Saturday, 31 March 2012

गुढीपाडवा आणि आपण

लहानपणा पासून गुढीपाडवा म्हटले  म्हणजे जगमाता यात्रोत्सव व  तेच आकर्षण. पुढे कोणी तरी सागितले गुढीपडावा म्हणजे हिंदू वर्षातील हा पहिला दिवस , चित्र शुध्द प्रतिपदा. साडेतीन मुहूर्तापैकी  एक मुहूर्त.आपल्या  कडे ह्या दिवशी गुढी उभारून नाव  वर्षाच स्वागत करतात. गुढी हि विजयाची, स्वागताचे  प्रतिक. ह्या दिवशी कडुलिंब पाने व साखरेचा प्रसाद देतात. वर्षारंभी कडू गोड प्रसाद का  द्यावा.   जीवन, संवत्सर, वर्ष म्हणजे कडू गोड घटनेची साखळी त्याची तयारी पहिल्या दिवसा पासून असावी. म्हणून असा प्रसाद असावा व अश्या सर्व घटना प्रसाद म्हणून स्वीकारत्या याव्या, असा धडा असावा.  याच दिवसा पासून शालिवाहन शक चा प्रारंभ होतो. इ स ७८ पासून शक सुरु झाले. (इ स २०१२  शके १९३४).

उध्दघाटक श्री गो. ज. नाईक

गुढीपाडवा म्हणजे चांगल्या कार्याला सुरवात करण्याचा दिवस.  संजीवनी परिवारांनी डॉ. स्वाती नाईक व डॉ वर्षा यांच्या पुढाकाराने कॅल्शियम व हिमोग्लोबिन टेस्ट चे आयोजन केले होते.वयोपरात्त्वे शरीरातील कॅल्शियम कमी होते त्या मुळे हाडं ठिसूळ होतात, सांधे दुखी, इत्यादी विकार जाणवू लागतात. याची जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न. शिबिराचे उध्दघाटन श्री गो. ज. नाईक यांनी केले. शंभर लोकांनी याचा लाभ घेतला.   उत्कर्ष मंडळ व जगमाता विश्वस्थ  मंडळाच्या सहकार्या  मुळे शक्य  झाले. 


 अशोक नायगावकर  ,आप्पा फुलारे  हॉल , वाघोली
गुढीपाडव्याच्या दिवसी ब्रह्म देवांनी सृष्टीची निर्मिती केली अशी एक आख्यायिका आहे. या दिवसी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून अयोध्येला प्रवेश केला. सामवेदी ब्राह्मण संघाची स्थापना ह्याच दिवसी  झाली.   गुढीपाडवा हा संघाचा वर्धापन दिवस. या निमिताने झालेल्या कार्यक्रमात कवी अशोक नायगावकर  उपस्थित होते. वंग्यात्मक काव्यतून चिमटे काढत मजा आणली.

