Friday, 28 December 2012

रतन टाटा सर





 आज २८ डिसेंबर २०१२ टाटा ग्रुप चे अध्यक्ष सर रतन टाटा  यांचा ७५ वा वाढदिवस. त्यांनीच केलेल्या नियमा प्रमाणे आज ते निवृत्त होत आहेत. टाटा उद्योग विश्वाचे वारस  म्हणून
श्री सायरस मेस्त्री  कडे सूत्र सोपवून.




दादाभाई नौरोजी यांना आपण भारतीय स्वातंत्र्याचे पितामह मानतो तसेच जमशेटजी टाटा हे भारतीय उद्योजकतेचे जनक मानले जातात. स्वामी विवेकानंद  शिकागोला जाताना सर  जमशेट्जी   टाटा सहप्रवासी होते. स्वामीजींनी टाटाना सागितले कि नुसते तंत्रज्ञान आयात न करता आपल्याकडील मनुष्यबळ कसे विकसित होईल या कडे लक्ष द्यायला हवे व आपले मित्र  म्हैसूरच्या महाराजांना जमशेदजींना हवे असलेले साहाय्य करण्यास सांगितले. त्यातून प्रेरणा घेऊन  म्हैसूर येथे जमशेदजींनी यांनी  ‘भारतीय विज्ञान अनुसंधान संस्था’  (Research Institute of Science for India) स्थापन केली. असं पूर्व संचित लाभलेला, टाटा समूह हा राष्ट्रासाठी समृध्दी निर्माण करणारा उद्योग समूह आहे.

144 वर्षांची प्रदीर्घ  परंपरा असणाऱ्या या उद्योगसमुहाचे नेतृत्व असे होते, आहे..
1868-1904 : जमशेटजी टाटा 
1904-1932 : सर दोराबजी टाटा
1932-1938 :
सर नौरोजी साफलाटावाला
1938-1991 :
जे.आर.डी. टाटा 
1991-2012 : 
रतन टाटा
2012 ,   : सायरस मेस्त्री 

रतन टाटा ह्यांनी १९६२ साली अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात स्थापत्यशास्त्रातील पदवी मिळवली. नवीन काहीतरी डिझाइन करायचे वेड त्यांना तेव्हापासूनच होते. आय.बी.एम.मध्ये नोकरी मिळत असूनही आजारी आजीसाठी रतन टाटा भारतात परतले. सुरवातीला टिस्को मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी केली ती अगदी थेट तेथील शॉप फ्लोअरवर! काही हजार कामगारांमधील एक कामगार बनून!  १९७१ साली टाटा समूहातील नेल्को कंपनीच्या कार्यकारी संचालक पदावर नेमणूक झाली. एकंदरीत वाईट परिस्थिती सुधारण्या पलीकडे होती. १९७७ मध्ये त्यांना एम्प्रेस मिलची जबाबदारी देण्यात आली. ह्या कापड गिरणीची अवस्थाही वाईट होती. कुप्रसिद्ध कापड उद्योगातील संपाने एम्प्रेस मिल हि बंद पडली. १९८१ साली टाटा इंडस्ट्रीज त्यांच्याकडे आली. टाटा इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी टाटा टेलिकॉम , केल्ट्रॉन , फायनान्स , हनीवेल , एलेक्सी अशा कंपन्यांची सुरुवात केली. १९८८ साली. सुमंत मुळगावकरांकडून त्यांनी  टेल्को ची सूत्रे घेतली. त्याच वेळी कामगाराचा मोठा संप झाला. कामगार नेते राजन नायर जोरात होते. रतन टाटांनी कामगारांना सागितले कि  तुम्ही माझ्या डोक्याला  गन  लावल  तर  तुम्ही चाप ओढू शकता किंवा गन खाली ठेवू शकता मी डोके हलवणार नाही. अश्या ठाम व मुत्सद्दीपणे त्यांनी संप मिटवला.
१९९१ साली त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली. त्यावेळी जे आर डी च्या जुन्या सहका-या कडून त्यांना सहकार्य मिळाले नाही. काही ठिकाणी विरोध झाला. पुढे यातील काही मंडळी निवृत्त झाली. त्यांनी संपूर्ण समूहात सुसूत्रता आणली. लोगो पासून कंपनीच्या नावापर्यंत सुलभता आणली जसे टेल्को चे टाटा मोटार्स झाले.
जागतिक स्तरावरील हॉटेल, टेटली,कोरस ह्या कंपन्या टाटा समूहात आणल्या. टाटा समूह आंतरराष्ट्रिय स्तरावर नेला. १९९१ साली रतन टाटा समूहाचे अध्यक्ष झाले तेव्हा समूहाचे बाजारमूल्य ७९४३ हजार कोटी होते. आज ते ४,६२,००० हजार कोटी आहे. २१ वर्षात ५८ पटीने वाढले   यावरून त्यांच्या कामाचा झपाटा, प्रगतीचा वेग लक्षात येतो. उद्योगातील प्रगती, महसूल मधील वाढ या साठी टाटा उद्योग समूह ओळखला जात नाही. टाटा समूहाची ओळख आहे. राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणारा समूह, टाटा  म्हणजे सामाजिक बांधिलकी.  २६/११ ला ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कामगारांना , परिसरातील बळी पडलेल्या सगळ्यांना मदत केली. त्यांच्या घरी जाऊन रतन टाटांनी विचारपूस केली. टाटांनी आपल्या कार्यशैली तून जगभर आपल्या विषयी विश्वास निर्माण केला आहे. त्याचा अनुभव ब्रिटन मधील एक कंपनी घेताना आला. तेथील कामगारांनी मागणी केली कि आमची कंपनी टाटांनी घ्यावी. टाटा म्हणजे  विश्वासार्हता.
अशी मोठी परंपरा , इतिहास असणा-या टाटा समूहाचा वारसा श्री सायरस मेस्त्री कडे देताना  सर रतन टाटा सांगतात "'एखाद्याला आपल्या प्रभावाखाली ठेवणे मला योग्य वाटत नाही,'तुम्ही नेहमी 'स्वतःचे' असायला हवे. तुम्हाला स्वतःला काय वाटते ते नेहमी ऐका आणि तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा.'

