Tuesday, 9 September 2025

सुख-दु:ख कशी निर्माण होतात?

आपलं सुख म्हणजे इंद्रियाचे सुख. इंद्रियांच्या मागणीला शेवट नसतो. मना सारखे घडले कि सुख नाही तर दु:ख.

ज्ञानेश्वर माऊली  ज्ञानेश्वरीच्या दुस-या अध्यायात सांगतात.

इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।ते अंतर आप्‍लविती । संगें येणें ॥ ११२ ॥

इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदु:खे उत्पन्न होतात. ते मग आपल्या संसर्गाने अंत:करण ग्रासून टाकतात.

जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥

ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांच्या ठिकाणी काही दु:ख व थोडे सुखही दिसते. (त्या विषयांपासून कधी दु:ख तर कधी सुख प्राप्त होते).

देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥

निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंत:करणात उत्पन्न होतात.  

मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥

मृदु व कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दु:खाला कारण होतात.  

भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख ।जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥

भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात.  

सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥

सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख उत्पन्न करतात.  

तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु ।म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥

त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे.  

देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥

जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो.

या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥

इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही.

हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्‍नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥

हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो.

देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥

तसे हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा. याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस.

इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥

इंद्रिये जे म्हणतील, ते तेच जे पुरुष करतात, इंद्रियांच्या नादाने जे वागतात, ते विषयसागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. 

तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥

त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धि स्थिर झाली आहे असे समज.

  

No comments:

Post a Comment