Monday, 31 March 2025

अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः निवडक श्लोक

 

 


श्रीभगवानुवाच

इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १३-१ ॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक, क्षेत्रज्ञ असे म्हणतात.  

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत । क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ १३-२ ॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वतः जाणणे, ते ज्ञान आहे, असे माझे मत आहे.

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्‌ । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ १३-७ ॥

मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादीं बाबत सरळपणा, श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह.

कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ १३-२० ॥

कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो.  

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्‌ । विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ १३-२७ ॥

जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतांत परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे पाहतो.

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ १३-३२ ॥

ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्याकारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही.

 

 

Sunday, 30 March 2025

अध्याय तेरावा ३५ क्षेत्राक्षेत्रज्ञविभाग योग (प्रकृती, पुरुष आणि चेतना):

 


 

अर्जुन विचारतो , हे केशव! मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान, ज्ञेय बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे.

भगवान म्हणाले , हे कौतेया! या शरीराला क्षेत्र म्हटलं जाते आणि जो या शरीराला जाणतो तो क्षेत्रज्ञ होय.

सर्वात वसणारा क्षेत्रज्ञ मीच आहे हे जाण. क्षेत्र- क्षेत्रज्ञ मधील  भेद जाणणे म्हणजे ज्ञान होय.

क्षेत्र कोण कसे त्याचे विकार कोणते. क्षेत्रज्ञ कसा  कोण हे थोडक्यात सांगतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान विविध ऋषिनी विविध ग्रंथात सांगीतले आहे. हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सुत्रा मध्ये आले आहे.

पंचमहाभूते, अंहकार, बुद्धी, अव्यक्त, दहा  इंद्रिये, मन पाच इंद्रिय विषय इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित थोडक्यात क्षेत्र म्हटलं जाते.

नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, अध्यात्मिक गुरूला शरण जाणे, पावित्र्य,स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, अंहकार रहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादी मधील दु;ख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासाची उत्कट इच्छा, परम सत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो या व्यतिरेक जे आहे ते अज्ञानच आहे.

ज्ञेय म्हणजे जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. माझ्या आधीन असणारे ब्रह्म जगताच्या कार्य-कारणांच्या पलीकडे आहे. सर्वत्र त्याचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. परमात्मा हा सर्व इंद्रियाचे मूळ आहे तरीही तो इंद्रीयरहित आहे. तो सर्व जीवांचा पालन कर्ता असून अनासक्त आहे. प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे आणि सर्व प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे.

परमसत्य हे चराचर प्राणिमात्रांच्या आत आणि बाहेर आहे. सूक्ष्म असल्यामुळे पाहता आणि जाणता येत नाही. दूर असले तरी जवळ आहे. परमात्मा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो विभक्त नसतो. तो एकमेव आहे. तो पालनकर्ता आणि संहारकर्ता असल्याचे जाणले पाहिजे. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो अंधकाराच्या अतीत आहे. तो अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे. आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात आहे. क्षेत्र, ज्ञान ज्ञेय याचे थोडक्यात वर्णन केले आहे. हे जाणून मला प्राप्त होऊ शकतो. 

भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे त्रिगुण आणि विकार भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात.  प्रकृती सर्व भौतिक कार्य-कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटलं जाते तर जीव संसारातील विविध सुख दु:खाच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. याप्रमाणे  जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, देखरेख करणारा,अनुमती देणारा तो परमात्मा म्हणून जाणला जातो.  जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार यातील तत्त्व जाणतो त्याला मोक्षप्राप्ती होते.

परमात्म्याची अनुभती अंतरातील ध्यानाद्वारे, ज्ञानाच्या अनुशिलनाद्वारे, आणि निष्काम कर्माद्वारे करता येते. प्रमाणित व्यक्तींकडून परमपुरुषासंबंधी  ऐकून उपासना करून जन्म-मृत्यूचा मार्ग पार करतात. चर आणि अचर असे जे काही पाहत आहेस, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगा पासून निर्माण होते. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणा-या परमात्म्याला पाहतो आणि जाणतो, नश्वर देहातील आत्म्याचा आणि परमात्म्याचा विनाश होत नाही तो यथार्थ रूपाने पाहतो, जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने पाहतो तो मनामुळे स्वत:ची अधोगती होऊ देत नाही, तो परमगतीला प्राप्त होतो. जो पाहतो कि शरीर सर्व कर्मे करते आणि आत्मा अकर्ता आहे, तो सत्य पाहतो. विवेकी मनुष्य भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवून जीवांचा कसा विस्तार झाला हे जाणतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते.

