Monday, 31 March 2025

अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः निवडक श्लोक

 

 


श्रीभगवानुवाच

इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १३-१ ॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक, क्षेत्रज्ञ असे म्हणतात.  

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत । क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ १३-२ ॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वतः जाणणे, ते ज्ञान आहे, असे माझे मत आहे.

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्‌ । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ १३-७ ॥

मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादीं बाबत सरळपणा, श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह.

कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ १३-२० ॥

कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो.  

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्‌ । विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ १३-२७ ॥

जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतांत परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे पाहतो.

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ १३-३२ ॥

ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्याकारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही.

 

 

No comments:

Post a Comment