आपल्या लाडक्या  कुत्र्यां बरोबर

Monday, 19 November 2012

संजीवनी वक्तृत्व स्पर्धा

स्पर्धेतील सहभागा वरून दिसून येते कि आपण सर्व जण Unique आहात. वक्तृव  हि कला  असून आपण  सर्वांनी  हि कला जोपासावी असे प्रतिपादन  संजीवनी परिवार आयोजित दादोबा पांडुरंग तर्खडकर  वक्तृत्व स्पर्धेतील परीक्षक  श्रीमती लेले बाईंनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रशांत नाईक होते. वक्तृव स्पर्धे मागील संजीवनी ची भूमिका / संकल्पना  श्री  राजू नाईक यांनी विशद केली. सौ. अनिता  नाईक यांनी सूत्र संचलन केले.




            

आपणाला खूप काही ज्ञात असते परंतु ते योग्य शब्दात  प्रकट करता  येत नाही किंवा प्रकट  करण्यात  कमी पडत असतो. आजच्या विश्वात Communication ला फारच महत्व आहे म्हणून विध्यार्थ्यासाठी हे व्यासपीठ.  खूप विध्यार्थ्यानी यात भाग घ्यावा स्वत; मधील भय/भीती दूर करावी , बोलण्याचा सराव करावा. हि एक कला अंगी बाणवावी. हा संजीवनी चा प्रयास. 
विध्यार्थ्यांचा  प्रतिसाद फारच चांगला व  उत्साह वाढविणारा  होता. अकरावी  ते बीई, द्विपदवी  पर्यतच्या विध्यार्थ्यांचा सहभाग होता. २८ विध्यार्थ्यानी स्पर्धेत भाग  घेतला. सर्वच मुलांचा Performance उत्तम होता. सर्वांनी मेहनत घेतलेली दिसत होती. विशेषत्वानी जाणवले ते   कोणाची शब्दफेक, कोणाची देहबोली, कोणाचा आत्मविश्वास,कोणाची शब्दावर आघात करण्याची पद्धत, कोणाची सहजता  असे अनेक पैलू.
स्पर्धा आली म्हणजे पारीतोषक आली.  कु. अनघा जोशी, भुईगाव  हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक  कु.रीतल  नाईक,राणेभाट   हिने तर  तृतीय   क्रमांक  नेहा  पाटील,  उमराळे  हिने  पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषक जतीन नाईक, कोफराड, व  कु.निकिता वझे, बोळींज  यांनी मिळवली.



प्रथम   क्रमांक - कु. अनघा जोशी, भुईगाव



द्वितीय क्रमांक  कु.रीतल  नाईक,राणेभाट   


      













तृतीय   क्रमांक कु.  नेहा  पाटील,  उमराळे 


उत्तेजनार्थ   जतीन नाईक, कोफराड


उत्तेजनार्थ   कु. निकिता वझे, बोळींज 












हेमंत नाईक यांनी विध्यार्थाना धन्यवाद दिले व सर्वाचे आभार मानले. 
 
पारितोषक वितरणा अगोदर सर्व उपस्थितांनी मनोज पाटील बरोबर प्रतिज्ञा वाचन करून प्रतिज्ञा घेतली. (प्रतिज्ञा प्रत सर्व उपस्थिताना देण्यात आली)
 
             Oath for the Youth – You Are Unique – APJ Abdul Kalam

1. I will have a goal and work hard to achieve that goal. I realize that small aim is a crime.

2. I will be a change agent for lighting the lamp of purity in my home with a message for everyone "will work with integrity and succeed with integrity".

3. Today onwards, I will persuade my parents to start a home library with minimum 20 books which will radiate knowledge in my home. Also, I will ensure my house has a prayer room where every one of us can pray for 10 minutes.

4. I will be a good member of my family, a good member of the society, a good member of the nation and a good member of the world.

5. I will always try to save or better someone's life, without any discrimination of caste, creed, language religion or state. Wherever I am, a thought will always come to my mind. That is "What can I give?"

6. I will always protect and enhance the dignity of every human life without any bias.

7. I will always remember the importance of time. My motto will be "Let not my winged days, be spent in vain".

8. I will always work for clean planet Earth and clean energy.

9. As a youth of my nation, I will work and work with courage to achieve success in all my tasks and enjoy the success of others.

10. I am as young as my faith and as old as my doubt. Hence, I will light up then, the lamp of faith in my heart.

11. My National Flag flies in my heart and I will bring glory to my nation.

                                                                                                     Courtesy  :         Sanjeevani Parivar.
 

 

स्पर्धेला अधिक व्यापकता  देण्यासाठी तीचे  विविध गट / विभाग करण्याकडे लक्ष द्यावे  लागेल









Wednesday, 12 September 2012

तुम्ही अद्वितीय आहात.