अनादित्व, निर्गुणत्व, अव्ययत्व, अकर्तुत्व हे दिव्य आत्म्याचे गुण आहेत. आकाश सर्वव्यापी असून ते कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. देहात भरलेला आत्माही लिप्त होत नाही.

एकमेव सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो त्याच प्रमाणे शरीरात असलेला आत्मा क्षेत्रज्ञ  शरीराला, क्षेत्राला प्रकाशित करतो. ज्ञान दृष्टीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील फरक जाणतात ते भौतिक प्रकृती पार करून ब्रह्मपदी पोहोचतात.

Saturday, 29 March 2025

अध्याय बारावा भक्तियोगः निवडक श्लोक

 

 


अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १२-१३ ॥

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः । मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४ ॥

जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चातापानंतर) अभय देणारा असतो; तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे.  

 यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १२-१५ ॥

ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे.

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः । सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१६ ॥

ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे.  

 

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १२-१७ ॥

जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे.  

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः । शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १२-१८ ॥

जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते   

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्‌ । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १२-१९ ॥

ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. 

Friday, 28 March 2025

अध्याय बारावा २० भक्तियोग (श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)

 

 


अर्जुनाने विचारणा केली आहे, तुमच्या भक्तीमध्ये जे सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त ब्रह्माची उपासना करतात या पैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानतात. म्हणजेच काही सगुण भक्ती करतात तर काही निर्गुण भक्ती करतात. या दोहोतून कोणता भक्त, देवा तुला प्रिय आहे?

भगवान म्हणाले जे आपले मन मा‍झ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि श्रद्धेने माझी सतत उपासना करतात ते मा‍झ्या मते सर्वोत्तम होत. 

जे सर्व इंद्रियांचे संयमन करून सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, सर्वव्यापी परम सत्याची उपासना करतात ते सर्वाच्या हिताशी संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. 

अव्यक्तोपासना अतिशय कठीण आहे. जे माझे पूजन करतात, सर्व कर्मे मला अर्पण करतात, मा‍झ्या ठिकाणी मन स्थिर करून अनन्यभावाने भक्ती करतात, माझे ध्यान करीत असतात. हे पार्थ , त्याचा मी जन्ममृत्युरुपी संसार सागरातून त्वरित उध्दार करतो. 

मन बुद्धी मला अर्पण कर अश्या रीतीने तू नि:संदेह मा‍झ्या मध्येच वास करशील. मन मा‍झ्या ठिकाणी स्थिर करता येत नसेल तर भक्तियोगाच्या तत्त्वांचे पालन कर. अश्या रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा कर.

भक्तियोगाच्या विधीविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर. कर्म केल्याने सिद्धी प्राप्त होईल. माझ्यासाठी कर्म करण्यात असमर्थ असशील तर कर्मफलांचा त्याग करून आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. प्रयत्नाने ज्ञान लाभेल. त्यामुळे गोडी वाढेल आणि तन्मयता होईल. मग पूर्ण फलत्याग साधेल.  शीघ्र शांती देईल. 

जो कोणाचाच द्वेष करीत नाही, मनात सर्वांविषयी दया, मैत्री जपतो, मी माझे करत नाही, सुख दु:खा मध्ये समभाव राखतो. सदैव तृप्त, आत्मसंयमी, दृढ निश्चयी आणि मन, बुद्धी मला अर्पण करतो तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. 

जो न लोकांस कंटाळे, ज्यास कंटाळती न लोक. जो हर्ष आणि दु:ख, भय आणि चिंता या मध्ये समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे. जो शुध्द, कुशल, चिंतारहित, दु:खमुक्त आणि फलप्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे. 

न उल्लासे न संतापे त्याचं काही मागणे नाही, ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे, असा भक्त मला प्रिय आहे. 

शत्रू मित्र तसेच मनापमानात  समत्व राखतो. शीत-उष्ण, सुख-दु:ख, स्तुति-निंदा या मध्ये समभाव राखतो. सदैव शांत आणि मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो ज्ञानामध्ये स्थित असतो, भक्तीत लीन असतो तो मला अत्यंत प्रिय आहे. 

जे या अविनाशी भ‍क्तिमार्गाचे अनुसरण करतात. मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने जोडले जातात ते मला अधिक प्रिय आहेत.

Thursday, 27 March 2025

अध्याय अकरावा विश्वरूपदर्शनयोगः निवडक श्लोक

  

 

 


भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ११-५४ ॥

परंतु हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजरूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्त्वतः जाणणे तसेच (माझ्यात) प्रवेश करणे अर्थात (माझ्याशी) एकरूप होणेही शक्य आहे.

