Monday, 15 September 2025

सुंदर, देखणे असे!

 व्याख्यात्या आदरणीय धनश्री लेले यांनी एका व्याख्यानाचा शेवट करताना कवी भा.ब. बोरकरांच्या एका कवितेच्या ओळी म्हणून दाखवल्या.

 व्याख्यानाच्या विषयाला पूरक कविता. विषय होता “ विवेकें विचारें अंतर श्रुंगारीजे”.

कविता किती अर्थवाही आहे हे अनुभवा. खरे देखणेपण कश्यात आहे हे ही जाणा.

 

लावण्य रेखा

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे

गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा

वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

 

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे

आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

 

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती

वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया

लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

 

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

 

प्रांजळ चेहरा असणे हे खरं देखणेपण गोरा आहे की सावळा याला मोल नाही.

सुंदर डोळे जे जगाचं दु:ख पाहून कारुण्याने दाटून येतात,. जशी आकाशात चंद्रप्रभा पसरते.

सुंदर ओठ तेच जे गोड मधुर बोलतात, त्याच्या मृदू भाषेमुळे सत्य कटू वाटेनाशी होते.

देखणे हात जे नवं मंगल घडवतात.

देखणी पाऊले जी ध्येय पथावर चालतात, जीवन पथावर आपला ठसा ठसा उमटवतात.

देखणे खांद्ये जे प्राणीमात्राच्या हितासाठी स्वेच्छेने सूळ वाहून नेतात.  

सुंदर जीवन तेच ज्यात सुख, समाधान, पावित्र्य फाकते, जसा चांदण्यातून शुभ्र प्रकाश पसरतो.

सुंदर मृत्यू तोच आहे, जो सूर्यास्तासारखा तेजस्वी असतो , अंधारात तेजस्वी वारसा सोडून जातो.  

Friday, 12 September 2025

संशय का मनी आला?

 

 

एका बाजूला क्षत्रियधर्म दुस-या बाजूला आप्तस्वकीय यामुळे   अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झाला आहे. संशय का निर्माण होतो?  कसा मनाला घेरतो याचं वर्णन माउलीने खालील ओव्यात केलं आहे आणि उपाय सांगितला आहे. फक्त ज्ञानाने संशयावर विजय मिळविता येतो. आजच्या भाषेत अभ्यासाने डाउट दूर करता येतो.

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरीं मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥१९६॥
एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला ? पण जो त्याच्या बद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. ॥१९६॥

जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचीं आरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असें फुडें । जाणों येकीं ॥१९७॥
अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्यावेळेला स्वभावत:च येते, त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे. ॥१९७॥

तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेसींचि माजे । तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥१९८॥
त्याप्रमाणे जो विषयसुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जातो, यात संशय नाही. ॥१९८॥

मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥१९९॥
जो संशयात पडला त्याचा नि:संशय घात झाला असे समज. तो इहपरलोकातील सुखाला मुकला. ॥१९९॥

जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानीं ॥२००॥
ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो ॥२००॥

तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । सशयीं तो नोळखे । हिताहित ॥२०१॥
त्याप्रमाणे खरे व खोटे, प्रतिकूल व अनुकूल, हित व अहित, ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. ॥२०१॥

हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥२०२॥
जन्मांध माणसाला  रात्र-दिवस ज्याप्रमाणे ठाऊक नसते त्याप्रमाणे मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. ॥२०२॥

म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसि ॥२०३॥
म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. ॥२०३॥

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥२०४॥
एवढ्याकरता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. ॥२०४॥

जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥२०५॥
जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा संशय मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. ॥२०५॥

हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥२०६॥
हा फक्त हृदयालाच व्यापून रहातो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ॥२०६॥

ऐसा जरी थोरावें । तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ॥२०७॥
एवढ जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल ॥२०७॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥२०८॥
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ नि:शेष नाहीसा होतो. ॥२०८॥

याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥२०९॥
एवढ्याकरता अर्जुना, अंत:करणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू, ॥२०९॥

  

Tuesday, 9 September 2025

सुख-दु:ख कशी निर्माण होतात?

आपलं सुख म्हणजे इंद्रियाचे सुख. इंद्रियांच्या मागणीला शेवट नसतो. मना सारखे घडले कि सुख नाही तर दु:ख.

ज्ञानेश्वर माऊली  ज्ञानेश्वरीच्या दुस-या अध्यायात सांगतात.

इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।ते अंतर आप्‍लविती । संगें येणें ॥ ११२ ॥

इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदु:खे उत्पन्न होतात. ते मग आपल्या संसर्गाने अंत:करण ग्रासून टाकतात.

जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥

ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांच्या ठिकाणी काही दु:ख व थोडे सुखही दिसते. (त्या विषयांपासून कधी दु:ख तर कधी सुख प्राप्त होते).

देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥

निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंत:करणात उत्पन्न होतात.  

मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥

मृदु व कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दु:खाला कारण होतात.  

भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख ।जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥

भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात.  

सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥

सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख उत्पन्न करतात.  

तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु ।म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥

त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे.  

देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥

जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो.

या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥

इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही.

हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्‍नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥

हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो.

देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥

तसे हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा. याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस.

इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥

इंद्रिये जे म्हणतील, ते तेच जे पुरुष करतात, इंद्रियांच्या नादाने जे वागतात, ते विषयसागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. 

तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥

त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धि स्थिर झाली आहे असे समज.

  

Wednesday, 3 September 2025

कण-क्षण

 

आचार्य अत्रेंचं एक खूप प्रसिध्द  नाटक आहे. “ब्रह्मचारी”.  नवीन संचात ही हे नाटक आलं होतं आजचा आघाडीचा कलाकार श्री प्रशांत दामले यांनी काम केल्याचं आठवत त्यात मूळ समर्थ रामदासांच्या रचनेवर आधारित एक गीत होते. शब्द होते.

घटिका गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा;
आयुष्याचा नाश होतो, राम का रे म्हणाना ॥

एक प्रहर दोन प्रहर, तीन प्रहर गेले;
चौथा प्रहर संसारात, चावटीने नेले ॥

रात्र काही झोप काही, स्त्रीसंगे गेली;
ऐशी आठ प्रहरांची, वासलात झाली ॥

दास म्हणे तास वाजे, सकळां स्मरण देतो;
वेळोवेळी राम म्हणा, म्हणोनी झणकारितो ॥

 

यात म्हटलंय , वेळ, काळ झटपट निघून चालला आहे. आयुष्य हातातून निसटून चाललाय. या काळाचा उपयोग करून जीवनात चांगलं काही मिळावा. समर्थाच्या वेळी जीवनात राम असणे ही सर्वोच्च  प्राप्ती होती. राम मिळवा त्याच्या सद्गुणाचा आठव करून आपल्या जीवनात ते गुण उतरवा. गुण कालातीत आहेत. घड्याळाची टिकटिक दर्शविते कि आयुष्यातील एक एक क्षण कमी होतो आहे. वेळेचा सदुपयोग करा.

भारतीय संस्कृतीत कण आणि क्षण ही मोजमापाची एकक आहेत. कण म्हणजे वस्तूचा सूक्ष्म भाग. क्षण म्हणचे काळाचा अल्प भाग. अंदाजे ४-६ सेकंद. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे.

क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् । क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥

विद्या आणि धन मिळवण्यासाठी प्रत्येक क्षण आणि प्रत्येक छोट्या संधीचा उपयोग करावा. जर एक क्षण वाया गेला तर विद्या  मिळणार नाही आणि कण वाया गेला तर धन. आपल्यात एक म्हण आहे, एक गेली वेळा वरचे गेले सोळा.

काळाचा महिमा अपरंपार आहे. TIME IS MONEY असं म्हटलं जाते. याचा अर्थ जीवनात वेळेचे नियोजन योग्य प्रमाणे करा. वेळ मौल्यवान आहे.

क्षणाचा उपयोग करून विद्या मिळावा व कणा कणाने धन धान्य कमवा .

 

 

Tuesday, 26 August 2025

सुखाचा शोध

 

 

 ज्ञानपीठ विजेते, ययाती कार  वि. स. खांडेकरांचा पाठ्य पुस्तकात एक धडा होता.  “सुखाचा शोध.”  आठवतो !  पूर्ण धडा आठवत नाही , माणूस सतत सुखासाठी धडपडतो. सुखाचा शोध बाहेर न करता मनामध्ये घ्यावा. . खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नसून शांत, समाधानी आणि निर्मळ मनात आहे. लोभ, मत्सर, स्वार्थ यामुळे सुख नष्ट होते; तर संयम, साधेपणा, प्रेम व नीतिमूल्यांशी जगण्यात खरा आनंद आहे. असे विचार या धड्यात  दिले आहेत.

धडा आठवण्याचं कारण भगवद गीता , ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात सुखाचे तीन प्रकार सांगण्यात आले आहेत. सात्त्विक, राजस, आणि तामस सुख.  आणि त्याची व्याख्या, लक्षणं  दिली आहेत.

