“देशाचे स्वातंत्र्य” हे सर्वाधिक मूल्य मानणारे सुभाष एकमेव स्वातंत्र्य सेनानी - संपादक आनंद हर्डीकर.
देशाचे स्वातंत्र्य हे सर्वाधिक मूल्य मानणारा, त्यासाठी तन मन धन अर्पण करून झटणारा, छत्रपती शिवाजी महाराजवादी सुभाषबाबू हे एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आनंद हर्डीकर यांनी संजीवनी परिवार आयोजित व्याख्यानमालेत सामवेद भवन उमराळे येथे ‘नेताजी, तुमि कोथाय?` या विषयावर बोलताना केले. अध्यक्षस्थानी RCF चे निवृत जनसंपर्क अधिकारी श्री संतोष वझे होते. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन आणि कदम कदम बढाए जा हे समरगीत सौ. रीमा नाईक, सौ. सुविधा नाईक, कौस्तुभ पाटील, अनंत नाईक यांनी सादर करून वातावरण निर्मिती केली.
ज्येष्ठ लेखक, संशोधक आनंद हर्डीकर पुढे म्हणाले की सुभाषबाबूनी छत्रपती शिवाजीमहाराजांना प्रेरणास्थान मानले होते. १९२८ च्या मुंबईतील भाषणात सांगितलं होतं की, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर छत्रपतींच्या मार्गाने जायला हवे. ज्या साधनानिशी आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पुढचा टप्पा गाठता येईल, ते आपल्या कामासाठी आपण वापरले पाहिजे हे महाराजांचे तंत्र सुभाषबाबूनी आत्मसात केले होते. गांधीजीच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगामध्ये सहभागी झाले,मेयर झाले, लष्करी गणवेशातील कॉंग्रेसचे सेवादल उभारलं.ते कॉंग्रेसचे नियुक्त अध्यक्ष झाले, गांधीजींना विरोध करून कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
१९४० साली त्यांनी गांधीजीच्या पुढे "संपूर्ण असहकार" ची कल्पना मांडली तिला गांधींनी अनैतिक, संधीसाधू म्हटले. गांधींच्या नेतृत्वाखाली काम करणे अवघड झाल्यामुळे ते देशातून निसटून आधी जर्मनी नंतर जपानला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
नेताजी कुठे आहेत असा प्रश्न आपल्या मनात आहे. सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ ला झालेल्या विमान अपघातात गेले नाहीत तर १६ सप्टेंबर १९८५ रोजी अयोध्या फैजाबाद या जोडनगरीतील रामभवन नावाच्या एका हवेली मध्ये गेले. तिथली कागदपत्रे हेच सांगतात. आजूबाजूला वावरणारे स्वाभिमान विसरलेले भारतीय, आपल्याच दूतांना पकडून देणारे भारतीय यामुळे ते प्रकट झाले नसतील.
नेताजी तुम्ही कोठे आहेत असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल तेव्हा स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वेळेला जे जे करणे आवश्यक आहे ते ते करायला आपला संपूर्ण समाज तयार होईल तेव्हा नेताजी आपल्यातच प्रकट झाले आहेत असे वाटेल.
संजीवनीच्या नरेश जोशी यांनी पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी संजीवनी स्टडी सेंटर ची माहिती देऊन या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले त्याच बरोबर संजीवनी परिवार देत असलेल्या कृतज्ञता निधीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सायली नाईक हिने उत्तमरित्या केले.
No comments:
Post a Comment