Tuesday, 26 August 2025

सुखाचा शोध

 

 

 ज्ञानपीठ विजेते, ययाती कार  वि. स. खांडेकरांचा पाठ्य पुस्तकात एक धडा होता.  “सुखाचा शोध.”  आठवतो !  पूर्ण धडा आठवत नाही , माणूस सतत सुखासाठी धडपडतो. सुखाचा शोध बाहेर न करता मनामध्ये घ्यावा. . खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नसून शांत, समाधानी आणि निर्मळ मनात आहे. लोभ, मत्सर, स्वार्थ यामुळे सुख नष्ट होते; तर संयम, साधेपणा, प्रेम व नीतिमूल्यांशी जगण्यात खरा आनंद आहे. असे विचार या धड्यात  दिले आहेत.

धडा आठवण्याचं कारण भगवद गीता , ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात सुखाचे तीन प्रकार सांगण्यात आले आहेत. सात्त्विक, राजस, आणि तामस सुख.  आणि त्याची व्याख्या, लक्षणं  दिली आहेत.

 १) सात्त्विक सुख:  
"
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ १८.३७ ॥ "

जे सुख आरंभी कठीण किंवा त्रासदायक वाटते (विषासारखे), पण शेवटी अमृतासारखे गोड होते आणि आत्मबुद्धी प्रसन्न करते, ते सात्त्विक सुख आहे.

संत ज्ञानेश्वर सांगतात—हे सुख सुरुवातीला कठीण वाटते, परंतु अंत:करण शुद्ध करून शेवटी खरेच आनंददायी ठरते. अनेक उदाहरण देऊन स्पष्ट करतात. बालपण  चांगले परंतु ते लाभण्यासाठी  जीवाला अनेक कष्ट सोसावे लागतात. दुसरं उदाहरण समुद्र मंथनाचे देतात, सांगतात अमृत प्राप्त होते, त्यासाठी  विष पचवावे लागते.

२) राजस सुख:

"विषयेन्द्रियसंयोगात् यत्तदग्रेऽमृतोपमम् । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥१८.३८ ॥ "

जे सुख सुरुवातीला गोड व आनंददायी वाटते (अमृतासारखे), पण शेवटी विषासारखा दुःखद अनुभव देते, ते राजस सुख आहे.
ज्ञानेश्वर सांगतात—इंद्रियांच्या विषयभोगांमुळे जे सुख भासतं, ते नंतर त्रास आणि हानी निर्माण करतं. उदाहरणार्थ रोग्याला साखर, केळं गोड लागते त्याने कुपथ्य होते. ऋण काढून लग्नाचा थाट करणे.  

३) तामस सुख:
"यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहन्मात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥१८.३९ ॥ "

 जे सुख अज्ञान निर्माण करते, जडत्व वाढवते आणि निद्रा, आळस व प्रमाद यांतून उत्पन्न होते, ते तामस सुख आहे.

 संत ज्ञानेश्वर सांगतात—हे सुख मुळातच मोह, आलस्य व अज्ञान वाढवते, जे आत्म्याला अधोगतीकडे नेते. उदाहरण देतात, अपेयपान करणे, अभक्ष्यभक्षण करणे. ज्याच्या आरंभी आणि शेवटी स्वत: ची विस्मृती होते.

आपण जे कर्म करतो त्याचे फलरूप सुख मिळते. ते  तीन प्रकारात मोडते. त्याचं वेगळेपणा  दर्शवण्यासाठी ज्ञानेश्वर माउलींनी खूप दाखले दिले आहेत. जिज्ञासूनी ह्या ओव्या मुळापासून वाचाव्या. सुखाची धडपड थांबवावी, यातील श्रेयस्कर सुख कोणते हे जाणून घ्यावे आणि प्राप्त करावे.

 

 

Friday, 22 August 2025

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः

 


संजय कुरुक्षेत्रावरील वृतांत धृतराष्ट्र महाराजाला कथन करीत असतात. पुत्रप्रेमानी आंधळ्या झालेल्या धृतराष्ट्राला  भगवद गीता, विश्वरूप दर्शन यात  रस नसून युद्धात जय कोणाचा होईल ही चिंता आहे.  ह्याची कल्पना संजयला आहे. गीतेच्या शेवटच्या श्लोकात संजय म्हणतात. 

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ १८-७८॥  

जेथे योगेश्वर कृष्ण, जेथे धनुर्धर पार्थ, तेथे श्री जय वैभव, नित्य नीती माझे मत

वरील श्लोकाचं निरुपण करताना ज्ञानेश्वर महाराजाच्या कवित्वाला कसा बहर येतो बघा,अनुभवा.