 १) सात्त्विक सुख:  
"
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ १८.३७ ॥ "

जे सुख आरंभी कठीण किंवा त्रासदायक वाटते (विषासारखे), पण शेवटी अमृतासारखे गोड होते आणि आत्मबुद्धी प्रसन्न करते, ते सात्त्विक सुख आहे.

संत ज्ञानेश्वर सांगतात—हे सुख सुरुवातीला कठीण वाटते, परंतु अंत:करण शुद्ध करून शेवटी खरेच आनंददायी ठरते. अनेक उदाहरण देऊन स्पष्ट करतात. बालपण  चांगले परंतु ते लाभण्यासाठी  जीवाला अनेक कष्ट सोसावे लागतात. दुसरं उदाहरण समुद्र मंथनाचे देतात, सांगतात अमृत प्राप्त होते, त्यासाठी  विष पचवावे लागते.

२) राजस सुख:

"विषयेन्द्रियसंयोगात् यत्तदग्रेऽमृतोपमम् । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥१८.३८ ॥ "

जे सुख सुरुवातीला गोड व आनंददायी वाटते (अमृतासारखे), पण शेवटी विषासारखा दुःखद अनुभव देते, ते राजस सुख आहे.
ज्ञानेश्वर सांगतात—इंद्रियांच्या विषयभोगांमुळे जे सुख भासतं, ते नंतर त्रास आणि हानी निर्माण करतं. उदाहरणार्थ रोग्याला साखर, केळं गोड लागते त्याने कुपथ्य होते. ऋण काढून लग्नाचा थाट करणे.  

३) तामस सुख:
"यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहन्मात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥१८.३९ ॥ "

 जे सुख अज्ञान निर्माण करते, जडत्व वाढवते आणि निद्रा, आळस व प्रमाद यांतून उत्पन्न होते, ते तामस सुख आहे.

 संत ज्ञानेश्वर सांगतात—हे सुख मुळातच मोह, आलस्य व अज्ञान वाढवते, जे आत्म्याला अधोगतीकडे नेते. उदाहरण देतात, अपेयपान करणे, अभक्ष्यभक्षण करणे. ज्याच्या आरंभी आणि शेवटी स्वत: ची विस्मृती होते.

आपण जे कर्म करतो त्याचे फलरूप सुख मिळते. ते  तीन प्रकारात मोडते. त्याचं वेगळेपणा  दर्शवण्यासाठी ज्ञानेश्वर माउलींनी खूप दाखले दिले आहेत. जिज्ञासूनी ह्या ओव्या मुळापासून वाचाव्या. सुखाची धडपड थांबवावी, यातील श्रेयस्कर सुख कोणते हे जाणून घ्यावे आणि प्राप्त करावे.

 

 

Friday, 22 August 2025

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः

 


संजय कुरुक्षेत्रावरील वृतांत धृतराष्ट्र महाराजाला कथन करीत असतात. पुत्रप्रेमानी आंधळ्या झालेल्या धृतराष्ट्राला  भगवद गीता, विश्वरूप दर्शन यात  रस नसून युद्धात जय कोणाचा होईल ही चिंता आहे.  ह्याची कल्पना संजयला आहे. गीतेच्या शेवटच्या श्लोकात संजय म्हणतात. 

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ १८-७८॥  

जेथे योगेश्वर कृष्ण, जेथे धनुर्धर पार्थ, तेथे श्री जय वैभव, नित्य नीती माझे मत

वरील श्लोकाचं निरुपण करताना ज्ञानेश्वर महाराजाच्या कवित्वाला कसा बहर येतो बघा,अनुभवा.

कृष्ण, अर्जुन एकत्र असणे म्हणजे धर्म,यश, श्री, वैभव  ह्या चार गोष्टी सहज साध्य आहेत. कसं आणि किती सहज आहे.

चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका । संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥ १६३३ ॥
रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक । वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं ॥ १६३४ ॥
दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु । सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा ॥ १६३५ ॥
वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें । सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं ॥ १६३६ ॥
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन । दर्शनीं समाधान । आथी जैसें ॥ १६३७ ॥
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु । हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें ॥ १६३८ ॥
तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥ १६३९ ॥
आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं । अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें ? ॥ १६४० ॥
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें । तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥ १६४१ ॥
जयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु । श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥ १६४२ ॥

 

जसा चंद्र तेथे चांदणे, शंभु तेथे पार्वती, संत तेथे विवेक ,राजा तेथे कटक (सैन्य), सौजन्य तेथे सोयरीक, अग्नी तेथे उष्णता, दयेने धर्मज्या ठिकाणी कारण असते तेथे परिणाम आपोआप असतो.धर्म तेथे सुख, आणि सुखी पुरुषोत्तम,  वसंत तेथे फुललेली वनराई, फुलांमध्ये मधुर सुगंध, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानींना आत्मदर्शन, भाग्य तेथे विलास,जसा सूर्य तेथे प्रकाश असतो.

