Thursday, 3 April 2025

अध्याय सोळावा २४ दैवासुरसंपदविभागयोग, दैवी आणि आसुरी स्वभाव.

 

 


 

श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्त्वशुद्धी, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, दयाभाव, लोभाविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्त हे सर्व दैवी गुण दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात.

हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान, आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. दैवी संपत्ति मोक्षाला पोहचविणारी आहे आणि आसुरी संपत्ति बंधनात घालणारी आहे. माणसाचे हृदय दैवी संपत्तीने भरलेलं आहे आसुरी संपत्ति प्रवाहाने येते. जगात दैवी आणि आसुरी  असे दोन प्रकारचे जीव आहेत. वर दैवी गुण बघितले  आता आसुरी गुणांचे विवरण ऐक.

आसुरी प्रवृतीचे लोक काय करावे काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार, तसेच सत्य त्यांच्यामध्ये आढळत नाही. ते म्हणतात कि, हे जग असत्य, निराधार आहे, परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करत नाही. केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे जग निर्माण झाले, कामा खेरीज अन्य कोणतेही कारण नाही. अश्या विचारामुळे स्वत:चा आणि जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्म करतात. कधीही तृप्त न होणा-या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदा मध्ये डुंबत, मोहित झालेले आसुरी लोक, अनित्य गोष्टींकडे आकर्षित होऊन सदैव अशुचीर्भूत कर्म करण्यासाठी व्रतस्थ झालेले असतात. अपार  चिंतेनी ग्रासलेले , इंद्रिय तृप्ती हेच एकमेव उद्दिष्ट मानून काम भोगात अडकलेले. आशेत गुरफटलेले, काम-क्रोधात तत्पर. अधर्माने धन संचय करतात.

असुरांचे मनोरथ संपत्ती , सत्ता आणि संस्कृती. मीच धनवान , मीच स्वामी , मीच भोक्ता मी कुलीन असा संकृतीचा अभिमान. आपल्याला श्रेष्ठ मानणारे, सदैव उद्धट असणारे, धन, खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक शास्त्र न पाळता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात. अहंकार, बल, गर्व, काम यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या आणि इतरांच्या देहा मध्ये असणा-या भगवंताचा द्वेष करतात, ख-या धर्माची निंदा करतात. जे द्वेषी, क्रूर, नराधम आहेत त्यांना मी चीरकालासाठी आसुरी योनीत टाकीत असतो. आसुरी योनीत वारंवार जन्म प्राप्त झालेले अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात.

 

काम, क्रोध आणि लोभ ही नरकात जाण्याची तीन द्वारे आहेत. प्रत्येक मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. या तिन्हीमुळे आत्माच्या नाश होतो.

म्हणून शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य योग्य-अयोग्य यामधील भेद जाणून मनुष्याने कर्म करावे जेणे करून क्रमश: उन्नती होईल.

थोडक्यात आसुरी संपत्ति दूर करून दैवी संपत्ति जवळ करावी.

 

No comments:

Post a Comment