अर्जुन
म्हणाला, मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे.
भौतिक
इच्छा, कामना त्यागून केलेल्या कर्माला संन्यास म्हणतात.
सर्व
फळ सोडून केलेल्या कर्माला त्याग म्हणतात.
सर्व
प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु काही विचारवंत
म्हणतात यज्ञ, दान, तप अशा कर्माचा
त्याग कधीच करू नये. शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागाचे वर्णन केले आहे. यज्ञ, दान, तप ही कर्मे महात्म्यानाही पवित्र करतात. आसक्ती आणि फळांच्या अपेक्षेशिवाय कर्म केली
पाहिजेत. कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. नियत कर्माचा त्याग कधीच करू नये.
प्रभावाखाली येऊन नियत कर्माचा त्याग केला तर त्याला तामसिक त्याग म्हणतात. नियत
कर्मांना कष्टप्रद समजून किंवा क्लेश देतील या भीतीने कर्माचा त्याग करतो. त्याने
रजोगुणाचा त्याग केला अस म्हटलं जाते, त्याने उन्नती साधत नाही. ज्या वेळी मनुष्य
नियत कर्म कर्तव्य म्हणून करतो सर्व फलांची आसक्ती सोडून देतो, त्याला सात्त्विक
त्याग म्हणतात. सत्त्वगुणात स्थित असलेला , अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही, शुभ कर्मात आसक्त राहत नाही. देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे
शक्य नाही, परतू कर्मफलांचा त्याग शक्य आहे.
वेदांतानुसार
सर्व कर्माच्या सिद्धीची पाच कारणे आहेत. अधिष्ठान, कर्ता, साधनं, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा (दैव). शरीराने, वाणीने, मानाने जी काही कर्म मनुष्य करतो ती या पाच कारणामुळे घडत असतात. या पाच
कारणांशिवाय मी काही करू शकतो हे मानतो तो मूर्ख आहे.
ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ही कर्माला प्रेरणा देणारी तीन कारणं
आहेत. इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत.
प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता याचे
तीन प्रकार आहेत. सर्व जीवांमध्ये एकच भाव
म्हणजेच परमात्मा, ब्रह्म पाहतो या ज्ञानाला तू
सात्त्विक समज. विभिन्न शरीरात भिन्न
भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते राजस ज्ञान जाण. मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला
सर्वस्व समजून आसक्त होतो, ज्याला सत्याचे ज्ञान राहत नाही,
अश्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात.
नेमलेले
कर्म, आसक्तीशिवाय , रागद्वेष न ठेवता,
फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते ते सात्त्विक कर्म होय.
फळांची
इच्छा धरून मोठ्या प्रयासाने आणि खोट्या अंहकाराने केले जाते ते रजोगुणी कर्म
होय.
जे
कर्म मोहाने, शास्त्राची अवहेलना करून, हिंसा अथवा इतरांना क्लेश देण्यासाठी केले
जाते ते तामसिक कर्म होय.
नि:संग, निरहंकारी, उत्साही, निश्चयी आणि यशापयशाने विचलित
न होता आपले कर्म करतो तो सात्त्विक कर्ता.
जो कर्ता आसक्त, लोभी, इर्षाळू, अपवित्र, सुख दु:खाने विचलित होणारा असतो तो रजोगुणी कर्ता होय.
शास्त्राविरुध्द
कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, आळशी, सदैव खिन्न आणि कामात चालढकल करणारा असतो तो
तमोगुणी कर्ता होय.
ज्या
बुद्धीद्वारे मनुष्य कार्य आणि अकार्य ,
प्रवृत्ती आणि निवृत्ती, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष
यांना जाणतो ती सात्त्विक बुद्धी होय.
जी
बुद्धी, धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू
शकत नाही ती राजसिक बुद्धी होय.
भ्रम
आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते, सदैव
विपरीत मार्गाने कार्य करते ती तामसिक बुद्धी होय.
जो
निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे केलेला आहे, जो मन, प्राण आणि इंद्रियांना संयमित करतो तो
सात्त्विक निश्चय होय. ज्या निर्धाराने
मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त तो निश्चय
राजसिक होय. स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जी बुद्धी जाऊ शकत नाही ती तामसी धृती होय,
जे
आरंभी कडू विख शेवटी अमृततुल्य असते आणि स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या
सुखाला सात्त्विक सुख म्हटले जाते.
इंद्रियांचा
विषयाशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख, जे प्रारंभी
अमृतासारखे वाटते आणि शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले
जाते.
