Tuesday, 1 April 2025

अध्याय चौदावा २७ गुणत्रयविभागयोग (त्रीगुणमयी माया):

  


भगवान म्हणाले , सर्व ज्ञानामधील थोर ज्ञान मी पुन्हा सांगतो. ते जाणून सर्व मुनी मुक्त झाले.  ह्या ज्ञानाच्या बळाने ते मा‍झ्या सारखेच दिव्य होतील. ते सृष्टी निर्मितीच्या वेळी जन्म घेत नाहीत, प्रलयाच्या वेळी मृत्यू पावत नाहीत.

ब्रह्म नामक तत्त्व हे प्राकृत सृष्टीच्या जन्माचे स्रोत आहे. या ब्रह्माला मी प्रेरित करत असतो, त्यातून जीवांचा जन्म होतो. भौतिक प्रकृती मध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात, मी बीज प्रदान करणारा पिता आहे.

भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे. जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बध्द होतो. अर्जुना ! सत्त्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे. जे सत्त्वगुणा मध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बध्द होतात. असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो. त्यामुळे जीव सकाम कर्मांशी बांधला जातो. अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस, आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत.

हे भारता! सत्त्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो. रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण मूर्खपणाशी बांधतो.  मनुष्य म्हणजे तीन गुणांचं मिश्रण आहे. कधी सत्त्वगुणाचा , कधी रजोगुणाचा  तर कधी तमोगुणाचा प्रभाव जाणवत असतो. जेव्हा देहाची सर्व द्वारे प्रकाशित होतात तेव्हा सत्त्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येतो. जेव्हा बुद्धी रजोगुणाच्या आहारी जाते तेव्हा आसक्ती, सकाम कर्म आणि लालसा ही लक्षणं दिसतात. जेव्हा तमोगुणाची  वृद्धी होते तेव्हा अंध:कार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह प्रकट होतो.  मनुष्याचा सत्त्वगुणात मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. रजोगुणात  मृत्यू होतो तेव्हा सकाम कर्मामध्ये संलग्न असलेल्या मनुष्य लोकात जन्म घेतो. जेव्हा तमोगुणात मृत्यू होतो तेव्हा पशुयोनीत जन्म घेतो.

सत्त्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह, अज्ञान उत्पन्न होते. सत्त्वगुणी मनुष्य क्रमश: उच्चतर लोकामध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात. तमोगुणी लोकांचे नरकलोकात अध:पतन होते. मनुष्या जाणतो  प्राकृतिक गुणामुळेच कर्म घडत असतात, अन्य कोणी कर्ता नाही. त्याला  गुणा पलीकडे असणा-या परम पुरुषाची जाणीव होते, त्याच्याशी एकरूप होतो. जेव्हा जीव त्रिगुणांच्या पलीकडे जातो तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा यांचं दु:ख सोडून, मुक्ती प्राप्त करतो. अर्जुन विचारतो , जो त्रिगुणातीत आहे, त्याचे लक्षण काय? त्याची वागणूक कशी असते? आणि तो गुण कसा तरून जातो?  

जो प्रकाश, आसक्ती, आणि मोह यांची उपस्थिती असताना द्वेष करत नाही किंवा नाहीसे झाले तरी आकांक्षा करीत नाही. निर्सर्गाने प्राप्त झालेली कर्मे करतो. त्याचाच खेळ आहे हे जाणून निश्चल राहतो. जो आत्म्यामध्ये रममाण आहे. सुखदु:खाला सारखेच मानतो, दगड,सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय गोष्टीत समभाव राखतो, स्तुती, निंदा, मान, अपमान या कडे समदृष्टीने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो. जो धैर्यवान आहे. ज्याने भौतिक कर्माचा त्याग केला आहे त्याला गुणातीत म्हटले पाहिजे. जो एकनिष्ठ भक्तीने अखंड सेवा करतो तो त्रीगुणापलीकडे जाऊन गुणातीत होऊन ब्रह्माचा अनुभव घेतो. ब्रह्मज्ञान, मोक्ष, अविचल नीतिधर्म, आत्यंतिक सुख या सर्वांना मीच आधार.

 

परमेश्वराची उपासना भक्ती म्हणजेच प्रयत्नवाद आणि परमेश्वराची कृपा.

 

No comments:

Post a Comment