शरीर , मन भावना, आत्मा यांचा परिपूर्ण विकास साधणे, हे जीवनाचे उद्दिष्ट असायला हवे.
आपण जेव्हा बल्ब पाहतो तेव्हा आपणाला  थोमस  अल्वा एडिसन यांच्या बल्ब च्या एकमेव शोधाची आठवण होते. जेव्हा आपल्या घरावरून जाणा-या विमानाचा आवाज ऐकतो तेव्हा आपणास आठवतात ते राईटबंधू, ज्यांनी दाखवून दिले कि माणूस हवेत उडू शकतो.टेलिफोनची बेल आपणास अलेक्सझांडर  ग्रहम बेलची याद करून देते. समुद्र सफारीचा इतरजण आनंद घेत असताना एकजण विचार करत होता कि जिथे समुद्र आणि आकाश मिळते तिथे आकाश निळे का दिसतंय (निळे आकाश) त्यांचा संशोधनानी  प्रकाशा चे  पसरणे  चा शोध लागला ते नोबल पारितोषक विजेते सर सी. व्ही. रामन, एका स्रीला दोनदा नोबेल मिळाले. एक रेडियम च्या शोधासाठी, दुसरे रसायनशास्रातील संशोधनासाठी. रेडियेशन मुळे हजारो   कॅन्सर  रुग्णावर उपचार शक्य झाले तसेच शेती उत्पन्न वाढवण्यासाठी मदत झाली. आता रेडियम चा उपयोग विद्युत निर्मिती व शास्रास्रासाठी केला जातो. आपल्या संशोधनाने आरोग्याशास्रात व नुक्लीआर   विश्वात बदल घडवून आणणारी स्री म्हणजे मादाम मेरी क्युरी.ह्या आणि ह्यांच्या सारख्या  असंख्य  माणसांनी न रुळलेल्या वाटेवरून चालण्याचे धाडस केले, प्रयत्नाच्या  पराकाष्ठे तून मानवते साठी केलेल्या योगदाना मुळे  हि मंडळी  आपणसाठी यादगार झाली .
खरा प्रश्न आहे तुम्हाला खरेच अद्वितीय व्हायचे आहे काय?
मी आज पर्यंत खूप तरुण भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला. संवादातून जाणवले त्यातील प्रत्येकाचा अद्वितीय (आपल्या सारखे आपणच) होण्याकडे कल दिसला. परंतु भोवतालचं जग तुम्हाला इतर सारखे बनवतंय. तुम्हाला ठामपणे ठरवायचे आहे कि गर्दीतील एक व्हायचं आहे कि तुम्हाच्या सारखे तुम्हीच असं अद्वितीय व्हायचे आहे.
तुमचा वेगळेपणा , एकमेकत्व जोपासायचे असेल तर तुम्हाला १९०५ मध्ये अलेक्सझांडर  ग्रहम बेलनी सांगितल्या  प्रमाणे कृती करावी लागेल.
 " सगळे जण जो मार्ग चोखाळतात त्या मार्गांनी कायमचे चालू नका कधी कधी मळलेली वाट सोडा आणि नवीन मार्ग, फारसा न चाललेला मार्ग धरा. . तुम्हाला   कधीही न पाहिलेलं जग दिसेल. कितीही छोटीसी गोष्ट असू दे पण दुर्लक्ष करू नका. त्याचा पाठपुरावा करा. त्याच्या सर्व शक्यता पडताळा. एक शोध दुस-याला प्रेरणा देईल.  तुम्हाला कळायच्या आधी तुम्ही अमूल्य असं  काही मिळवलेलं असेल."


तुम्ही अमृताचे पुत्र आहात, सामर्थ्य घेऊन आला आहात
श्रद्धा आणि चांगुलपणा तुम्हाला उपजतच लाभली आहे
तुम्हाला भविष्याचे पंख लाभले आहेत.
सरपाटण्यासाठी नव्हे तर भरारी घेण्यासाठी तुम्हचा जन्म  आहे. 
आणि ठरवा 
तुम्ही  पूर्ण क्षमतेने  उंच भरारी घेणार आहात.

हे पंख आपणास शिक्षणातून  प्राप्त  होतात व अंर्तमनात  असलेला ध्यास आपल्याला ध्येयाप्रत घेऊन जातो.
उत्कृष्टतेची संस्कृती
उत्कृष्टता अपघाताने साधता येत नाही. ती एक सततची प्रक्रिया आहे. प्रत्येक वेळी थोडी थोडी सुधारणा करत जाणे. आपल्या स्वप्नध्येयावर  लक्ष केंद्रित करणे. ते साध्य करण्यासाठी छोटे मोठे धोके स्वीकारणे. अपयशाने खचून न जाणे. पूर्ण क्षमतेने आपल्या कामात झोकून देणे व काम करत असताना कामगिरी उंचावत नेणे. स्पर्धा दुस-याशी नव्हे तर स्वत:शीच  यालाच उत्कृष्टतेची संस्कृती म्हणतात.
इप्सित प्राप्त करण्याच्या पायरी :  आपल्याला हवं ते कसे प्राप्त करता येईल? अद्वितीय व्यक्तिमत्व बनविण्यासाठी काय हवं.
  • उद्दिष्ट हवे- जीवनाला ध्येय असायला पाहिजे.
  •  सतत अभ्यास - अभ्यासू वृत्ती
  •  मेहनत, कष्ट करायची तयारी
  •  अडथळ्यावर मात  करण्याची चिकाटी व उद्दिष्ट साकार करण्याची वृत्ती.
ह्या चार गोष्टी तुम्ही आत्मसात केल्यास, तुम्ही जे ठरवाल ते साकार करू शकाल.
 ज्ञान = सर्जकता (creativity) + नितीमत्ता + धैर्य
  
सर्जकता  : शिक्षणातून सर्जनशीलता विकसित होते, सर्जनशीलता विचारला चालना देते, विचार प्रक्रियेतून ज्ञानाचा उगम होतो. आणि ज्ञान तुम्हाला मोठं,व्यापक करत असते.
नितीमत्ता : आपल्या हृदयात नितीमत्ता,नैतिकता, सज्जनपणा कसा जोपासता येईल? आपले आई, वडील, घरातील संस्कार  व प्राथमिक शिक्षक याद्वारे नितीमत्ता आपल्याठायी वसते.
धैर्य         : ज्ञान प्राप्ती साठी धैर्य, धाडस या गुणांचे फार महत्व आहे. वेगळा विचार करण्याचे धैर्य ,न रुळलेली, वेगळी वाट चालण्याचे धैर्य, नाविन्य शोधण्याचे धाडस, अशक्यतेला गवसणी घालण्याचा धीटपणा, अडथळ्याशी   संघर्ष करून यश मिळवण्याचा बेडरपणा.
  