कृष्ण, अर्जुन एकत्र असणे म्हणजे धर्म,यश, श्री, वैभव  ह्या चार गोष्टी सहज साध्य आहेत. कसं आणि किती सहज आहे.

चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका । संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥ १६३३ ॥
रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक । वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं ॥ १६३४ ॥
दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु । सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा ॥ १६३५ ॥
वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें । सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं ॥ १६३६ ॥
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन । दर्शनीं समाधान । आथी जैसें ॥ १६३७ ॥
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु । हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें ॥ १६३८ ॥
तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥ १६३९ ॥
आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं । अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें ? ॥ १६४० ॥
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें । तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥ १६४१ ॥
जयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु । श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥ १६४२ ॥

 

जसा चंद्र तेथे चांदणे, शंभु तेथे पार्वती, संत तेथे विवेक ,राजा तेथे कटक (सैन्य), सौजन्य तेथे सोयरीक, अग्नी तेथे उष्णता, दयेने धर्मज्या ठिकाणी कारण असते तेथे परिणाम आपोआप असतो.धर्म तेथे सुख, आणि सुखी पुरुषोत्तम,  वसंत तेथे फुललेली वनराई, फुलांमध्ये मधुर सुगंध, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानींना आत्मदर्शन, भाग्य तेथे विलास,जसा सूर्य तेथे प्रकाश असतो.

तसेच श्रीकृष्ण जिथे आहेत तिथेच लक्ष्मी, ऐश्वर्य, विजय नक्कीच असतो.  जगदंबा (लक्ष्मी) ही श्रीकृष्णाची पत्नी — तिथे अणिमा, लघिमा इत्यादी सर्व सिद्धी दासीप्रमाणे उपस्थित असतात.  ज्याच्या भाग्यात श्रीकृष्ण असतो त्याच्याकडे आपोआप विजय धावून येतो.

अर्जुन म्हणजे जयो (विजयाचे प्रतीक), आणि श्रीकृष्ण म्हणजे विजयस्वरूप — त्यामुळे लक्ष्मी आणि विजय दोन्ही जिथे आहेत तेथे यश निश्चित आहे.

 

ज्ञानेश्वरीत शेवटी येते ते “पसायदान”. ज्ञानेश्वरीचा मुकुट मणी.

विश्वात्मक मन, विश्वात्मक देव, विश्वात्मक मागणे. 

ज्ञानोबा माऊली !!

 


बरा चांगला उत्तम.

 


ज्ञानोबांनी. ज्ञानेश्वरीत अठराव्या अध्यायात  बरा, चांगला, उत्तम याची चढती भाजणी खालील ओव्यातून दिली आहेत. ओव्या अर्थासह  वाचल्या नंतर नक्कीच अर्थपूर्ण आणि गोड वाटतील.

आणि ऋतू बरवा शारदु| शारदी पुढती चांदू | चंद्री जैसा सबंधु | पूर्णिमेचा ||३४४ ||

का वसंती बरवा आरामू | आरामीही प्रियसंगमू | संगमी आगामू | उपचारांचा ||३४५||

नाना कमळी पांडवा | विकासु जैसा बरवा | विकासाही यावा | परागाचा ||३४६||

वाचे बरवे कवित्व | कवित्वी बरवे रसिकत्व | रसिकत्वी परतत्त्व | स्पर्शू जैसा ||३४७||

 

 

सर्व ऋतुं मध्ये शरद ऋतू चांगला, त्यात शुक्लपक्षातील चंद्र चांगला , पौर्णिमेचा तर फारच उत्तम. (शरदाचे चांदणे , शरद पोर्णिमा )

वसंत ऋतूत बाग चांगली, बागेत आवडते मनुष्य भेटावे हे अधिक चांगले, त्यातही सर्व सुखे मिळावी हे फारच उत्तम.

कमळ चांगले, कमळाचे उमलणे अधिक चांगले व त्यातही सुगंध उत्तम.

वाणीत कवित्व चांगले, काव्यात रसपुर्णता चांगली, व रसपुर्णतेसही  परतत्त्वाचा, आत्मानंदाचा, अनुभूतीचा स्पर्श फारच उत्तम.  

 

ज्ञानोबा माउलीच्या ओव्या आवडल्या तर चांगल्या , गोडी वाटली तर अधिक चंगले. ज्ञानेश्वरी वाचावी असे वाटले तर उत्तमच.

ग्यानबा तुकाराम.