Sunday, 24 May 2026

तंदुरुस्त, तल्लख आणि सक्रिय वृद्धत्व.

 


अलीकडेच मुंबईत   “ सन्मानाने, स्वावलंबीपणे आणि आनंदाने वृद्धत्व ”   या विषयावर परिसंवाद झाला. तज्ज्ञ मंडळीचा सहभाग होता. त्यातील काही  मुद्दे, विचार.

भारतात पुढील दहा वर्षात,  प्रत्येक ७ पैकी १ व्यक्ती ६० हून अधिक वयाची असेल. वरिष्ठ नागरिकांसाठी  सेवा, उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञान, निवास, सामाजिक व आर्थिक व्यवस्था उभी करावी लागेल. खालील मुद्द्यावर चर्चा झाली.         


 

सक्रिय वृद्धत्व       :  सक्रिय, स्वतंत्र आणि सन्मानाने वृद्धत्व.

एकाकीपणा          : एकाकीपणा हा मोठा आरोग्यधोका.

आहार ,पोषकतत्त्वे :  प्रथिने, जीवनशैली औषध.

गतिशीलता           : संयुक्त संरक्षण, व्यायाम, संतुलन.

ज्येष्ठांसाठी तंत्रज्ञान  : ॲप्स,  डिजिटल सहवास, प्रवेशयोग्यता.

पिढीगत नाते          :  तरुण आणि ज्येष्ठ पिढ्यांमधील नातेसंबंध.

 

फक्त जास्त वर्षे जगणे महत्त्वाचे नाही; ती वर्षे स्वाभिमानाने, स्वावलंबीपणे आणि आनंदाने जगणे अधिक महत्त्वाचे आहे.”

आपल्यातील प्रत्येकाला स्वाभिमानाने, कुणावरही अवलंबून न राहता आनंदाने आपले रोजचे जीवन जगता यावे अशी मनोमन इच्छा असते.

आज आपल्याकडे वरिष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कुटुंबव्यवस्था बदलते आहे, मुले त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीने परदेशात किंवा वेगळ्या शहरांत राहत आहेत, आयुर्मान वाढत आहे; पण त्याचवेळी एकाकीपणा, हालचालीतील मर्यादा, जीवनशैलीजन्य आजार आणि मानसिक ताणही वाढत आहेत. अशा काळात  सक्रिय वृद्धत्व  Active Ageing” ही संकल्पना केवळ आरोग्यविषयक नसून सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक गरज बनली आहे.

सर्व तज्ज्ञांनी एक गोष्ट स्पष्ट केली — वृद्धत्व म्हणजे निष्क्रियता नव्हे; तर नव्या प्रकारे सक्रिय होण्याची संधी आहे.

स्वावलंबन, स्वतःची कामे स्वतः करता येणे, चालणे, विचार करणे, निर्णय घेणे, समाजात सहभागी राहणे आणि शेवटपर्यंत सन्मानाने जगणे — हेच सक्रिय वृद्धत्वाचे केंद्र आहे.

वय वाढणे थांबवता येत नाही; पण शरीराची कार्यक्षमता टिकवता येते. त्यांनी “Activities of Daily Living (ADL)” या संकल्पनेवर भर दिला — म्हणजे दैनंदिन कामे सहज करता येणे. वयापरत्वे  शारीरिक शक्ती कमी होते (Strength), समतोल ढळतो (Balance), हालचालीवर बंधनं येतात (Movement), स्नायूची लवचिकता (Flexibility) आणि मानसिक सजगता (Cognitive Sharpness)  या बाबीकडे विशेष लक्ष द्यायला सांगितले.

आहार — औषधापेक्षा प्रभावी,  ८०% आरोग्य हे पोषणावर अवलंबून असते.  , diabetes, fatty liver, obesity यांसारख्या समस्या ६०-७० वयानंतरही जीवनशैली (lifestyle) बदलांनी सुधारू शकतात. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे या वयात आता काय बदल होणार?”  बदल कोणत्याही वयात शक्य आहेत.  खाण्यात  प्रथिने (protein)  आहे का ते पाहा, प्रक्रिया केले अन्न  (processed food) आणि साखर (sugar)  कमी करा, वाईट आहाराला (supplement food) भरून काढू शकत नाहीत.