व्यक्तीच्या , कुटुंबाच्या , देशाच्या उत्कर्षासाठी सर्जनशील, नीतीयुक्त व धैर्यशील ज्ञान आवश्यक आहे.
आत्मविश्वास एक वेगळे रसायन  आहे. स्वत: वरील विश्वास कसा वाढेल या कडे लक्ष द्यायला हवे. चांगल्या शिक्षकाचा सहवास विध्यार्थ्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतो. यश मिळवण्या साठी  " मी हे करू शकतो " हा विश्वास निर्माण होणे महत्वाचे आहे.
शास्रज्ञाच्या  शब्दकोशात अशक्य हा शब्द नसतो कारण आज जे अशक्य आहे ते उद्या शक्य होईल असा त्यांचा विश्वास असतो.
काळाचे भान   
वेळेचे महत्व जाणा  आपल्याला माहित आहे कि पृथ्वी स्वत: भोवती फिरण्यासाठी २४ तास किंवा १४४० मिनिट्स किंवा ८६४०० सेकंद्स घेते. पृथ्वी सूर्य भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक वर्ष घेते आणि आपले वय एक वर्षांनी वाढतं, सेकंद, मिनिट तास, दिवस महिने वर्ष भरभर उडून  जातात. काळा वर  आपले काही बंधन नाही परंतु वेळेचा सदुपयोग करणे आपल्या हातात असते. 
-
( आदरणीय  अब्दुल कलाम यांच्या  You are Unique  या पुस्तकाच्या प्रस्तावनेचे  स्वैर भाषांतर, न्यून ते  माझे)

Thursday, 23 August 2012

शांकर-प्रक्रिया





(जगतगुरू शंकराचार्य ७८८-८२० कालडी - केदारनाथ  )
 ई.स. ७८८ मधे शंकराचार्यांचा जन्म केरळमधील कालडी नावाच्या गावी झाला. त्याच्या बुद्धिमत्तेची असामान्य चमक लहानपणापासुनच दिसुन येत होती.  ब्रह्मचारी  आश्रमातून संन्यासाश्रम स्वीकारल्या मुळे ब्राह्मणांनी त्यांच्यावर, व त्यांच्या आई वर  बहिष्कार टाकला होता.   महान आश्चर्य म्हणजे त्याने वयाच्या सोळाव्या वर्षीच गीता, उपनिषदे, ब्रह्मसुत्रे यांवर भाष्ये लिहिली. व अवघ्या बत्तीस वर्ष्याच्या उण्यापु-या आयुष्यात तीन वेळा भारत भ्रमण केले व चार आश्रमाची स्थापना केली.

श्रीमत शंकराचार्य एके ठिकाणी म्हटलंय  हे जग नंदनवन आहे .म्हणजेच जग आनंदी,सुखकारक  आहे. आपण सर्व आनंद, सुख, समाधान इत्यादीचे शोधक आहोत, परंतु आचार्यांच्या आणि आपल्या दृष्टिकोनातील फारकामुळे आपल्याला जग विपरीत वाटते.   आचार्यांच्या  पद्धतीने आपले माईडसेट करायला हवेत.
   
      दुर्लभं त्रयमेवैत्तत  देवानुग्रह हेतुकम
       मनुष्यत्वं  मुमुक्षतव  महापुरुष संश्रय:

शंकराचार्य सांगतात खूप भाग्याने आपणाला  मनुष्यत्व , मुमुक्षत्व (मुक्तीची इच्छा )  व महापुरुषाचा / सज्जनांचा  ससंग लाभतो.

आनंदरूपं आत्मानं अज्ञात्वैव पृथगजन:
बहि:-सुखाय यतते न तु  कश्चिद  विदन बुध:

आत्म्याचे आनंद रूप न जाणताच आपण बाह्य सुखासाठी प्रयत्न करतो आणि सगळ्या बाह्य गोष्टी मिळवून कष्टी होत असतो.


शंकराचार्यांनी, आपल्या भारत भ्रमणात , जेथे कुठे गुणवान लोक भेटतील तिथे चर्चा करून परिवर्तन घडवून आणले  त्या साठी हृदय  परिवर्तनाची एक प्रक्रिया आचार्यांनी शोधून काढली, मनाला नव्हे तर बुद्धीला आवाहन केले. ते म्हणतात  "शास्त्रं  ज्ञापक , न तू कारकम'  आपल्याला केवळ समजावून सांगण्याचा अधिकार आहे, काही करवून घेण्याचा नाही.  आमचे काम  आहे लोकांना विचार देणे आणि मग त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करण्याची  मोकळीक देणे. होऊ द्या त्यांच्या डोक्यात  कुरुक्षेत्राचे युध्द! लोक विचार करू लागतील. ते मंथन त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. या मंथनाचा सामना त्यांनी स्वत: करावा, आपण मध्ये पडू नये, हि आहे शांकर-प्रक्रिया.


कबीराचा एक सुंदर दोहा आहे.

                                      जैसे तील मे तेल है, ज्यो चकमक मे आग ,
                                      तेरा साई तुझमे है तू जाग सके तो जाग

ह्या सगळ्या विचारांनी आपापला  साई शोधण्यास मदत होवो, शोधायचा तर आपणच  आहे.

(श्री सायनेकर सरांचा अभ्यासवर्ग २४ ते २६ ऑगस्ट २०१२ - आधार गुरुबोध सार-विनोबा )

Friday, 17 August 2012

मन हि तो कारण हैं!

मुरारीबापूंनी  सुख और दु;ख या विषयावरील प्रवचनात म्हटले आहे कि सुख-दु;ख ,समाधान- असमाधान,  आनंदी - कष्टी  या सगळ्या स्थिती मनावर अवलंबून आहेत. ते एका वाक्यात वर्णन करतात. मन हि तो कारण हैं.
आपल्या साहित्यात संतानी मन या विषयी खूप निरीक्षण , त्याचे स्वभावदर्शन  व  मार्गदर्शन केले आहे. 
स्वामी समर्थांचे मनबोध किवा मनाचे  श्लोक प्रसिद्ध आहेत.मन या विषयी समर्थांची जाणीव फार मोठी होती.आपल्या दैनिन्दिनी जीवनात मनाला वळण कसे लावावे हे समर्थ सोपं करून सागतात. छोट्या छोट्या चरणात खूप  मोठे विचार मांडतात आणि सहजच आचार सुचवितात.
 
