Friday, 17 August 2012

मन हि तो कारण हैं!

मुरारीबापूंनी  सुख और दु;ख या विषयावरील प्रवचनात म्हटले आहे कि सुख-दु;ख ,समाधान- असमाधान,  आनंदी - कष्टी  या सगळ्या स्थिती मनावर अवलंबून आहेत. ते एका वाक्यात वर्णन करतात. मन हि तो कारण हैं.
आपल्या साहित्यात संतानी मन या विषयी खूप निरीक्षण , त्याचे स्वभावदर्शन  व  मार्गदर्शन केले आहे. 
स्वामी समर्थांचे मनबोध किवा मनाचे  श्लोक प्रसिद्ध आहेत.मन या विषयी समर्थांची जाणीव फार मोठी होती.आपल्या दैनिन्दिनी जीवनात मनाला वळण कसे लावावे हे समर्थ सोपं करून सागतात. छोट्या छोट्या चरणात खूप  मोठे विचार मांडतात आणि सहजच आचार सुचवितात.
 
 
 
 
 देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।मना सज्जना हेचि क्रीया धरावी ।।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें । परी अंतरीं सज्जना नीववावें ।।
 
मना श्रेष्ठ धारिष्ट जींवी धरावें । मना बोलणें नीच सोशीत जावें ।।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ।।
 
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अति स्वार्थबुध्दी न रे पाप सांचे ।।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासारिखें दु:ख मोठे ।।
 
 
एकूण २०५ मनाचे श्लोक आहेत. मांडणी भक्तिरसात केली आहे परंतु  प्रत्येक श्लोक मनाचे विशेषत्व दाखवितो आणि सुलभ आचरणाचा  मार्ग हि समर्थ सुचवितात.
 
 
 
तुकाराम महाराज आपल्या अभंगातून मनाचे विश्लेषण करतात. आपल्या प्रगतीसाठी त्याच्यावर काबू मिळवावा असे सांगतात.
 
मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धींचे कारण ।
मोक्ष अथवा बंधनासुख । समाधान इच्छा ते ।।1।।
मन प्रतिमा स्थापिली । मने मन पूजा केली।
मने इच्छा पुरविली । मन माऊली सकळांची ।।2।।
मन गुरु आणि शिष्य । मन आपलेची दास्य ।
प्रसन्न आप आपणास । गती अथवा अधोगती ।।3।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात।
नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे।।4।।
 
मना सारखे दुसरे दैवत नाही असे या अभंगात म्हणतात तर दुस-या ठिकाणी म्हणतात

गती अधोगती मनाची हे युक्ती | मन लावा एकांती साधुसंगे
जतन करा जतन करा | धावते सैर ओढाळ ते 
मान अपमान मनाचे लक्षण | लाविलिया ध्यान तेची करी
तुका म्हणे मान उतरी भवसिंधु | मान करी बंधू चौ-याशीचा 
 
रिकामे मन हा राक्षसांचा कारखाना आहे.  तुकाराम  महाराज म्हणतात    रिकामे तू नको मना | राहो क्षणक्षणाहि  आणि मनाच्या आधीन होऊ नये असे सागतात.
 
होऊ नको कांही या मना आधीन | नाइके वचन याचे कांही
हटियाची  गोष्टी मोडून टाकावी | सोई हि धरावी विठोबाची
आपुले आधीन करुनिया ठेवा | नाही तरी जीव घातक हे
तुका म्हणे झाले जे मना आधीन | तयांसी बंधन यम करी
 
 
संत परंपरेतील कवियत्री बहीणाबाई मनाचे वर्णन करतात
 
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर ॥१॥

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावऱ्हल्या रे लाटा ॥२॥

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादनं ॥३॥

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे ततंर
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मतंर ॥४॥
 
मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगू मात
आता  व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत ॥५॥

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर ॥६॥

मन एवढं एवढं
जसं खाकसंचा दाना
मन केवढं केवढं
आभायांत बी मायेना ॥७॥

देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं ॥८॥  
 
 
आधुनिक कवी सुधीर मोघ्यांची एक सुंदर कविता (गीत)   आहे .
 
 मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा लागावा

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेलं
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेलं
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा

चेहरा-मोहरा याचा, कुणी कधी पाहिला नाही
मन अस्तित्वाचा सिंधू, भासाविण दुसरा नाही
या ओळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा लागावा
 
या अश्या नाठाळ  मनाला तळ्यावर आणण्यासाठी संतानी उपाय सांगून किल्ली आपणाकडे दिली आहे.
 

No comments:

Post a Comment