अनेक वरिष्ठ नागरिक diabetes किंवा BP मुळे नव्हे, तर  एकाकीपणा (loneliness)  मुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचतात.  स्वतःला चार भिंतींमध्ये बंद करू नका.” “Second Innings” ची सुंदर कल्पना मांडली. संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी घालवल्यानंतर आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे.  ज्ञान घेण्याला वय नसते. नवीन छंद जोडा, मित्रमंडळी तयार करा, कला, योग, सामाजिक उपक्रम यांत सहभागी व्हा,  तरुण पिढीकडून  technology शिका.

समस्या वयाची नाही; समस्या रूढिवादाची  (stereotypes) आहे. म्हणजेच रूढी,परंपरा चा अतिरेक.

तंत्रज्ञान (technology)  ही एकाकीपणा (loneliness)  कमी करण्यासाठी, शिकणे (learning) सुरू ठेवण्यासाठी आणि स्वावलंबन (independence)  टिकवण्यासाठी महत्त्वाची साधन आहे. 

दीर्घायुषी, वृद्ध आहे म्हणजे भाग्यवान आहे.   अनेक senior citizens  फेसबुक, व्हॉटसअप्प,  सक्रिय असल्याचे दिसतात.

भारतीय समाजात वृद्धत्व म्हणजे वेदना स्वीकारणे अशी मानसिकता आहे. पण आजच्या वैद्यकीय प्रगतीमुळे  प्रत्येक अपायवर उपाय आहे.

वेदना ही सामान्य गोष्ट नाही. (Pain is not normal.)  ती संकेत, खूण समजून लवकर निदान करून प्रतिबंधात्मक उपाय योजता येतात. मोठ्या समस्या टाळता येतात.

 कधीही  Longer Life पेक्षा Better Life महत्त्वाचे.

(जिज्ञासू साठी परिसंवाद लिंक https://www.youtube.com/watch?v=2njCg-lNfyI)

Sunday, 17 May 2026

आपले बुध्दिमान सोयरे

 

आपले बुध्दिमान सोयरे – सुबोध जावडेकर, राजहंस प्रकाशन

प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का?    

त्यांना मन असतं का? भाषा भावना का?
स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का?

काही वेळा  प्राण्यांची हुशारी बघून आपल्यालाच आश्चर्याने तोंडात बोट घालायची पाळी येते. कधी कधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावून जातो.

हे सगळं ते उपजत प्रेरणेने करतात की विचारपूर्वक?

माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुद्धिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय?

मुंग्यांपासून ते हत्तींपर्यंत आणि चिमण्यांपासून ते चिंपांझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाचशे वर्षांत — विशेषतः वर्तनशास्त्र या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे.  त्या आधारे या प्रश्नांचा छडा घेणारं हे पुस्तक.
 

बुध्दीमत्ता कशाला म्हणायचं ?  या प्रश्नाचं उत्तर सोप्पं नाही. काही तत्ववेत्या च्या मते  निर्णयक्षमता, उपक्रमाशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता, परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुध्दीमत्ता.

सुसंगतपणे विचार करण्याची, योजना आखण्याची, समस्या सोडवण्याची, अमूर्त पातळीवर विचार करण्याची, जटिल कल्पना समजून घेण्याची, नवीन गोष्ट पटकन आत्मसात करण्याची, अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुध्दीमत्ता.

संशोधक , अभ्यासक हॉवर्ड गार्डनर यांनी सिध्दांत मांडला आहे. ते म्हणतात बुद्धिमत्ता एकाच प्रकारची नसून तिचे अनेक प्रकार आहेत. नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता त्यांनी कल्पील्या आहेत. प्रत्येक माणसात या सर्व बुद्धिमत्ताचं कमी अधिक प्रमाणात मिश्रण असते.

१ तार्किक आणि गणिती बुद्धिमत्ता (Logical-Mathematical Intelligence) : तर्कशुद्ध विचार करायची क्षमता व हिशेब करायची क्षमता.

२ सांगीतिक बुद्धिमत्ता (Musical Intelligence) : सुरांची जाण असणं, लयीचा अचूक अंदाज असणं आणि संगीतातील सौदर्याचे आकलन होणे.