तसेच श्रीकृष्ण जिथे आहेत तिथेच लक्ष्मी, ऐश्वर्य, विजय नक्कीच असतो.  जगदंबा (लक्ष्मी) ही श्रीकृष्णाची पत्नी — तिथे अणिमा, लघिमा इत्यादी सर्व सिद्धी दासीप्रमाणे उपस्थित असतात.  ज्याच्या भाग्यात श्रीकृष्ण असतो त्याच्याकडे आपोआप विजय धावून येतो.

अर्जुन म्हणजे जयो (विजयाचे प्रतीक), आणि श्रीकृष्ण म्हणजे विजयस्वरूप — त्यामुळे लक्ष्मी आणि विजय दोन्ही जिथे आहेत तेथे यश निश्चित आहे.

 

ज्ञानेश्वरीत शेवटी येते ते “पसायदान”. ज्ञानेश्वरीचा मुकुट मणी.

विश्वात्मक मन, विश्वात्मक देव, विश्वात्मक मागणे. 

ज्ञानोबा माऊली !!

 


बरा चांगला उत्तम.

 


ज्ञानोबांनी. ज्ञानेश्वरीत अठराव्या अध्यायात  बरा, चांगला, उत्तम याची चढती भाजणी खालील ओव्यातून दिली आहेत. ओव्या अर्थासह  वाचल्या नंतर नक्कीच अर्थपूर्ण आणि गोड वाटतील.

आणि ऋतू बरवा शारदु| शारदी पुढती चांदू | चंद्री जैसा सबंधु | पूर्णिमेचा ||३४४ ||

का वसंती बरवा आरामू | आरामीही प्रियसंगमू | संगमी आगामू | उपचारांचा ||३४५||

नाना कमळी पांडवा | विकासु जैसा बरवा | विकासाही यावा | परागाचा ||३४६||

वाचे बरवे कवित्व | कवित्वी बरवे रसिकत्व | रसिकत्वी परतत्त्व | स्पर्शू जैसा ||३४७||

 

 

सर्व ऋतुं मध्ये शरद ऋतू चांगला, त्यात शुक्लपक्षातील चंद्र चांगला , पौर्णिमेचा तर फारच उत्तम. (शरदाचे चांदणे , शरद पोर्णिमा )

वसंत ऋतूत बाग चांगली, बागेत आवडते मनुष्य भेटावे हे अधिक चांगले, त्यातही सर्व सुखे मिळावी हे फारच उत्तम.

कमळ चांगले, कमळाचे उमलणे अधिक चांगले व त्यातही सुगंध उत्तम.

वाणीत कवित्व चांगले, काव्यात रसपुर्णता चांगली, व रसपुर्णतेसही  परतत्त्वाचा, आत्मानंदाचा, अनुभूतीचा स्पर्श फारच उत्तम.  

 

ज्ञानोबा माउलीच्या ओव्या आवडल्या तर चांगल्या , गोडी वाटली तर अधिक चंगले. ज्ञानेश्वरी वाचावी असे वाटले तर उत्तमच.

ग्यानबा तुकाराम.

Saturday, 5 April 2025

अध्याय अठरावा मोक्षसंन्यासयोगः निवडक श्लोक

 




अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌ । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌ ॥ १८-१४ ॥

कर्मफळ पाच घटकांवर अवलंबून असते: १.अधिष्ठान, २.कर्ता, ३.कर्त्याला उपलब्ध असणारी साधने, ४.कर्त्याने केलेले प्रयत्न, ५.दैव .

यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्‌ । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्‌ ॥ १८-३७ ॥

 जे आरंभी जरी विषाप्रमाणे वाटले, तरी परिणामी अमृताप्रमाणे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्त्विक म्हटले गेले आहे.

विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्‌ । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्‌ ॥ १८-३८ ॥

जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते. म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे.  

यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १८-३९ ॥

जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप, आळस व प्रमाद यांपासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे.

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्‌ ॥ १८-४२ ॥

अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करणे आणि परमात्मतत्त्वाचा अनुभव घेणे, ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.

बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ १८-५१ ॥

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः । ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ १८-५२ ॥

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्‌ । विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ १८-५३ ॥

विशुद्ध बुद्धीने युक्त; हलके, सात्त्विक आणि नियमीत भोजन घेणारा; शब्दादी विषयांचा त्याग करून, एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा; सात्त्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून, मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा; राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा; अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. 

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ १८-६१ ॥

हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे.

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।  तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्‌ ॥ १८-६२ ॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल.

अध्याय अठरावा : ७८ मोक्षसंन्यासयोग (गीतेचा नित्कर्ष- त्यागाची पूर्णता)

 

 


अर्जुन म्हणाला, मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे.

भौतिक इच्छा, कामना त्यागून केलेल्या कर्माला संन्यास म्हणतात.

सर्व फळ सोडून केलेल्या कर्माला त्याग म्हणतात. 

सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु काही विचारवंत म्हणतात यज्ञ, दान, तप अशा कर्माचा त्याग कधीच करू नये. शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागाचे वर्णन केले आहे. यज्ञ, दान, तप ही कर्मे महात्म्यानाही पवित्र करतात.  आसक्ती आणि फळांच्या अपेक्षेशिवाय कर्म केली पाहिजेत. कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. नियत कर्माचा त्याग कधीच करू नये. प्रभावाखाली येऊन नियत कर्माचा त्याग केला तर त्याला तामसिक त्याग म्हणतात. नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा क्लेश देतील या भीतीने कर्माचा त्याग करतो. त्याने रजोगुणाचा त्याग केला अस म्हटलं जाते, त्याने उन्नती साधत नाही. ज्या वेळी मनुष्य नियत कर्म कर्तव्य म्हणून करतो सर्व फलांची आसक्ती सोडून देतो, त्याला सात्त्विक त्याग म्हणतात. सत्त्वगुणात स्थित असलेला , अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही, शुभ कर्मात आसक्त राहत नाही. देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे शक्य नाही, परतू कर्मफलांचा त्याग शक्य आहे.

वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची पाच कारणे आहेत. अधिष्ठान, कर्ता, साधनं, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा (दैव).  शरीराने, वाणीने, मानाने जी काही कर्म मनुष्य करतो ती या पाच कारणामुळे घडत असतात. या पाच कारणांशिवाय मी काही करू शकतो हे मानतो तो मूर्ख आहे.

ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ही कर्माला प्रेरणा देणारी तीन कारणं आहेत. इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत. प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता याचे तीन प्रकार आहेत. सर्व जीवांमध्ये एकच भाव  म्हणजेच परमात्मा, ब्रह्म पाहतो या ज्ञानाला तू सात्त्विक समज.  विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते राजस ज्ञान जाण. मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, ज्याला सत्याचे ज्ञान राहत नाही, अश्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात.

नेमलेले कर्म, आसक्तीशिवाय , रागद्वेष न ठेवता, फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते ते सात्त्विक कर्म होय. 

फळांची इच्छा धरून मोठ्या प्रयासाने आणि खोट्या अंहकाराने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. 

जे कर्म मोहाने, शास्त्राची अवहेलना करून, हिंसा अथवा इतरांना क्लेश देण्यासाठी केले जाते ते तामसिक कर्म होय.

नि:संग, निरहंकारी, उत्साही, निश्चयी आणि यशापयशाने विचलित न होता आपले कर्म करतो तो सात्त्विक कर्ता.

जो  कर्ता आसक्त, लोभी, इर्षाळू, अपवित्र, सुख दु:खाने  विचलित होणारा असतो तो रजोगुणी कर्ता होय. 

शास्त्राविरुध्द कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, आळशी, सदैव खिन्न आणि कामात चालढकल करणारा असतो तो तमोगुणी कर्ता होय.

ज्या बुद्धीद्वारे  मनुष्य कार्य आणि अकार्य , प्रवृत्ती आणि निवृत्ती, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्त्विक बुद्धी होय.

जी बुद्धी, धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी होय.

भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते, सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती तामसिक बुद्धी होय.

जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे केलेला आहे, जो मन, प्राण आणि इंद्रियांना संयमित करतो तो सात्त्विक निश्चय होय.  ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त तो निश्चय राजसिक होय. स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जी बुद्धी जाऊ शकत नाही ती तामसी धृती होय,

जे आरंभी कडू विख शेवटी अमृततुल्य असते आणि स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्त्विक सुख म्हटले जाते.

