Friday, 22 August 2025

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः

 


संजय कुरुक्षेत्रावरील वृतांत धृतराष्ट्र महाराजाला कथन करीत असतात. पुत्रप्रेमानी आंधळ्या झालेल्या धृतराष्ट्राला  भगवद गीता, विश्वरूप दर्शन यात  रस नसून युद्धात जय कोणाचा होईल ही चिंता आहे.  ह्याची कल्पना संजयला आहे. गीतेच्या शेवटच्या श्लोकात संजय म्हणतात. 

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ १८-७८॥  

जेथे योगेश्वर कृष्ण, जेथे धनुर्धर पार्थ, तेथे श्री जय वैभव, नित्य नीती माझे मत

वरील श्लोकाचं निरुपण करताना ज्ञानेश्वर महाराजाच्या कवित्वाला कसा बहर येतो बघा,अनुभवा.

कृष्ण, अर्जुन एकत्र असणे म्हणजे धर्म,यश, श्री, वैभव  ह्या चार गोष्टी सहज साध्य आहेत. कसं आणि किती सहज आहे.

चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका । संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥ १६३३ ॥
रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक । वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं ॥ १६३४ ॥
दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु । सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा ॥ १६३५ ॥
वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें । सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं ॥ १६३६ ॥
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन । दर्शनीं समाधान । आथी जैसें ॥ १६३७ ॥
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु । हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें ॥ १६३८ ॥
तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥ १६३९ ॥
आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं । अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें ? ॥ १६४० ॥
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें । तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥ १६४१ ॥
जयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु । श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥ १६४२ ॥

 

जसा चंद्र तेथे चांदणे, शंभु तेथे पार्वती, संत तेथे विवेक ,राजा तेथे कटक (सैन्य), सौजन्य तेथे सोयरीक, अग्नी तेथे उष्णता, दयेने धर्मज्या ठिकाणी कारण असते तेथे परिणाम आपोआप असतो.धर्म तेथे सुख, आणि सुखी पुरुषोत्तम,  वसंत तेथे फुललेली वनराई, फुलांमध्ये मधुर सुगंध, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानींना आत्मदर्शन, भाग्य तेथे विलास,जसा सूर्य तेथे प्रकाश असतो.

तसेच श्रीकृष्ण जिथे आहेत तिथेच लक्ष्मी, ऐश्वर्य, विजय नक्कीच असतो.  जगदंबा (लक्ष्मी) ही श्रीकृष्णाची पत्नी — तिथे अणिमा, लघिमा इत्यादी सर्व सिद्धी दासीप्रमाणे उपस्थित असतात.  ज्याच्या भाग्यात श्रीकृष्ण असतो त्याच्याकडे आपोआप विजय धावून येतो.

अर्जुन म्हणजे जयो (विजयाचे प्रतीक), आणि श्रीकृष्ण म्हणजे विजयस्वरूप — त्यामुळे लक्ष्मी आणि विजय दोन्ही जिथे आहेत तेथे यश निश्चित आहे.

 

ज्ञानेश्वरीत शेवटी येते ते “पसायदान”. ज्ञानेश्वरीचा मुकुट मणी.

विश्वात्मक मन, विश्वात्मक देव, विश्वात्मक मागणे. 

ज्ञानोबा माऊली !!

 


No comments:

Post a Comment