Wednesday, 30 July 2014

केळीची बाग


बसराई (नवीन रोपं )  केळी लागवड
केळीच्या बागा हे एकेकाळी वसईचं वैभव होते. वसईची सुकेळी,केळी प्रसिध्द होती. हळू हळू केळीची लागवड कमी होत गेली, त्याला अनेक कारणं , जमीन आक्रसत गेली, घरं ,इमारती उभ्या राहू लागल्या, लागवडीचं  क्षेत्र  कमी झाले. केळीचं पिक हे  नगदी पिक  राहिलं नाही,पावसाळ्याच्या  सुरवातील होणारी वारमोड ( वादळी वा-या मुळे  मोडणा-या केळी ) केतकी(र्णगुच्छ)  रोगाची लागण,  पुढच्या  पिढीनी  पत्करलेला    वेगळ्या व्यवसायाचा/ नोकरीचा  मार्ग.  

दोन रोपां मधील अंतर तीन ते चार फुट

  


वेगवेगळ्या जातीची  (वाण )  केळी वसईत  होतात  , राजेळी , वेलची , आंबट वेलची, सफेत वेलची , भूरकेळ , हिरव्यासालीची (बसराई/बसरी) केळी, बनकेळ, मुठेळी ,तांबडी (तांबड्या सालीची) सध्या प्रचलित असलेली हजारीकेळी. यातील मुठेळी हि   जाती नामशेष झाली आहे तर बनकेळ त्याच मार्गावर आहे. बनकेळ ह्या जातीच रोप लावलं जायचं व त्याचे बन राखले जायचे म्हणजेच मूळ रोपाच्या बुडावर पिल्ल उगवत मोठी   होत  त्यातूनच बनते  केळीचे बन.
केळीची लागवड दोन हंगामात केली जाते. एक भादवडी व दुसरी कार्तिकी लागवड. भादवडी पिकाला चांगला बाजारभाव मिळतो परंतु या पिकाला वारमोडीचा धोका असतो. रोपं लागवडीची पद्धत पाळली जाते  राजेळी किवा बसराई जातीची लागवड करताना रोपां मध्ये सहा  ते सात  फुटाचे  अतंर  ठेवण्यात येत. भाग  जमीन नांगरून घेतली जाते.  सगळी रोपं एका  रांगेत  लावली जावी म्हणून सुत मारले जाते.  दोन रोपा मधील अंतर समान राहावे म्हणून एक मापाची काठी  तयार करण्यात येते तिला कांडा  असे  म्हणतात.   साधारणता केळीच्या पिकला तीन वेळा खताची मात्रा व बुड बांधणी केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी दिले जाते

पूर्ण वाढलेल्या केळीची बाग


निसवल्यावर केळफुल





केळीच्या विविध उपयोगा मुळे केळीला  'कल्पतरू' म्हटले जाते.केळीची पाने पंगत / जेवणावळी  साठी वापरतात, देवाच्या नैवेद्या साठी केळीच्या पानाला (बोथी चा खोला)  प्राधान्य  दिले  जाते.  धार्मिक कार्यक्रमात केळीचे खांब (खुंट) प्रवेशदारी बांधण्याची प्रथा आहे. पूजेच्या चौरंगाला केळीच्या  शिंगा बांधतात. खोडाची सोपट(खोबाटे) सजावटी साठी तसेच त्याचा धागा(वाक)  बांधण्यासाठी  वापरतात. कांद्याची माळ(कांद्याचा जोडा) वाकानी  बनवतात.  सुकलेलं केळीची पाने (वावळी) वेष्टना साठी,  खास  करून दुधाच्या पैकिंग साठी उपयोगी आणत.रहाट-गाडगे  चे वेळी केळीच्या पानाच्या देठाचा दोरखंड (राटा ची माळ )  बनवण्यासाठी  उपयोग  होत  असे.घड  काढल्यानंतर केळीचे खोड,कंद  जनावराना खाद्य म्हणून उपयोगी पडते. केळीचे फुल, कच्ची केळी याच्या  भाज्या केल्या जातात. यामध्ये लोह, पालाश, विटामिन 'ए' हे अन्नघटक असतात. उपवासामध्ये चालणारे व सर्वत्र उपलब्ध असणारे फळ म्हणजे केळी.

 




बसराई ला लगडलेला घड (लोंगर) केळफुलासह
 


केळफुल - फुलफण्यासह

1 comment:

  1. पुढील पिढी साठी खूप माहितीपूर्ण. धन्यवाद.

    ReplyDelete