Sunday, 25 March 2012

परीक्षणे आणि निरीक्षणे

  
सायनेकर सरांचं तीसरे पुस्तक परीक्षणे आणि निरीक्षणे . पुस्तकाच्या नावावरून  विषय स्पष्ट होतो.  १९८२ ते १९९५ या  कालावधीत सरांनी वृत्तपत्रातून केलेल्या लिखाणाचा संग्रह.  पुस्तकाची सुरवात  वि वा शिरवाडकरांच्या मेकबेथ  मधील अंधार-प्रकश व कुसुमाग्रज या लेखानी  व पुस्तकातील शेवटचा  लेख  ज्ञानेश्वरीच्या  १८ व्या अध्याया वर आहे.  दोन्ही विषय   सरांच्या विशेष आवडीचे.  सर फक्त परीक्षण किंवा   निरीक्षण   नोंदवत नाहीत  तर पुस्तक वाचण्याची, एखाद्या घटनेकडे पाहण्याची दृष्टीही  देतात. विषय समजण्यासाठी आपली पूर्व तयारी काय असावी हे हि सागतात, ज्ञानेश्वरीच्या यथार्थ आकलना साठी श्रद्धा या शक्तीची आत्यंतिक आवश्यकता आहे. ज्ञानेश्वरांच्या  शब्दांवर दृढ श्रद्धा ठेवणे हा केवळ त्यांना  अवतारी पुरुष मानण्याच्या परंपरेचा भाग नसून या ग्रंथाच्या   संदर्भातील ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेची ती अटळ पूर्व अट आहे.
रामप्रहर या विजय तेंडूलकर लिखित पुस्तकावर लिहिताना सर वर्तमानपत्रातील यशस्वी स्तंभलेखनाचा मापदंडच  देतात ते लिहितात,वर्तमानपत्रातून सातत्याने लिखाण करणे दुराराध्य कला आहे. विशिष्ट  वेळेचे  आणि शब्द मर्यादेचे बंधन पाळून नियमाने लेखन तर करायचे आणि तरीही तोचतोचपणा अथवा कांटाळवाणेपणा यासारखे अश्या लेखनात शिरणारे दोष टाळायचे हि सोपी गोष्ट नाही. लोकप्रियतेच्या  कसोटीला उतरायचे पण सवंगपणाचा   मोह मात्र दूर ठेवायचा , वाचकांना विचार प्रवृत्त करायचे पण उपदेशकांची   भूमिका  कटाक्षाने  नाकारायची. प्रसन्नता , प्रासादिकता व पृथगात्मता यशस्वी स्तंभलेखनाची  ठळक वैशिष्टे होत. या पुस्तकाची वैशिष्ट उलगडून दाखवतानाच,  तेंडुलकरासारख्या लेखकाने कित्येकदा ओढून ताणून , क्षीण उपरोधाचा आश्रय घेऊन तथाकथित पुरोगामी लेखन केलेच  पाहिजे  का ? असा प्रश्न उपस्थित  करतात. 
जी ए कुलकर्णी यांच्या लेखनाची महत्ता वर्णन करताना सर लिहितात जी ए च्या कथेत आपले लक्ष सर्वात अधिक वेधले जाते ते तिच्यातील  आशयघनतेकडे. माणसाची नियतीशरणता, पदोपदी क्षणोक्षणी त्याला जाणवणारा परावलंबीपणा , विश्वाच्या  विराट पसा-यात  त्याचे नगण्यत्वं, समाजात व कुटुबातही जाणवणारा निरांलबी एकलेपणा, प्रयत्न , पुरुषार्थ   इत्यादी  कल्पनांचा फोलपणा, जगण्याच्या एकूण प्रक्रीय्लाच अर्थशून्य करून टाकणारा मृत्यू, या सारखे सारे जीवन ढवळून काढणा-या अनुभवांचा शोध जी ए  सतत घेतात. 
मनुस्मृती- काही विचार या नरहर कुरुंदकराच्या पुस्तकातील अनेक मुद्दे व विचार अत्यंत विवाद्य स्वरूपाचे आहेत असे सर स्पष्ट पणे मांडतात. व काही प्रश्न  उपस्थित करतात. डॉ.आंबेडकर यानाही मनुस्मृतीत  न आढळलेले दोष कुरुंदकराना मात्र स्पष्टपणे दिसू लागतात हे त्याच्या विद्वत्तेमूळे घडते कि पूर्वग्रहामुळे?  सर्व दोषाचे संमेलन असणारा एखादा ग्रंथ १६०० वर्षे टिकून राहतो आणि सा-या परंपरांचा आधारवड कसा ठरतो? वैचारिकता व प्रदीर्घ व्यासंग या दोन्ही गुणांनी पुस्तक ओतप्रोत भरलेले असले  तरी दुर्दैवाने या पुस्तकातील व्याज व्यासंगाने त्याचे मुल्य काहीसे उणावते.
या संग्रहातील अरुण टिकेकर , व्यंकटेश माडगुळकर यांच्या ग्रंथावरील लेख सुंदर झाले आहेत ते  मुळापासून वाचायला हवेत. साहित्याविषयी आपली जाण वाढविणारे व भान देणारे पुस्तक. सरांच्या दुस-या पुस्तकाविषयी पुन्हा कधीतरी.