 
 
 
 देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।मना सज्जना हेचि क्रीया धरावी ।।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नीववावें ।।
 
मना श्रेष्ठ धारिष्ट जींवी धरावें । मना बोलणें नीच सोशीत जावें ।।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ।।
 
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अति स्वार्थबुध्दी न रे पाप सांचे ।।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासारिखें दु:ख मोठे ।।
 
 
एकूण २०५ मनाचे श्लोक आहेत. मांडणी भक्तिरसात केली आहे परंतु  प्रत्येक श्लोक मनाचे विशेषत्व दाखवितो आणि सुलभ आचरणाचा  मार्ग हि समर्थ सुचवितात.
 
 
 
तुकाराम महाराज आपल्या अभंगातून मनाचे विश्लेषण करतात. आपल्या प्रगतीसाठी त्याच्यावर काबू मिळवावा असे सांगतात.
 
मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धींचे कारण ।
मोक्ष अथवा बंधनासुख । समाधान इच्छा ते ।।1।।
मन प्रतिमा स्थापिली । मने मन पूजा केली।
मने इच्छा पुरविली । मन माऊली सकळांची ।।2।।
मन गुरु आणि शिष्य । मन आपलेची दास्य ।
प्रसन्न आप आपणास । गती अथवा अधोगती ।।3।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात।
नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे।।4।।
 
मना सारखे दुसरे दैवत नाही असे या अभंगात म्हणतात तर दुस-या ठिकाणी म्हणतात

गती अधोगती मनाची हे युक्ती | मन लावा एकांती साधुसंगे
जतन करा जतन करा | धावते सैर ओढाळ ते 
मान अपमान मनाचे लक्षण | लाविलिया ध्यान तेची करी
तुका म्हणे मान उतरी भवसिंधु | मान करी बंधू चौ-याशीचा 
 
रिकामे मन हा राक्षसांचा कारखाना आहे.  तुकाराम  महाराज म्हणतात    रिकामे तू नको मना | राहो क्षणक्षणाहि  आणि मनाच्या आधीन होऊ नये असे सागतात.
 
होऊ नको कांही या मना आधीन | नाइके वचन याचे कांही
हटियाची  गोष्टी मोडून टाकावी | सोई हि धरावी विठोबाची
आपुले आधीन करुनिया ठेवा | नाही तरी जीव घातक हे
तुका म्हणे झाले जे मना आधीन | तयांसी बंधन यम करी
 
 
संत परंपरेतील कवियत्री बहीणाबाई मनाचे वर्णन करतात
 
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर ॥१॥

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावऱ्हल्या रे लाटा ॥२॥

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादनं ॥३॥

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे ततंर
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मतंर ॥४॥
 
मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगू मात
आता  व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत ॥५॥

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर ॥६॥

मन एवढं एवढं
जसं खाकसंचा दाना
मन केवढं केवढं
आभायांत बी मायेना ॥७॥

देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं ॥८॥  
 
 
आधुनिक कवी सुधीर मोघ्यांची एक सुंदर कविता (गीत)   आहे .
 
 मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा लागावा

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेलं
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेलं
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा

चेहरा-मोहरा याचा, कुणी कधी पाहिला नाही
मन अस्तित्वाचा सिंधू, भासाविण दुसरा नाही
या ओळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा लागावा
 
या अश्या नाठाळ  मनाला तळ्यावर आणण्यासाठी संतानी उपाय सांगून किल्ली आपणाकडे दिली आहे.
 

Wednesday, 11 July 2012

झाडांचा वाढदिवस

 
गत सातवर्षे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात संजीवनी वृक्षांचा वाढदिवस साजरा करते आहे. प्रतिकूल परिस्थितीत झाडं आपला वर्धिष्णू गुण जोपासत आहेत. झाडांची  उपयुक्तता या दृष्टीने त्यांच्या कडे  न पाहता,  झाडं  आपले  खरेखुरे मित्र, मार्गदर्शक  आहेत या दृष्टीकोनातून संजीवनी परिवार   झाडांचा  वाढदिवस साजरा करते, आणि  यामुळेच  या कार्यक्रमात सहभागी होतो असे प्रतीपातन श्री सायनेकर सरांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण शास्रज्ञ  श्री प्रकाश जोशी उपस्थित होते. त्यांनी अंटार्टिक मोहिमेतील व समुद्र किनारा सफरीतील अनुभव कथन केले. त्यांतील  विद्वान आणि खेडूत यांचा किस्सा दाद घेऊन गेला.विद्वता आणि आंतरिक शहाणपणा  याच हा किस्सा .   परीभ्रमणात असताना एकदा रेल्वे प्रवासात एक विद्वान गृहस्थ भेटले. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून विद्वता दिसून येत होती, ते पर्यावरण , निसर्ग , वातावरण  इत्यादी विषया वर बोलत होते. पुढच्या स्टेशनात एक खेडूत गाडीत चढले. इठ्ठल इठ्ठल म्हणत एका ठिकाणी बसकण मारली. विद्वान गृहस्थ त्याला म्हणाले इकडे बसा आणि इठ्ठल इठ्ठल काय लावलं आहे. विठ्ठल म्हणा.खेडूत म्हणाला मी कुठे काय बोलतोय, तो बोलवून घेतो. विद्वानांनी विचारले काय उधोगधंदा करताय, खेडूत म्हणाला मी कुठे काय करतोय, तो माझ्याकडून शेती करवून घेतो. थोड्या वेळानी विद्वानांनी सिगारेट शिलगावली, झुरके घेत घेत थोटूक टाकण्यासाठी दरवाज्याकडे जाऊ लागले इतक्यात खेडूताने त्याच्या कडे थोटूक मागितले. विद्वान म्हटले थोटूक कश्याला मी सिगारेट देतो कि, खेडूत म्हटला आम्ही माळकरी विडी, सिगारेट ओढत नाही. त्यांनी थोटूक घेतले विझवून टाकले. खाली गवत , माळरान आहेती , जीव जंतू आहेत त्याची काळजी घ्यायला हवी , इठ्ठल इठ्ठल.






