Sunday, 25 March 2012

परीक्षणे आणि निरीक्षणे

  
सायनेकर सरांचं तीसरे पुस्तक परीक्षणे आणि निरीक्षणे . पुस्तकाच्या नावावरून  विषय स्पष्ट होतो.  १९८२ ते १९९५ या  कालावधीत सरांनी वृत्तपत्रातून केलेल्या लिखाणाचा संग्रह.  पुस्तकाची सुरवात  वि वा शिरवाडकरांच्या मेकबेथ  मधील अंधार-प्रकश व कुसुमाग्रज या लेखानी  व पुस्तकातील शेवटचा  लेख  ज्ञानेश्वरीच्या  १८ व्या अध्याया वर आहे.  दोन्ही विषय   सरांच्या विशेष आवडीचे.  सर फक्त परीक्षण किंवा   निरीक्षण   नोंदवत नाहीत  तर पुस्तक वाचण्याची, एखाद्या घटनेकडे पाहण्याची दृष्टीही  देतात. विषय समजण्यासाठी आपली पूर्व तयारी काय असावी हे हि सागतात, ज्ञानेश्वरीच्या यथार्थ आकलना साठी श्रद्धा या शक्तीची आत्यंतिक आवश्यकता आहे. ज्ञानेश्वरांच्या  शब्दांवर दृढ श्रद्धा ठेवणे हा केवळ त्यांना  अवतारी पुरुष मानण्याच्या परंपरेचा भाग नसून या ग्रंथाच्या   संदर्भातील ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेची ती अटळ पूर्व अट आहे.
रामप्रहर या विजय तेंडूलकर लिखित पुस्तकावर लिहिताना सर वर्तमानपत्रातील यशस्वी स्तंभलेखनाचा मापदंडच  देतात ते लिहितात,वर्तमानपत्रातून सातत्याने लिखाण करणे दुराराध्य कला आहे. विशिष्ट  वेळेचे  आणि शब्द मर्यादेचे बंधन पाळून नियमाने लेखन तर करायचे आणि तरीही तोचतोचपणा अथवा कांटाळवाणेपणा यासारखे अश्या लेखनात शिरणारे दोष टाळायचे हि सोपी गोष्ट नाही. लोकप्रियतेच्या  कसोटीला उतरायचे पण सवंगपणाचा   मोह मात्र दूर ठेवायचा , वाचकांना विचार प्रवृत्त करायचे पण उपदेशकांची   भूमिका  कटाक्षाने  नाकारायची. प्रसन्नता , प्रासादिकता व पृथगात्मता यशस्वी स्तंभलेखनाची  ठळक वैशिष्टे होत. या पुस्तकाची वैशिष्ट उलगडून दाखवतानाच,  तेंडुलकरासारख्या लेखकाने कित्येकदा ओढून ताणून , क्षीण उपरोधाचा आश्रय घेऊन तथाकथित पुरोगामी लेखन केलेच  पाहिजे  का ? असा प्रश्न उपस्थित  करतात. 
जी ए कुलकर्णी यांच्या लेखनाची महत्ता वर्णन करताना सर लिहितात जी ए च्या कथेत आपले लक्ष सर्वात अधिक वेधले जाते ते तिच्यातील  आशयघनतेकडे. माणसाची नियतीशरणता, पदोपदी क्षणोक्षणी त्याला जाणवणारा परावलंबीपणा , विश्वाच्या  विराट पसा-यात  त्याचे नगण्यत्वं, समाजात व कुटुबातही जाणवणारा निरांलबी एकलेपणा, प्रयत्न , पुरुषार्थ   इत्यादी  कल्पनांचा फोलपणा, जगण्याच्या एकूण प्रक्रीय्लाच अर्थशून्य करून टाकणारा मृत्यू, या सारखे सारे जीवन ढवळून काढणा-या अनुभवांचा शोध जी ए  सतत घेतात. 
मनुस्मृती- काही विचार या नरहर कुरुंदकराच्या पुस्तकातील अनेक मुद्दे व विचार अत्यंत विवाद्य स्वरूपाचे आहेत असे सर स्पष्ट पणे मांडतात. व काही प्रश्न  उपस्थित करतात. डॉ.आंबेडकर यानाही मनुस्मृतीत  न आढळलेले दोष कुरुंदकराना मात्र स्पष्टपणे दिसू लागतात हे त्याच्या विद्वत्तेमूळे घडते कि पूर्वग्रहामुळे?  सर्व दोषाचे संमेलन असणारा एखादा ग्रंथ १६०० वर्षे टिकून राहतो आणि सा-या परंपरांचा आधारवड कसा ठरतो? वैचारिकता व प्रदीर्घ व्यासंग या दोन्ही गुणांनी पुस्तक ओतप्रोत भरलेले असले  तरी दुर्दैवाने या पुस्तकातील व्याज व्यासंगाने त्याचे मुल्य काहीसे उणावते.
या संग्रहातील अरुण टिकेकर , व्यंकटेश माडगुळकर यांच्या ग्रंथावरील लेख सुंदर झाले आहेत ते  मुळापासून वाचायला हवेत. साहित्याविषयी आपली जाण वाढविणारे व भान देणारे पुस्तक. सरांच्या दुस-या पुस्तकाविषयी पुन्हा कधीतरी.

