Wednesday, 28 January 2026

माझी देवपूजा !

  भगवंताला प्रिय असलेली आठ पुष्पे. 

काल आदरणीय सुधा मूर्ती कडून एक श्लोक एकला,  त्यांत  विष्णू ला प्रिय असलेल्या आठ पुष्पा चे वर्णन आहे. 

अहिंसा प्रथमं पुष्पं पुष्पमिन्द्रियनिग्रहः । सर्वभूतदयापुष्पं क्षमापुष्पं विशेषतः ॥

ज्ञानपुष्पं तपः पुष्पं ध्यानपुष्पं तथैव च । सत्यपुष्पमष्टमं प्रोक्तं विष्णोः प्रीतिकरं भवेत् ||

 

दररोज देवपूजेत फुले, हार, अक्षता अर्पण करतात . भारतीय आध्यात्मिक परंपरा सांगते की भगवंताला बाह्य फुलांपेक्षा अंतःकरणातील सद्गुण अधिक प्रिय असतात. हेच सत्य सांगणारा एक अत्यंत सुंदर श्लोक पद्मपुराण / स्कंदपुराण (भक्ती-कांड) मध्ये आहे — (अष्टपुष्पी).  श्लोकात भगवंताला अर्पण करावयाची आठ श्रेष्ठ पुष्पे सांगितली आहेत. हाच संदर्भ मा. सुधा मूर्ती देत होत्या. 

या श्लोकात पाठभेद आहे. काही ठिकाणी ज्ञान तप एवजी दान आणि योग असा भेद आहे. त्याचं कारण ही आहे. ज्ञान आणि तप कठीण आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना दान आणि योग आचरणात आणता येतील.  

 

अहिंसा प्रथमं पुष्पं पुष्पमिन्द्रियनिग्रहः । सर्वभूतदयापुष्पं क्षमापुष्पं विशेषतः ॥

ध्यानपुष्पं दानपुष्पं योगपुष्पं तथैव च । सत्यपुष्पमष्टमं प्रोक्तं विष्णोः प्रीतिकरं भवेत् ॥

 

पहिले पुष्प आहे अहिंसा — कोणत्याही जीवाला विचाराने, शब्दाने किंवा कृतीनेही इजा न करणे. अहिंसा हीच सर्व धर्मांची मुळं आहेत.

दुसरे पुष्प आहे इंद्रियनिग्रह — आजच्या भोगप्रधान काळात इंद्रियांवर संयम ठेवणे ही खरी साधना आहे.

तिसरे पुष्प आहे सर्वभूतदया — सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा ठेवणे. देव मंदिरात नसून प्रत्येक जीवामध्ये आहे, ही जाणीव.

चौथे पुष्प आहे क्षमा — अपमान सहन करूनही द्वेष न बाळगणे. क्षमा ही दुर्बलतेची नव्हे, तर आत्मिक शक्तीची निशाणी आहे.

पाचवे पुष्प आहे ज्ञान — आत्मा आणि परमात्म्याचा विवेक, अज्ञानाचा नाश करणारे तेज.

सहावे पुष्प आहे तप — केवळ उपवास नव्हे, तर मन, वाणी आणि आचरणाचे शुद्धीकरण.

सातवे पुष्प आहे ध्यान — ईश्वरचिंतनात मन स्थिर करणे, अंतर्मुख होणे.

आणि आठवे, अंतिम पुष्प आहे सत्य — विचार, शब्द आणि कृती यांची एकरूपता.

पाठभेदतील दोन गुणां विषयी.

 दान — गरजूंसाठी आपले काहीतरी देणे. दान म्हणजे केवळ धन नव्हे, तर वेळ, श्रम आणि ममत्व अर्पण करणे.

  योग — जीवनात संतुलन. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय.

 

ही आठ पुष्पे जर आपल्या जीवनात उमलली, तर देव वेगळा शोधावा लागत नाही. आपले जीवनच पूजा बनेल.

No comments:

Post a Comment