३ अस्तित्ववादी बुद्धिमत्ता (Existential Intelligence) : माणसाच्या अस्तित्वाबद्दल विचार करायची क्षमता,  या जगात का आलो, कुठून आलो, जगण्याचा अर्थ काय? जीवन, मृत्यू, विश्व, आत्मा, ईश्वर, अस्तित्व यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा विचार करण्याची क्षमता.

 भाषाविषयक बुद्धिमत्ता (Linguistic Intelligence) : भाषेचा वापर करण्याचे कौशल्य, भाषेतले बारकावे-खचाखोचा समजून घेण्याची क्षमता.

५ शारीरिक हालचालीशी संबंधित बुद्धिमत्ता (Bodily-Kinesthetic Intelligence) : मन, शरीर यातील ताळमेळ वस्तु हाताळण्याचे कौशल्य ..

६ स्वत:ला ओळखण्याची बुद्धी (Intrapersonal Intelligence) : मनातील विचार , भावना जाणून घेण्याची क्षमता.

७ दुस-याचं मन जाणून घेण्याची बुद्धिमत्ता (Interpersonal Intelligence) : दुस-याशी संवाद साधण्याची क्षमता. इतरांबद्दल संवेदनशीलता. त्याचे विचार समजून घेण्याची क्रिया. इतरांच्या भावना, हेतू, स्वभाव आणि वर्तन समजून घेण्याची क्षमता.

  अवकाशाशी संबंधित बुद्धिमत्ता  (Spatial Intelligence) : अवकाशाचं भान, त्रिमीतित विचार करायची क्षमता. चित्र, आकार, दिशा, अवकाश आणि प्रतिमा यांच्या माध्यमातून विचार करण्याची क्षमता.

९ निसर्गाशी संवाद साधायची क्षमता (Naturalistic Intelligence) : संजीव निर्जीव, निसर्गातील घटक, वनस्पती, प्राणी, पर्यावरण यांचे निरीक्षण व वर्गीकरण करण्याची क्षमता.

प्राण्यांच्या बुध्दीमत्तेबद्दल विचार करताना, त्यांच्याकडे असलेली उपजतबुध्दीचा  विचार करायला हवा. काही सूचना त्यांच्या मेदूत कोरलेल्या असतात ते समजून उमजून विचारपूर्वक वागत नाहीत तर मेंदूतील सूचनेप्रमाणे त्यांचं वागणे असते.

आनंद, राग, प्रेम, दू:ख  या भावना प्राण्यात असतात. त्यांना रागावताना, घाबरलेले, दू:खी होताना, खुश होताना आपण पहातोच.  

वरील बुध्दीमत्तेच्या वर्गीकरणाच्या कसोट्या वर  कीटक, सरपटणारे प्राणी, कावळे, इतर पक्षी, पाळीव प्राणी व्हेल, डॉल्फिन्स, कपी चिपांझी यावर करण्यात आलेल्या प्रयोगाची माहिती खूपच उद्बोधक आहे. त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. या प्रयोगांच्या विडिओ लिंक जागोजगी दिल्या आहेत. आपण त्या पाहू शकतो.

कपीकुलातील प्राणी  म्हणजे मानवसदृश प्राणी. यात बोनोबो, चिपांझी, ओरांगउटान आणि माणूस आशा पाच प्रजाती येतात. माणसाप्रमाणे यांना बोलता येत नाही परंतु भाषा समजते असे प्रयोगाने जाणवले आहे.  

बोनोबो  आणि चिपांझी चा डीएनए जवळपास ९८.५ टक्के माणसाच्या डीएनएसारखा असतो.

उत्तम बुध्दीमत्ता असलेल्या प्राण्यांमध्ये तीन गोष्टी असतात. मोठं आयुष्यमान (३०-४० वर्षे) अनुभवातून शिकण्याची क्षमता, समूहानं राहण्याची जीवनशैली.

प्राण्यांचं वर्तन , उपजत बुध्दी , आईबापांनी दिलेले ज्ञान, स्वतंत्र विचार करायची शक्ति यानुसार होत असते.

गेल्या काही वर्षात प्राण्यांच्या बुध्दीमत्तेसंबंधी संशोधनला विलक्षण गती आली आहे. डोकं चक्रावून टाकणा-या गोष्टी समोर येत आहेत. गैरसमज दूर होत आहेत. नवीन उत्तरं मिळत आहेत.