Monday, 12 March 2012

मातृमुखेन शिक्षणम

शिक्षणासंबंधी  विनोबाचे विचार व्यक्त करणारा निबंध आहे त्यात श्रीकृष्णाची गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण सांदिपनीच्या आश्रम शिकायला गेले. तेव्हा त्याचे वय सोळा वर्षाचे होते. त्याला लिहिता वाचता आले पाहिजे म्हणून सांदीपनीच्या आश्रमात घातले.तेथे तो सहा महिन्यात सर्व विद्या शिकला.गुरुनी ओळखले कि हा ज्ञानी विज्ञानी आहे. त्याला आपण आणखी काय ज्ञान देणार. त्याला स्वयंपाकासाठी रानातून रोज लाकडे तोडून आणून देण्याचे काम सांगितले. जेव्हा कृष्णाची विद्या र्जन संपले आणि तो घरी जायला निघाला तेव्हा गुरुजी म्हणाले " आशिर्वाद माग"  कृष्ण म्हणाला  " तुम्हीच द्या "  गुरुजी म्हणाले माझी प्रतिष्ठा राखण्यसाठी तरी  काही माग. कृष्णानी आशिर्वाद मागितला " मातृहस्तेन भोजनम  " मरेपर्यंत मला आईच्या हातचे जेवण मिळावे. संदिपानिनी आशिर्वाद दिला. भगवान श्रीकृष्ण ११६ वर्षे जगले आणि ते मेल्या नंतर त्याची आई मेली. आईच्या हातचे जेवण हि मोठी विद्या आहे. जेवणं मध्ये नुसती भाजी भाकरी नसते तर प्रेमही असते.
मातृह्स्तेन भोजनम आणि मातृमुखेन शिक्षणम झाले कि हिंदुस्तानची प्रभा एकदम फाकेल व  चारीबाजूला ज्ञान पसरवू शकू. केवळ मुलांना शिकवून चालायचे नाही मुलीनाही शिकविले पाहिजे. मुलींना मुलां पेक्षा जास्त शिकविले पाहिजे. वरील विचार वाचल्यानंतर आपणा पैकी खूप लोकांना देऊळ चित्रपटातील नाना पाटेकरचा संवाद आठवेल ज्यांच्या  दोन मुलीं कॉन्व्हेंट  मध्ये शिकतात त्यांना तुम्ही मुलींच्या शिक्षणा विषयी सांगता आहात. आज मुलींचं शिक्षण खूप वाढलंय परंतु विनोबांना अजून काही अपेक्षित होतं. सांगतात बायांना मुले वाढवायची असतात. स्रिया मुलांना वाढविणार म्हणजे राष्ट्राला वाढविणार. त्यामुळे ज्ञानाची किल्ली त्यांच्याच जवळ पाहिजे.लहान मुलांना जे शिक्षण द्यायचे ते आईच देऊ शकते. मुले शाळेत जातात परंतु त्यांच्या कंठात ज्ञान काहीच नसते. लहानपणी किमान दहाहजार कविता/पद्य / श्लोक पाठ असायला हवेत.