 औदुंबर


 औदुंबर
 काही  झाडांची  वाढ चांगली आहे.  मंदिरा समोरील औदुंबरच्या रोपाचे रुपांतर वृक्षात झाले आहे.   बालकवींच्या शब्दात  बदल करून  म्हणता येईल  


 "देवळाच्या द्वारी उभा असला औदुंबर."






 


आश्रमा समोर खडा पहारा देणारी  बकुळफुलाची झाडे

वीस फुट उंच देवदार व गुलमोहर







गुणकारी कडूनिंब


सिल्वर ओक


Thursday, 5 July 2012

अवकाश

"मनातलं अवकाश "  हा  सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह. २००४ ते २००६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकात प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तक. नावा प्रमाणेच मनाच्या अवकाश्यात स्फुरलेल्या वेगवेगळ्या विषयावरच चिंतन, मनात उभे राहिलेल्या प्रश्नाचं, उमटलेल्या व्याख्यांचं हे पुस्तक आपल्याला अंतर्मुख करतं व आपले अवकाश विस्तारतं.      मनातल्या अवकाशातील काही  उल्का , तारे , चांदण्या.
मनात येणारे चांगले विचार जर आपण कधी अंमलात आणणारच नसलो तर ते विचार म्हणजे केवळ जागृतीतील स्वप्नं च नव्हेत का? ते विचार नव्हेतच  त्या कल्पनाच
अहंपणा हा केव्हाही त्याज्यच असतो पण स्वाभिमान म्हणजे अहंपणा नव्हे. स्वाभिमान तेजस्वी दिसतो आनंदी असतो. अहंपणा माणसाला कुरूप करतो " अहंकाराचा वारा न लागो पाडसा, माझ्या विष्णुदासा नामदेवा"
आत्मविश्वास आणि धैर्य याचा सारखे पाठीराखे दुसरे कुणीही नाही. धैर्य म्हणजे आत्मविश्वासातून येणारी निर्भयता. खरंखुरं मनोबल म्हणजे जाणत्या माणसाची शहाणी मनशक्ती.
सुखाने न माजणारं आणि दु;खाने न खचणारं मन लाभणं हि निसर्गाची देणगी आहे.
स्वप्न रहित गाढ झोप म्हणजे श्वासोच्छ्वास करणारा मृतदेह आणि स्वप्नरंजित जागृत प्रकृती म्हणजे धट्टाकट्टा जिवंत माणूस. माणसाला झोपेतही आणि जागुतीतही स्वप्नं  हि पडत राहायला हवीत स्वप्न हे जीवसृष्टीला लाभलेले मोठं देखणं वरदान आहे.
निरुद्देश असं अगदी एकटच भटकंतीला गेलं तर बालकवीची आनंदी आनंदी गडे आठवेल कि आरती प्रभूचा " कुणासाठी कुणासाठी, कशासाठी कुठवर " हा प्रश्न कानी पडेल?
योद्धयाची वाचलेली व्याख्या सागतात " जो लढताना प्रेमिकाच्या तन्मयतेने लढतो आणि प्रेम करताना शुराच्या सर्वस्व समर्पणाचा आनंद मिळवतो".
"पंचमहाभूतातून जन्माला येऊन पंचमहाभूतातच विलीन होणे याला जीवन ऐसे नाव ".
आयुष्याचा फुगा कधी फुटेल हे काही कुणाला कळू शकत नाही. पण सुंदर सुंदर स्वप्न पाहत जगायला काय हरकत आहे?
क्षितीज हा निसर्गाचा भाग म्हणायचा , आपल्या दृष्टीच्या  व्याप्तीची मर्यादा म्हणायची कि आपल्या कल्पनाशक्तीचिच मर्यादा म्हणायची? प्रत्येकाच्या अश्या मर्यादा म्हणजेच त्याचं त्याचं क्षितीज ना?
मी कोण? हा प्रश्न विचारी प्रौढ माणसाला कधी ना कधी पडतोच मी म्हणजे रात्रीचा प्रकाश, पोटातून वाहणारा दिवा कि त्या दिव्याच्या वाहनातून फिरणारा प्रकाश?
आपलं खुजेपण ओळखणं आणि विश्वव्यापारापुढे नतमस्तक होणं हेच सुसंस्कृत माणसाचं लक्षण नव्हे का?
आस्तिक आणि नास्तिक हे दोघेही देवाला होकार आणि नकार देऊन मुळात देव हि कल्पना मान्यच करत असतात ना?
आपल्याला तापदायक अश्या गोष्टी दुस-या कुणामध्ये असल्याकी त्यांना आपण त्यांचे दुर्गुण मानतो. खलनायक, चोर आपल्याला दुर्गुणी वाटतात. प्रण्यानाही हिस्र प्राणी, वनस्पतीनाही विषारी किंवा काटेरी वनस्पती दुर्गुणी वाटत असतील का? कोण जाणे! पण ज्या जीवात असे दुर्गुण उपजतच असतात त्यांना तो त्याची थोरवी किंवा खासियत वाटत असणार, विंचवाला त्याच्या नांगीचा अभिमानच असणार.
भवतालात मनाने विरघळून जाता यायला हवं. एखाद्या कवितेच्या भिंगातून पाहण्याची सवय व्हायला व्यसन लागायला हवं. खंर तर या बाबतीत वेडं व्हायला हवं त्या त्या वेळी असं वेडं होणं हाच शहाणपणा नव्हे का?
धरतीला वटवृक्ष जड आणि गवताचं पातं हलकं वाटत असेल का? आपल्या स्मृतीची गुहा कुठे असेल? मेंदूतच कुठेतरी असावी आपल्या मनासारखी.
प्रत्येक माणूस हे एक झाकलेल माणिक असू शकतं इतरांना त्याच तेज दिसो न दिसो त्या व्यक्तीला स्वत;ला ते जाणवत असतच.