जे
सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही. जे आरंभापासून शेवटापर्यंत मोहमयी
असते, जे निद्रा,आळस, प्रमाद या पासून उत्पन्न
होते त्या सुखाला तामसिक सुख म्हणतात.
ब्राह्मण,
क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्गीकरण प्राकृतिक गुणांद्वारे
उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे.
शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा,
ज्ञान, बुद्धिमत्ता, आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार
ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज,
निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.
कृषी, गोरक्षा, आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म
आहे.
श्रम
आणि इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे.
आपापल्या
कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. सर्व
जीवांचा उगम आणि सर्वव्यापी असणा-या भगवंताची पूजा करून मनुष्य स्वकर्माद्वारे
सिद्धी प्राप्त करू शकतो. मनुष्याला त्याच्या स्वभावानुसार सांगण्यात आलेले कर्म
कधीच पाप असू शकत नाही. स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी
त्या कर्माचा त्याग करू नये. जो आत्मसंयमी, अनासक्त आहे, सर्व प्राकृत भोगांना
तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण
अवस्था प्राप्त करतो. या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची
परमसिद्धावस्था, ब्रह्मवस्था कश्या पध्दतीने प्राप्त करतो हे जाणून घे.
आपल्या
बुद्धीद्वारे पूर्णपणे शुध्द होऊन, निश्चयाने मनोनिग्रह करून, इंद्रीयतृप्तीच्या
विषयांचा त्याग करून, आसक्ती द्वेष यातून मुक्त होऊन
जो एकांतस्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया, वाचा, मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि
अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टीचा स्वीकार
इत्यादी गोष्टी पासून मुक्त असतो,
ममत्वरहित
आणि शांत असतो तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो. याप्रमाणे ब्रह्मभूत
अवस्था प्राप्त झालेला मनुष्य सदैव प्रसन्न असतो, कसलाच शोक करत नाही, कशाचीही
आकांक्षा करीत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. त्याला विशुध्द
भक्तीची प्राप्ती होते. भक्तीनेच मला तत्वता जाणून,
पूर्णता जाणून माझ्याशी एकरूप होता येते.
स्वधर्माने
प्राप्त झालेली सर्व कर्मे करीत, माझ्या कृपेने मुक्तीची , मोक्षाची प्राप्ती
होते. चित्त मझ्यात ठेवून, समत्व ढळू न देता सर्व कर्मे मला
समर्पित कर. मग तू सर्व संकटे, भय पार करशील जर अहंभावाने
हे तू एकले नाहीस तर विनाशाला प्राप्त होशील.
जर तू
युध्द केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावाच युद्धाला प्रवृत्त करेल.
परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात आहे, आभासी जगात जीव कर्म करीत आहेत. त्याला पूर्णपणे शरण जा, त्याच्या कृपेने तुला
दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल.
तुला
गूढ ज्ञान सांगितलं, याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर.
तू
मला प्रिय आहे म्हणून सांगतो. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, नमस्कार कर म्हणजे मला प्राप्त होशील
हे तुला प्रतिज्ञेने सांगतो. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून केवळ मलाच शरण
ये. तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, घाबरू नकोस. जे तप करीत नाहीत, जो
भक्त नाही, जो माझा द्वेष करतो यांना हे ज्ञान सांगू नये.
भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल.
याहून जगात मला कोणीही प्रिय नाही. या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या
बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. जो श्रद्धेने व द्वेष न करता श्रावण करतो तो
पापांतून मुक्त होतो आणि शुभ लोकांची प्राप्ती होते. हे धनंजया तू एकाग्र चित्ताने श्रावण केलेस का? तुझा मोह आणि अज्ञान नष्ट झाले
का? अर्जुन म्हणाला,
हे कृष्ण! माझा मोह नष्ट झाला आहे. मी दृढ आणि संशयमुक्त झालो आहे. तुमच्या आज्ञेनुसार कर्म करण्यास
तयार आहे.
संजय
म्हणाला या प्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा अद्भुत, रोमांचकारी संवाद ऐकला.
व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असता साक्षात
त्यांच्याकडून ऐकले. हा संवादाचे
स्मरण होताच मी आनंदी होत आहे. श्रीकृष्ण भगवंताचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी
अधिक विस्मयकारी होत आहे.
जेथे
योगेश्वर कृष्ण, जेथे महान धनुर्धारी अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय,
असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे असे माझे मत आहे.