इंद्रियांचा विषयाशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख, जे प्रारंभी अमृतासारखे वाटते आणि शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते.

जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही. जे आरंभापासून शेवटापर्यंत मोहमयी असते, जे निद्रा,आळस, प्रमाद या पासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हणतात.

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्गीकरण प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. 

शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.

कृषी, गोरक्षा, आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे.

श्रम आणि इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे.

आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. सर्व जीवांचा उगम आणि सर्वव्यापी असणा-या भगवंताची पूजा करून मनुष्य स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. मनुष्याला त्याच्या स्वभावानुसार सांगण्यात आलेले कर्म कधीच पाप असू शकत नाही. स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. जो आत्मसंयमी, अनासक्त आहे, सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था, ब्रह्मवस्था कश्या पध्दतीने प्राप्त करतो हे जाणून घे.

आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुध्द होऊन, निश्चयाने मनोनिग्रह करून, इंद्रीयतृप्तीच्या विषयांचा त्याग करून, आसक्ती द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांतस्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया, वाचा, मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टीचा स्वीकार इत्यादी गोष्टी पासून मुक्त असतो,

ममत्वरहित आणि शांत असतो तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत  निश्चितच प्रगत होतो. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेला मनुष्य सदैव प्रसन्न असतो, कसलाच शोक करत नाही, कशाचीही आकांक्षा करीत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. त्याला विशुध्द भक्तीची प्राप्ती होते. भक्तीनेच मला तत्वता जाणून, पूर्णता जाणून माझ्याशी एकरूप होता येते.

स्वधर्माने प्राप्त झालेली सर्व कर्मे करीत, मा‍झ्या कृपेने मुक्तीची , मोक्षाची प्राप्ती होते.  चित्त  मझ्यात ठेवून, समत्व ढळू न देता सर्व कर्मे मला समर्पित कर. मग तू सर्व संकटे, भय पार करशील जर अहंभावाने हे तू एकले नाहीस तर विनाशाला प्राप्त होशील.

जर तू युध्द केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावाच युद्धाला प्रवृत्त करेल. परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात आहे, आभासी जगात जीव कर्म करीत आहेत.  त्याला पूर्णपणे शरण जा, त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल.

तुला गूढ ज्ञान सांगितलं, याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर.

तू मला प्रिय आहे म्हणून सांगतो. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, नमस्कार कर म्हणजे मला प्राप्त होशील हे तुला प्रतिज्ञेने सांगतो. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून केवळ मलाच शरण ये. तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, घाबरू नकोस.  जे तप करीत नाहीत, जो भक्त नाही, जो माझा द्वेष करतो यांना हे ज्ञान सांगू नये. भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल. याहून जगात मला कोणीही प्रिय नाही. या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. जो श्रद्धेने व द्वेष न करता श्रावण करतो तो पापांतून मुक्त होतो आणि शुभ लोकांची प्राप्ती होते.  हे धनंजया तू एकाग्र चित्ताने श्रावण केलेस का?  तुझा मोह आणि अज्ञान नष्ट झाले का?  अर्जुन म्हणाला, हे कृष्ण! माझा मोह नष्ट झाला आहे. मी दृढ आणि संशयमुक्त  झालो आहे. तुमच्या आज्ञेनुसार कर्म करण्यास तयार आहे.

संजय म्हणाला या प्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा अद्भुत, रोमांचकारी संवाद ऐकला. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असता साक्षात  त्यांच्याकडून ऐकले.  हा संवादाचे स्मरण होताच मी आनंदी होत आहे. श्रीकृष्ण भगवंताचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिक विस्मयकारी होत आहे.

जेथे योगेश्वर कृष्ण, जेथे महान धनुर्धारी अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे असे माझे मत आहे.

Friday, 4 April 2025

अध्याय सतरावा श्रद्धात्रयविभागयोगः निवडक श्लोक.

 

 


सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत । श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ १७-३ ॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे, तो स्वतःही तोच आहे (अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते).

 आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या

 आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ १७-८ ॥

आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्त्विक पुरुषांना प्रिय असतात.  

 कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः । आहारा राजसस्येष्टा

 दुःखशोकामयप्रदाः ॥ १७-९ ॥

कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात.

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्‌ । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्‌ ॥ १७-१० ॥

जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. 

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्‌ । स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १७-१५ ॥

जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते. ॥ १७-१५ ॥

मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः । भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १७-१६ ॥

मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवच्चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता, हे मनाचे तप म्हटले जाते.