Tuesday, 26 August 2025

सुखाचा शोध

 

 

 ज्ञानपीठ विजेते, ययाती कार  वि. स. खांडेकरांचा पाठ्य पुस्तकात एक धडा होता.  “सुखाचा शोध.”  आठवतो !  पूर्ण धडा आठवत नाही , माणूस सतत सुखासाठी धडपडतो. सुखाचा शोध बाहेर न करता मनामध्ये घ्यावा. . खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नसून शांत, समाधानी आणि निर्मळ मनात आहे. लोभ, मत्सर, स्वार्थ यामुळे सुख नष्ट होते; तर संयम, साधेपणा, प्रेम व नीतिमूल्यांशी जगण्यात खरा आनंद आहे. असे विचार या धड्यात  दिले आहेत.

धडा आठवण्याचं कारण भगवद गीता , ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात सुखाचे तीन प्रकार सांगण्यात आले आहेत. सात्त्विक, राजस, आणि तामस सुख.  आणि त्याची व्याख्या, लक्षणं  दिली आहेत.

 १) सात्त्विक सुख:  
"
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ १८.३७ ॥ "

जे सुख आरंभी कठीण किंवा त्रासदायक वाटते (विषासारखे), पण शेवटी अमृतासारखे गोड होते आणि आत्मबुद्धी प्रसन्न करते, ते सात्त्विक सुख आहे.

संत ज्ञानेश्वर सांगतात—हे सुख सुरुवातीला कठीण वाटते, परंतु अंत:करण शुद्ध करून शेवटी खरेच आनंददायी ठरते. अनेक उदाहरण देऊन स्पष्ट करतात. बालपण  चांगले परंतु ते लाभण्यासाठी  जीवाला अनेक कष्ट सोसावे लागतात. दुसरं उदाहरण समुद्र मंथनाचे देतात, सांगतात अमृत प्राप्त होते, त्यासाठी  विष पचवावे लागते.

२) राजस सुख:

"विषयेन्द्रियसंयोगात् यत्तदग्रेऽमृतोपमम् । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥१८.३८ ॥ "

जे सुख सुरुवातीला गोड व आनंददायी वाटते (अमृतासारखे), पण शेवटी विषासारखा दुःखद अनुभव देते, ते राजस सुख आहे.
ज्ञानेश्वर सांगतात—इंद्रियांच्या विषयभोगांमुळे जे सुख भासतं, ते नंतर त्रास आणि हानी निर्माण करतं. उदाहरणार्थ रोग्याला साखर, केळं गोड लागते त्याने कुपथ्य होते. ऋण काढून लग्नाचा थाट करणे.  

३) तामस सुख:
"यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहन्मात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥१८.३९ ॥ "

 जे सुख अज्ञान निर्माण करते, जडत्व वाढवते आणि निद्रा, आळस व प्रमाद यांतून उत्पन्न होते, ते तामस सुख आहे.

 संत ज्ञानेश्वर सांगतात—हे सुख मुळातच मोह, आलस्य व अज्ञान वाढवते, जे आत्म्याला अधोगतीकडे नेते. उदाहरण देतात, अपेयपान करणे, अभक्ष्यभक्षण करणे. ज्याच्या आरंभी आणि शेवटी स्वत: ची विस्मृती होते.

आपण जे कर्म करतो त्याचे फलरूप सुख मिळते. ते  तीन प्रकारात मोडते. त्याचं वेगळेपणा  दर्शवण्यासाठी ज्ञानेश्वर माउलींनी खूप दाखले दिले आहेत. जिज्ञासूनी ह्या ओव्या मुळापासून वाचाव्या. सुखाची धडपड थांबवावी, यातील श्रेयस्कर सुख कोणते हे जाणून घ्यावे आणि प्राप्त करावे.

 

 

No comments:

Post a Comment