असं हे पुस्तक हाती आले १२ जूनला. पहिल्या लेखातच सुनिताबाईनी १२ जुने विषयी एक योगायोग दिला आहे कि , आमच्या लग्नाची तारीख १२ जून होती आणि त्यानंतर चौपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. 
 
 
 
 
 
                                          पुण्यातिथीच्या दिवसी पुण्यस्मरण करण्याचा योग जुळला. 



 

Monday, 11 June 2012

श्रमदान नव्हे समाधान



निर्मळ तलाव सुशोभिकरण  प्रकल्प सुरु झाला आहे. या अंतर्गत तलावाची खोदाई सुरु असून  त्यातील माती मंदिर परिसरातील झाडां साठी टाकण्यात आली; माती झाडाच्या बुडावर पसरवणे एक मोठे काम आहे. एक विचार पुढे आला आपण सर्व मिळून श्रमदान करू या!!! सगळी  माती टाकण्याचे  काम आपण करू शकणार नाही, परंतु  खारीचा  वाटा आपण उचलू या..


 ठरले रविवार सकाळी ६.३० ते ९ ,एसएमएस,, इमेल मुळे  निरोप देण्याचे काम सोप्प झाले. रविवारी उशिरा उठण्याला सुट्टी देऊन मंडळी सकाळी सकाळी (हाकोटे हाकोटे ) निर्मळ मंदिराकडे जमली. फावडी  घमेली बरोबर आणली होती. आणि  कामाला सुरुवात झाली. मंदिराच्या दर्शनी भागातील सर्व झाडांच्या बुडावर मात्ती टाकण्याचे उद्दिष्ट पुरे करण्यात मंडळीला जमले. 

जमले अश्यासाठी  म्हणतो कि  प्रत्येकाला या कामात आपला सहभाग असायला पाहिजे असे मना पासून वाटत होते,   उत्साह हि भरपूर होता. पण आपण जाणतो कि  काही वर्षा अगोदर आपण  सर्व अंगमेहनतीची कामे करीत होतो, आता हे सर्व मागे पडल्याने शारीरिक थकवा पटकन जाणवतो, 



 तरी हि मन उसळी मारून म्हणत होते " और भी  लढेंगे " ,    आणि हो एक सांगायचे   राहूनच गेले या शीणा  नंतरचे पोहे लाजबाब होते.







ऑलेक पदमसी  चे एक पुस्तक आहे  " अ डबल लाइफ " हे पुस्तक म्हणजे त्यांच्या दुहेरी करिअरचा आलेख आहे. इंग्रजी रंगभूमीवर पन्नास नाटकांची निर्मिती , दिग्दर्शन  आणि सर्फ, लिरील, एम आर एफ टायर्स, रिन, डालडा, कामसूत्र, सनलाईट या उत्पादनांच्या गाजलेल्या व कलात्मक जाहिराती तयार करणारे  ऑलेक पदमसी  आपल्या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात " आपण ज्या समाजात राहतो, त्याच्या सबंधीच     कर्तव्य फक्त देणग्या देण नव्हे, आपला वेळ , शक्ती, आणि कौशल्य हि द्यायाला हवे. एखाद्या  सेवाभावी  संस्थेत  जाऊन  काम करणं, शहर स्वच्छ ठेवायला मदत करणं, नागरिकांनी मिळून मिसळून परस्पर सहकार्यांनी हे केले पाहिजे. सार्वजनिक सेवा हे खाजगी समाधान  असतं ."

Thursday, 31 May 2012

आरोग्यं धनसंपदा


संजीवनी परिवार तर्फे महिलासाठी  आरोग्यं धनसंपदा या कार्यक्रमाचे आयोजन आप्पा फुलारे हॉल येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपक देसाई व  डॉ. उषा देसाई  उपस्थित होते.  डॉ. दीपक देसाई यांनी जन्माला  आलेल्या बाळाच्या काळजी पासून ते स्त्रीयांच्या  जीवनातील वेगवेगळ्या  स्थित्यंतरं  घ्यावयाची काळजी , वयात येणा-या मुलींचा आहार त्यांच्यात निर्माण करावयाची सहनशीलता  या बाबत मार्गदर्शन केले.  डॉ. उषा देसाई  यांनी स्रीयांच्या  प्राथमिक आजाराविषयी माहिती देताना हिमोग्लोबिन व कॅल्शियम संतुलन याचे महत्व समजावून सांगितले. व त्या साठी घ्यावयाचा आहार या विषयी माहिती दिली. मुलींच्या शारीरिक बदला बरोबरच मानसिक अवस्था कुटुंबीयांनी जाणून काळजी घ्यायला  हवी. 

डॉ. दीपक देसाई 27 /05/2012 

उपस्थिती चांगली होती, बराच पल्ला गाठायचा  आहे.

Tuesday, 8 May 2012

संजीवनी परिवार- वार्षिक उपक्रमाचा अहवाल

संजीवनी परिवार संस्था 
   २०११- १२ चा वार्षिक  अहवाल
नमस्कार
२०११-१२ च्या  उपक्रमाचा  अहवाल सादर करताना विशेष आनंद होत आहे. 

