चांगुलपणा म्हणजेच देवपण.
श्री.यजुर्वेंद्र महाजन . (संस्थापक दीपस्तंभ फाऊंडेशन.)चांगुलपणा म्हणजेच देवपण, आणि चांगुलपणा आपल्या सर्वात असतो. असे प्रतिपादन दीपस्तंभ फाऊंडेशन, मनोबल प्रकल्पाचे संस्थापक श्री यजुर्वेंद्र महाजन यांनी संजीवनी व्याख्यानमाला २०२६ मध्ये " चांगला माणूस घडताना” या विषयावर बोलताना केले. अध्यक्षस्थानी टीआयएफआर मधून निवृत्त झालेले वरिष्ठ विज्ञान अधिकारी श्री. मनोज नाईक होते.
यजुर्वेंद्र मास्तरांनी चांगला माणूस म्हणजे काय यावर संवाद साधला. या संवादातून एक एक मूल्य, गुण उलगडून सांगितला. मानवी जीवन आपल्याला लाभलं आहे हे सर्वांत महत्त्वाचे. नातेसंबंध विषयी बोलताना म्हणाले आजकाल आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसाचा वापर करतो. खरंतर माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि वस्तूचा वापर. चांगला माणूस होण्यासाठी आदरभाव, नम्र, प्रेमळ, संवेदनशील, सेवाभावी आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे. चांगला माणूस घडण्यासाठी आपण कुटुंब, समाज म्हणून काही योजना, नियोजन करतो का? चांगल्या माणसाला महत्व द्यायला सुरवात करा, त्यांचा आदर करा, वाईटाला वाईट जर म्हटलं नाही आणि समाजाने चांगल्या माणसाला उत्तम वागणूक दिली नाही तर तुम्ही भविष्यासाठी वाईट समाज निर्माण करत आहात. जीवन मूल्यांची अशी विशेषता आहे की, ती दिली की वाढतात, प्रेम दिलं की प्रेम मिळतं, आदर दिला तर आदर मिळतो, मदत केली तर मदत मिळते.
दीपस्तंभ फाउंडेशनच्या कार्याला सुरवात कशी झाली हे सांगताना जीवनात चांगले मित्र असणे महत्त्वाचे आहे. माझा मित्र मला स्वामी विवेकानंदांवरील व्याख्यानाला घेऊन गेला. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकाल. जो विचार सातत्याने कराल ज्याच्यावर विश्वास ठेवाल, संपूर्ण झोकून द्याल (समर्पण) तेच तुमच्या जीवनात घडते. तिथून माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. २५ व्या वर्षीच अत्यंत गरजू आणि गरीब लोकांना उत्तम,दर्जेदार (Quality Education ) शिक्षण देण्याचा संकल्प केला आणि संस्था स्थापन केली जी आता सर्वसमावेशक, सर्वांना खुली आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते. संस्था १४ प्रकारचे अपंगत्व तीन प्रकारचे अनाथ, दोन ट्रान्सजेंडर, आदिवासी, आर्थिकदुर्बल घटकांसाठी खुली आहे. आज या संस्थेतून महाजन मास्तरांची मुलं क्लासवन, ऑफिसर, बँक ऑफिसर, आयपीएस होत आहेत म्हणजेच संपूर्ण अंत्योदय होत आहे.
सुरवातीला आनंद पाटील यांनी संजीवनीची पूर्वपीठिका व विविध उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरण उपक्रमात सर्वांना सहभागी होण्याचे, तसेच विद्यार्थ्यांनी संजीवनी स्टडी सेंटर सुविधाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संजीवनी कृतज्ञता निधी मागची भूमिका मांडताना सांगितले की, समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणा-या संस्थेला काही मदत करते. या पूर्वी आदरणीय भारती ठाकूर यांच्या नर्मदालय संस्थेला, श्री. सागर रेड्डी यांच्या अनाथांचा नाथ या संस्थेला, गेल्यावर्षी सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणा-या सुमेधा ताई यांचा संस्थेला मदत केल्याची माहिती दिली.
यावर्षी दीपस्तंभ फाऊंडेशनला आमदार श्री राजन नाईक, उपमहापौर श्री मार्शल लोपिस, श्री मनोज पाटील यांच्या हस्ते एक लाख दहाहजारा हून अधिक कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार राजन नाईक यांनी रु ५०००० देणगी दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मंगेश नाईक, कौस्तुभ पाटील, सौ. रीमा नाईक यांनी माणसानी माणसाशी माणसा सम वागावे हे विषयाला समर्पक गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राप्ती पाटील आणि अश्विनी पाटील यांनी सुरेखरित्या केले.
No comments:
Post a Comment