सहा वर्षापासून सुरवात केली ,रोज एक श्लोक पाठ करायचा ठरविले तर होईल. अलीकडच्या काळातील अभिनेत्री , सूत्र संचालिका सुहासिनी मुळगावकर यांनी एक आठवण सांगितली होती कि कॉलेजला असताना वडील रोज गीतेतील श्लोक बेस्टच्या तिकिटाच्या मागे लिहून द्यायचे, बस येई पर्यंत मी तो पाठ करत असे,यातून कॉलेज संपेपर्यत माझी भगवतगीता पाठ झाली.
विनोबाच्या आईचे पाठांतर खूप होते. त्यांना कानडी व मराठी भजने , अभंग पाठ होते घरी काम करीत असताना त्या ते म्हणत असत त्यातून मुलांचेही शिक्षण होत असे. विनोबांना ५० हजाराहून अधिक अभंग, श्लोक भजने पाठ होती.
हल्लीच्या शिक्षण पद्धतीमुळे जीवनाचे दोन तुकडे पडतात. आयुष्याची पहिली पंचवीस वर्षे जगण्याच्या भानगडीत न पडता नुसते शिक्षण घ्यावे, आणि नंतर शिक्षण गुंडाळून ठेवून मरेपर्यंत जगावे. बुध्द भगवानांनी म्हटले आहे कि रोज स्नानाने जसे शरीर स्वच्छ  होते त्याप्रमाणे रोज अध्ययन केले तर मन स्वच्छ  होते व राहते.  विनोबांनी विध्यार्थ्याची चार कर्तव्ये सांगितली आहेत. विध्यार्थ्यानी बुद्धि अत्यंत स्वतंत्र  ठेवावी, स्वत: वर स्वत;चा ताबा राखावा. (देह, मन बुद्धि,वाणी ह्यावर ताबा), त्यांनी निरंतर सेवापरायण राहिले पाहिजे, त्यांनी  नेहमी सावधान राहिले पाहिजे,म्हणजे सावध चित्त  नवनवीन गोष्टीचे अध्ययन ,तटस्थ बुद्धि ने अभ्यास. 
 कर्तव्याप्रमाणेच  शिक्षणाचे  तीन मुख्य  विषय विनोबांनी प्रतिपादले आहेत. योग , उद्योग , व सहयोग.  योग म्हणजे शरीर , चित्त, इंद्रिये ,मन वाणी,यावर प्रभुत्त्व मिळविणे  (Self Awareness / Development ). उद्योग म्हणजे व्यावसायिक शिक्षण (Professional Competency)  , सहयोग म्हणजे समाजाशास्र , मानसशास्र इत्यादी सर्वकाही. सहयोग मध्ये  गुण ग्राहकता महत्वाची.  श्री दीपक  घैसास  यांनी  व्याख्यांना दरम्यात सांगितलेली ससा व कासव यांच्या स्पर्धेची गोष्ट आठवते, जमिनीवर सश्याच्या शक्तीचा वापर करायचा तर नदी पार  करताना कासवाच्या शक्तीचा उपयोग करायचा.  स्पर्धेत  कोणा एकाचा जय  न होता  दोघांचा विजय  हेच Collaboration म्हणजेच सहयोग. 
 
 
 
 
   
आधार व  जिज्ञासू साठी पुस्तक " विनोबाचे शिक्षण विचार"