Friday, 8 May 2026

चांगुलपणा म्हणजेच देवपण.

 चांगुलपणा म्हणजेच देवपण.

 श्री.यजुर्वेंद्र महाजन . (संस्थापक दीपस्तंभ फाऊंडेशन.)      


चांगुलपणा म्हणजेच देवपण, आणि चांगुलपणा आपल्या सर्वात असतो. असे प्रतिपादन  दीपस्तंभ फाऊंडेशन, मनोबल प्रकल्पाचे संस्थापक श्री यजुर्वेंद्र  महाजन  यांनी संजीवनी व्याख्यानमाला २०२६ मध्ये  " चांगला माणूस घडताना”  या विषयावर बोलताना केले. अध्यक्षस्थानी टीआयएफआर मधून निवृत्त झालेले वरिष्ठ विज्ञान अधिकारी श्री. मनोज नाईक होते.   

यजुर्वेंद्र मास्तरांनी चांगला माणूस म्हणजे काय यावर संवाद साधला. या संवादातून एक एक मूल्य, गुण  उलगडून सांगितला. मानवी जीवन आपल्याला लाभलं आहे हे सर्वांत महत्त्वाचे. नातेसंबंध विषयी बोलताना म्हणाले  आजकाल आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसाचा वापर करतो. खरंतर  माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि वस्तूचा वापर. चांगला माणूस होण्यासाठी  आदरभाव, नम्र, प्रेमळ, संवेदनशील, सेवाभावी आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे. चांगला माणूस घडण्यासाठी आपण कुटुंब, समाज म्हणून काही योजना, नियोजन करतो का?  चांगल्या माणसाला महत्व द्यायला सुरवात करा, त्यांचा आदर करा, वाईटाला वाईट जर म्हटलं नाही आणि समाजाने चांगल्या माणसाला उत्तम वागणूक दिली नाही तर तुम्ही  भविष्यासाठी वाईट समाज निर्माण करत आहात. जीवन मूल्यांची अशी विशेषता आहे की, ती दिली की वाढतात, प्रेम दिलं की प्रेम मिळतं, आदर दिला तर आदर मिळतो, मदत केली तर मदत मिळते.  



दीपस्तंभ फाउंडेशनच्या कार्याला सुरवात कशी झाली हे सांगताना जीवनात चांगले मित्र असणे महत्त्वाचे आहे. माझा मित्र मला स्वामी विवेकानंदांवरील व्याख्यानाला घेऊन गेला. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकाल. जो विचार सातत्याने कराल ज्याच्यावर विश्वास ठेवाल, संपूर्ण झोकून द्याल (समर्पण) तेच तुमच्या  जीवनात घडते. तिथून माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. २५ व्या वर्षीच अत्यंत गरजू आणि गरीब लोकांना उत्तम,दर्जेदार (Quality Education ) शिक्षण देण्याचा संकल्प केला आणि  संस्था स्थापन केली जी आता   सर्वसमावेशक, सर्वांना खुली आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते. संस्था १४ प्रकारचे अपंगत्व तीन प्रकारचे अनाथ, दोन ट्रान्सजेंडर, आदिवासी, आर्थिकदुर्बल घटकांसाठी खुली आहे. आज या संस्थेतून महाजन मास्तरांची मुलं क्लासवन, ऑफिसर, बँक ऑफिसर, आयपीएस होत आहेत म्हणजेच संपूर्ण अंत्योदय होत आहे.


सुरवातीला आनंद पाटील यांनी संजीवनीची पूर्वपीठिका व विविध उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरण उपक्रमात सर्वांना सहभागी होण्याचे, तसेच विद्यार्थ्यांनी संजीवनी स्टडी सेंटर सुविधाचा लाभ घेण्याचे  आवाहन केले. संजीवनी कृतज्ञता निधी मागची भूमिका मांडताना सांगितले की, समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणा-या संस्थेला काही मदत करते. या पूर्वी आदरणीय भारती ठाकूर यांच्या नर्मदालय संस्थेला, श्री. सागर रेड्डी यांच्या अनाथांचा नाथ या संस्थेला, गेल्यावर्षी सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणा-या सुमेधा ताई यांचा संस्थेला मदत केल्याची माहिती दिली. 