व्याख्यानमाला २०११ : दिनांक २३ एप्रिल रोजी श्री संदीप वासलेकरांच    "एका दिशेचा शोध"  या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यानास चांगली उपस्थिती होती. फादर दिब्रिटो, वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम नागरिक, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री  बबनशेठ नाईक होते. कमलाकर पाटील यांनी प्रास्ताविक व  पाहूण्याची  ओळख  करून  दिली. व्याख्यानाच्या  व्यवस्थे विषयी श्री वासलेकर आपल्या संदेशात म्हणतात " अतिशय  उत्कृष्ठ  नियोजन केल्याबद्दल अभिनंदन व संजीवनी साठी शुभेच्छा " .

दिनांक २४ एप्रिल रोजी श्री चंद्रशेखर टिळक यांच आर्थिक घोटाळे आपली अर्थव्यवस्था या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी श्री सुरेश जोशी होते , विलास नाईक यांनी पाहुण्याची ओळख व प्रास्ताविक केले.

दिनांक १ मे रोजी श्री संजय भास्कर जोशी यांनी मी आणि माझा देव हे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी श्री वसंत देशमुख होते, पाहुण्याची ओळख  व प्रास्ताविक हेमंत नाईक यांनी केले. व्याख्यानमालेस  मिळणारा प्रतिसाद संजीवनीची जबाबदारी  वाढवणारा  आहे. चला  तर  कंबर कसू या!!! 

वृक्षांचा वाढदिवस : दिनांक ३,  जुलैचा पहिला रविवार  म्हणजे आपल्या मित्रांचा वाढदिवस. त्यासाठी श्री सायनेकर सर , माई उपस्थित होत्त्या. श्रीमती वीणा गवाणकर यांनी सहारा वाळवंट येथे वृक्ष संवर्धन करणा-या   रुपर्ड बेकर यांची कथा सांगितली. माणसाचं आयुष्य झाडं कशी बदलतात  हे विषद केले. दुपारी सहभोजना नंतर करमणूक व गायनाचा कार्यक्रम झाला. अरविंद पाटील व कुटुंबीय यांचा विशेष सहभाग होता तर श्री सायनेकर सरांच्या  गायनां मुळे या  कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली.

विद्यार्थी    मेळावा : दर वर्षी आपले विद्यार्थी  दहावी ,बारावीच्या परीक्षेत चढत्या क्रमाने यश संपादित आहेत. त्यांना स्पर्धापरीक्षा , UPSC, MPSC या परीक्षे विषयी जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने २६ सप्टेम्बर  २०११ रोजी आप्पा फुलारे हॉल येथे दहावी पुढील विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वर्षी UPSC त यश मिळवणारे श्री स्वप्नील   बावकर यांनी मार्गदर्शन केले.
दुसरा  विध्यार्थी मेळावा ४ डिसेंबर २०११ रोजी विद्यामंदिर नाळे  येथे झाला. श्री संदीपकुमार साळुंखे,  सहाय्यक   आयकर  उपायुक्त, पुणे, दहावीत बोर्डात प्रथम क्रमांक , UPSC, MPSC या  दोन्ही  स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-या  साळुखेसरांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  मोठ्या भावाच्या भूमिकेतून  सागितले  कि " अभ्यासाच एक शास्र झाले पाहिजे. अभ्यासाचे  वेळापत्रक, वाचनाचं  कौशल्य, लिहण्याची कला , स्मरण करण्याच शास्र, रिविजन कशी करावी अश्या पद्धति आपण विकसित  करायला हव्यात".    अध्यक्षस्थानी श्री विश्वनाथ नाईक  होते.  कार्यक्रमा  विषयी विद्यार्थी व पालकांचा  उत्तम फीडबॅक मिळाला.

गुंतवणुकीची गुरुकिल्ली : व्यवसायिक शिक्षणाप्रमाणे आर्थिक साक्षरता महत्वाची या दृष्टीने गुंतवणुकीची गुरुकिल्ली हा परिसंवाद ४ मार्च ला अप्पा फुलारे हॉल येथे  आयोजित  केला होता. अर्थ क्षेत्रातील मान्यवर  श्री चंद्रशेखर टिळक , श्री निखील नाईकश्री संजीव गोखले  व श्री सुनील वालावलकर सहभागी झाले होते. आपणा सर्वांचा  उत्तम प्रतिसाद लाभला.

आरोग्य शिबीर: गुढी पाडव्याच्या दिवसी डॉ स्वाती नाईक व डॉ प्रतिमा पाटील यांच्या पुढाकाराने जागमाता मंदिर येथे कॅल्शियम  व हिमोग्लोबिन तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. १०० लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला. 

अहवाल सालात  चार गरजू रुग्णांना मेडिकल फंडातून आर्थिक सहकार्य करता आले.

आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तसेच लग्न मुंजी ,वाढदिवस , लग्नाची वर्षगाठ , गृहप्रवेश या व इत्यादी समारंभा वेळी काही  मंडळी मेडिकल फंडास मदत करत असतात. आपल्या आनंदात  इतरांना सहभागी करून घेण्याचा  हा  छान मार्ग या मंडळीने शोधून अमंलात आणला आहे. 

 श्री   यज्ञेश्वर  नाईक, (कोतवाल नाना) बोळींज, यांनी  आपल्या ८० व्या वाढदिवसा निमित्य  संजीवनी मेडीकल फंडाला रु. ८१,०००/- ची  भरगोस  देणगी दिली. संजीवनी परिवारा तर्फे  कृतज्ञता व्यक्त करतो.   श्री अरविंद  पाटील,  उमराळे,   यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ   संजीवनी मेडीकल फंडा रु.  १०,०००/- - ची  देणगी दिली. परीवारा तर्फे धन्यवाद.

आपण, मेडीकल फंडा  योगदान करून इतरांनाही आपल्या आनंदात  सहभागी  करून घ्यावे ही विनंती.

आपल्या सर्वांच्या सक्रीय सहभागांनी वरील उपक्रम मूळ धरत आहेत. चला तर हे उपक्रम अधिक व्यापकसर्वसमावेशक करू या !!!  

धन्यवाद !!!
संजीवनी परिवार