Saturday, 5 April 2025

अध्याय अठरावा मोक्षसंन्यासयोगः निवडक श्लोक

 




अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌ । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌ ॥ १८-१४ ॥

कर्मफळ पाच घटकांवर अवलंबून असते: १.अधिष्ठान, २.कर्ता, ३.कर्त्याला उपलब्ध असणारी साधने, ४.कर्त्याने केलेले प्रयत्न, ५.दैव .

यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्‌ । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्‌ ॥ १८-३७ ॥

 जे आरंभी जरी विषाप्रमाणे वाटले, तरी परिणामी अमृताप्रमाणे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्त्विक म्हटले गेले आहे.

विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्‌ । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्‌ ॥ १८-३८ ॥

जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते. म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे.  

यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १८-३९ ॥

जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप, आळस व प्रमाद यांपासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे.

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्‌ ॥ १८-४२ ॥

अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करणे आणि परमात्मतत्त्वाचा अनुभव घेणे, ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.

बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ १८-५१ ॥

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः । ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ १८-५२ ॥

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्‌ । विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ १८-५३ ॥

विशुद्ध बुद्धीने युक्त; हलके, सात्त्विक आणि नियमीत भोजन घेणारा; शब्दादी विषयांचा त्याग करून, एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा; सात्त्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून, मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा; राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा; अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. 

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ १८-६१ ॥

हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे.

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।  तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्‌ ॥ १८-६२ ॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल.

No comments:

Post a Comment