यावर्षी दीपस्तंभ फाऊंडेशनला आमदार श्री राजन नाईक, उपमहापौर श्री मार्शल लोपिस, श्री मनोज पाटील यांच्या हस्ते  एक लाख दहाहजारा हून अधिक कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला.  यावेळी आमदार राजन नाईक यांनी रु ५०००० देणगी दिली.




कार्यक्रमाच्या सुरवातीला मंगेश नाईक, कौस्तुभ पाटील, सौ. रीमा नाईक यांनी माणसानी माणसाशी माणसा सम वागावे हे  विषयाला समर्पक गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राप्ती पाटील आणि  अश्विनी पाटील यांनी सुरेखरित्या केले.

“देशाचे स्वातंत्र्य” हे सर्वाधिक मूल्य मानणारे सुभाष एकमेव स्वातंत्र्य सेनानी.

 “देशाचे  स्वातंत्र्य”  हे सर्वाधिक मूल्य मानणारे सुभाष एकमेव स्वातंत्र्य सेनानी -  संपादक आनंद हर्डीकर. 



देशाचे  स्वातंत्र्य हे सर्वाधिक मूल्य मानणारा, त्यासाठी तन मन धन अर्पण करून  झटणारा,  छत्रपती शिवाजी महाराजवादी सुभाषबाबू हे एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आनंद हर्डीकर यांनी संजीवनी परिवार आयोजित व्याख्यानमालेत सामवेद भवन उमराळे येथे  ‘नेताजी, तुमि कोथाय?` या विषयावर बोलताना केले. अध्यक्षस्थानी RCF चे निवृत जनसंपर्क अधिकारी श्री संतोष वझे होते. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन आणि  कदम कदम बढाए जा  हे समरगीत सौ. रीमा नाईक, सौ. सुविधा नाईक, कौस्तुभ पाटील, अनंत नाईक यांनी सादर करून वातावरण निर्मिती केली. 




  





 

ज्येष्ठ लेखक, संशोधक  आनंद हर्डीकर पुढे म्हणाले की सुभाषबाबूनी छत्रपती शिवाजीमहाराजांना प्रेरणास्थान मानले होते. १९२८ च्या मुंबईतील भाषणात सांगितलं होतं की, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर छत्रपतींच्या मार्गाने जायला हवे. ज्या साधनानिशी आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पुढचा टप्पा गाठता येईल, ते आपल्या कामासाठी आपण वापरले पाहिजे हे महाराजांचे तंत्र सुभाषबाबूनी आत्मसात केले होते. गांधीजीच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगामध्ये सहभागी झाले,मेयर झाले, लष्करी गणवेशातील कॉंग्रेसचे सेवादल उभारलं.ते कॉंग्रेसचे नियुक्त अध्यक्ष झाले, गांधीजींना विरोध करून कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 

      १९४० साली त्यांनी गांधीजीच्या पुढे "संपूर्ण असहकार" ची कल्पना मांडली तिला गांधींनी अनैतिक, संधीसाधू म्हटले. गांधींच्या नेतृत्वाखाली काम करणे अवघड झाल्यामुळे  ते देशातून निसटून आधी जर्मनी नंतर जपानला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.   

नेताजी कुठे आहेत असा प्रश्न आपल्या मनात आहे. सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ ला झालेल्या विमान अपघातात गेले नाहीत तर १६ सप्टेंबर १९८५ रोजी अयोध्या फैजाबाद या जोडनगरीतील रामभवन नावाच्या एका हवेली मध्ये गेले. तिथली कागदपत्रे हेच सांगतात. आजूबाजूला वावरणारे स्वाभिमान विसरलेले भारतीय, आपल्याच दूतांना पकडून देणारे भारतीय यामुळे ते प्रकट झाले नसतील.  

 नेताजी तुम्ही कोठे आहेत असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल तेव्हा स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वेळेला जे जे करणे आवश्यक आहे ते ते करायला आपला संपूर्ण समाज तयार होईल तेव्हा नेताजी आपल्यातच प्रकट झाले आहेत असे वाटेल.

          संजीवनीच्या नरेश जोशी यांनी पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी संजीवनी स्टडी सेंटर ची माहिती देऊन या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले त्याच बरोबर संजीवनी परिवार देत असलेल्या कृतज्ञता निधीची माहिती दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सायली नाईक हिने उत्तमरित्या केले.

