाल रक्त आहे;
जनतेच्या सत्तेखाली
पृथ्वीचे तख्त आहे ...
जनतेच्या मुक्तीसाठी
अजून एक समर आहे;
आणि जिचा आत्मा एक
ती जनता अमर आहे ...
जगण्यामध्ये ब्रह्मानंद.


कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे हस्ताक्षरं 
 बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.


सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रह्मानंद.







ज्येष्ठ समीक्षक विजया राजाध्यक्ष यांनी विंदांच्या घेतलेल्या मुलाखतीचा काही अंश यावेळी दाखविण्यात आला. या निमित्ताने खुद्द विंदांनी सादर केलेल्यामाझ्या मना बन दगड..’ आणिआईन्स्टाईनया दोन कविता ऐकता आल्या.





No comments:

Post a Comment