संजीवनी परिवार व्याख्यानमाला २०२६ पुष्प १ले.

 “असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे ”   प्रा. डॉ.  मृदुला दाढे. 




“असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे, फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत” ह्या कवयित्री शांता शेळकेंच्या कवितेवरुन आजच्या कार्यक्रमाचे शीर्षक दिलं आहे.  प्रा. मृदूलाताई  संजीवनी परिवार आयोजित संजीवनी व्याख्यानमाला २०२६ च्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलत होत्या.  पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक सौ. रीमा नाईक यांनी केले. आजचे व्याख्यान महान गायिका स्व. आशाताईंना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी  संगीत शिक्षिका सौ. मनीषा आपटे मॅडम होत्या. ईशस्तवन श्री. अरविंद पाटील, कौस्तुभ पाटील, सौ. सुविधा नाईक व सौ. मंगला नाईक यांनी सादर केले.




 डॉ . मृदूलाताईंनी प्रतिभावंत गीतकार, संगीतकार, गायक आणि वादक यांनी अनेक गीते अजरामर केल्याचं त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरण करुन सोदाहरण समजावून सांगितलं. आशताईंच्या "ही वाट दूर जाते"  ने  सुरवात करुन या गाण्यातील सौदर्यस्थळे उलगडून दाखवताना, तुमचं गाव ही गोवा, कोकणाची आठवण करुन देत असल्याचं म्हणाल्या. शब्द आणि भावना अर्थवाही करत पं. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिल्या. संगीतकारांची प्रतिभा, वैशिष्ट्ये दाखवताना बाबूजींचे  "का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला"  "जीवलगा कधी रे येशील तू"  या गाण्यातील शब्दाचे वजन, उकारातील मुलायमपणा  अर्थाप्रमाणे येणारे आरोह अवरोह गाऊन दाखवले. गाण्याचा ताल कसा जपला जातो हे त्यांनी "ज्योतीकलश छलके"   या बाबूजींच्या अजरामर गीतामधून दाखवून दिले. या गाण्याची संगीतकार अनिल विश्वास केलेल्या  थोरवीची कथा सांगितली. श्रीनिवास खळे यांचे वैशिष्ट्य नोंदवताना  "सुंदर ते ध्यान"  या अभंगाचा उल्लेख करून ‘ध्यान’ हा शब्द कसा उच्चारला आहे हे बघण्याचे आवाहन केले. इतक्या कमी वेळेत यासर्व मंडळीच्या कामाला न्याय देणे कठीण आहे. त्याच्या प्रतिभेला नमन असे म्हणत त्यांनी हिंदीमधील मदनमोहन यांच्या “ लग जा गले कि फिर ये हसीन रात हो ना हो”  या गीताचे सादरीकरण सर्वांची मने जिंकून गेले.  मदनमोहन शिवाय हिंदी सिनेमा संगीताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी हिंदीतील सलिल दाच्या न जाने क्यु , यस दी बर्मन यांच्या सोच के ये गगन झूमे अभी चाँद निकल आयेगा या गीताचा, आर डी बर्मन यांच्या मेरा कुछ समान आणि शेवट त्यांनी "नैना लागे रे, नैना लागे रे"  या गीतानी करून अधिक लक्ष देऊन या गीतांचा, संगीताचा आस्वाद घ्या असे आवाहन केले. कार्यक्रम संपूच नये असंच वाटत होतं श्रोते मंत्रमुग्ध, तल्लीन झाले होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ईशिका पाटील हिने सुरेखरित्या  केलं.

 

Thursday, 7 May 2026

सरस्वती स्तोत्रं

व्याख्यानमाला २०२६ चे दुसरे पुष्प गुंफताना श्री आनंद  हर्डीकर. यांनी सुरवात  स्वरस्वती स्तोत्र म्हणून केली उत्सुकता चाळवली गुगल गुरु वर शोधलं.  



 

नमस्ते शारदे देवि काश्मीर-पुर-वासिनी ।
त्वामहं प्रार्थये नित्यं विद्या-दानं च देहि मे ॥१॥

हे शारदा देवी (सरस्वती माता), काश्मीरमध्ये वास करणाऱ्या देवी, तुम्हाला माझा नमस्कार आहे. मी दररोज तुमची प्रार्थना करतो—कृपया मला ज्ञान (विद्या) द्या.

Obeisance to Thee, O effulgent Sarada, worshipped in the City of Kashmir, I always beseech Thee to vouchsafe to me Pure Knowledge.

 

या श्रद्धा धारणा मेधा वाग्-देवी विधि-वल्लाभा ।
भक्त-जिह्वाग्र-सदना शमादि-गुण-दायिनी ॥२ ॥

जी देवी श्रद्धा, एकाग्रता आणि बुद्धिमत्ता यांचे स्वरूप आहे, जी वाणीची देवी असून ब्रह्मदेवाची प्रिय आहे, जी आपल्या भक्तांच्या जिभेच्या टोकावर वास करते (म्हणजेच त्यांच्या वाणीमध्ये प्रकट होते), आणि जी मनःशांतीसह अनेक सद्गुण प्रदान करते—त्या देवीची मी स्तुती करतो.

You are faith, memory, intelligence, the divinity of speech, the Spouse of Creator, Brahma. You grace the devotees’ speech, You are the bestower of inner peace, and all other excellences.

 

नमामि यामिनीं नाथ-लेखालन्कृत-कुन्तलां ।
भवानीं भव-सन्ताप निर्वापण सुधा-नदीम् ॥३ ॥

मी त्या भवानी देवीला नमस्कार करतो, जिचे रूप रात्रीसारखे शांत व गूढ आहे, जिचे केश भगवान शंकराच्या चंद्रकोरेने अलंकृत आहेत, आणि जी संसारातील दुःख व क्लेश शमवणारी अमृतासारखी नदी आहे.

I bow down to Bhavani who is decorated with ear ornament studded with the flash of lightning, who is a river of nectar that cures the torments of worldly life.

 

भद्रकाल्यै नमो नित्यं सरस्वत्यै नमो नमः ।
वेद-वेदाङ्ग-वेदान्त-विद्या-स्थानेभ्य एव च ॥४ ॥

मी नेहमी भद्रकाली देवीला नमस्कार करतो आणि सरस्वती देवीला वारंवार नमस्कार करतो. तसेच वेद, वेदांची अंगे, वेदांत आणि ज्ञानाच्या सर्व स्रोतांना (स्थाने/केंद्रांना)ही नमस्कार करतो.

 

Constant Salutations to Thee, O Mother Beneficent! You are the home of the Vedas and the auxiliary branches of the Veda, of the Vedanta and all other forms of learning. Salutations to You, O Goddess of Learning.

 

ब्रह्म-स्वरूपा परमा ज्योति-रूपा सनातनी ।
सर्व-विद्यादि-देवी या तस्यै वाण्यै नमो नमः ॥५ ॥

जी देवी ब्रह्मस्वरूप, सर्वोच्च, प्रकाशरूप आणि शाश्वत आहे, जी सर्व प्रकारच्या विद्या निर्माण करणारी आहे—त्या वाणीस्वरूप देवीला मी वारंवार नमस्कार करतो.

O Mother, You are the personification of Brahman. You are the Supreme Spirit, the light Divine, the Eternal Being. You are the Presiding Deity in all branches of learning. Salutations to You, O Goddess of Learning.

 

यया विना जगत्-सर्वं शश्वज्जीवन्-मृतं भवेत् ।
ज्ञानाधि-देवी या तस्यै सरस्वत्यै नमो नमः ॥६ ॥

जिच्याशिवाय हे संपूर्ण जग जिवंत असूनही मृतासारखे होते, अशा ज्ञानाची अधिष्ठात्री सरस्वती देवीला मी वारंवार नमस्कार करतो.

Without You the whole world would appear lifeless. You are the Presiding Deity of Knowledge. Salutations to You, O Goddess of Learning.

 

या विना जगत्-सर्वं मूकमुन्मत्तवत् सदा ।
या देवी वागधिष्ठात्री तस्यै वाण्यै नमो नमः ॥ ७॥

जिच्याशिवाय हे संपूर्ण जग नेहमी मुके आणि वेड्यासारखे (अव्यवस्थित, असंबद्ध) होते, अशा वाणीची अधिष्ठात्री देवीला मी वारंवार नमस्कार करतो.

Without You the whole world would be mute (unable to speak) and demented. You are the Presiding Deity of Speech. Salutations to You, O Goddess of Speech.