 

Wednesday, 26 March 2025

अध्याय अकरावा ५५ विश्वरूप दर्शन योग , विश्वरूप:

 

 

 




अर्जुन म्हणाला, परम गुह्य असं अध्यात्मिक उपदेश  केल्यामुळे माझा मोह नष्ट झाला आहे.  जीवांचे उत्पती, नाश तुझ्या कडून ऐकले. तुझा अभंग महिमा अनुभवला. पुरुषोत्तमा , तू ईश्वरी रूप, जे सांगीतलं ते मला पटले. तुझे विभूतीने भरलेले व्यापक रूप मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो.  ते रूप पाहण्याची योग्यता माझ्यात आहे, असे तू मानत असशील तर दाखव.

भगवान म्हणाले , अलौकिक आणि विविध वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा.  वसू, वायू, रुद्र, आदित्य, अश्विनीच्या विविध रुपांना पहा. मनात उठणारा प्रत्येक कल्पना-तरंग, इच्छा-दर्शन घे. परंतु या नेत्रांनी मला पाहू शकणार नाही मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो.

संजय म्हणाले, हे राजा, अश्या प्रकारे बोलून महा योगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले.      

असंख्य नेत्र, असंख्य मुखे खूप अद्भुत दृष्ये पहिली. दिव्य वस्रे, आभूषणे , असंख्य आयुधे. सहस्र सूर्याची प्रभा एकवटली तरच  भगवंतांच्या  तेजाची बरोबरी करू शकले असते. भगवंताच्या देहात ब्रह्मांडातील विस्तृत रूपे पहिली. विश्वरूप दर्शनाने आश्चर्य चकित अर्जुन भगवंतापुढे नतमस्तक झाला. हात जोडून प्रार्थना करता झाला.

अर्जुन म्हणाला, हे भगवान! मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाला तसेच भगवान शंकर सर्व ऋषि आणि अलौकिक सर्पांना तुमच्या देहात पाहतो.  दिव्य दृष्टी दिली असली तरी तुझे तेज:पुंज रूप पाहणे कठीण आहे. तुम्ही आदी, मध्य आणि अंत रहित आहात. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्या मध्ये प्रवेश करीत आहेत. महर्षिगण, स्वस्ती म्हणत तुमची स्तुति करत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, गंधर्व, यक्ष, असुर विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. कौरव, मुख्य योध्ये तुमच्या भयंकर मुखात प्रेवेश करीत आहेत. ज्या प्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याप्रमाणे सर्व लोक द्रुतगतीने तुमच्या मुखात प्रवेश करीत असल्याचे पाहात आहे. तुम्ही सर्व बाजून सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचं पाहात आहे. मी तुम्हाला प्रणाम करतो उग्ररुपधारी तुम्ही कोण आहात? ते सांगा.

भगवान म्हणाले, जगताचा नाश करणारा काळ मी आहे. पांडवाव्यतिरिक्त दोन्ही सैन्यांतील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. म्हणून ऊठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारले आहे. तू  त्यांचा वध कर.

संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन भगवंतांकडून हे वचन ऐकून अर्जुनाने हात जोडून नमस्कार केला आणि कृष्णाला म्हणाला, सज्जन ईश्वराला वंदन करीत आहेत, तर दुर्जन पराजित होऊन पळ काढीत आहेत, चांगलंच आहे. 

हे प्रभो, तू वंदनीय कर्ता आणि गुरु आहेस. तू  अग्नि, वायू , जल, चंद्र तुम्ही आहात. प्रपितामह तुम्हीच आहात पुन: पुन्हा नमस्कार करतो. तुम्ही सर्वव्यापी आहात सर्व बाजूंनी नमस्कार असो. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून, अनादराने संबोधिले, चेष्टा केली, चुकून जे काही केलं असेल त्यासाठी क्षमा करा. तुम्ही चराचर सृष्टीचे पिता आहात. गुरु देवता आहात. तुमच्या तोडीचा कोणी नाही. त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोणी नाही. मी सांष्टांग प्रणिपात करून कृपायाचना करीत आहे. विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे. तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. तुमचे  चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो.

भगवान म्हणाले , हे अर्जुन! तुझ्यावर प्रसन्न होऊन मा‍झ्या अंतरंग शक्ती द्वारे तुला परमश्रेष्ठ विश्वरूप दाखविले. तुझ्या पूर्वी हे विश्वरूप कोणीही पहिले नव्हते. कारण ते वेदाभ्यासाने , यज्ञाने , दानाने, पुण्यकर्माने पाहणे शक्य नाही. आता हे रूप मी समाप्त करतो आणि तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांतचित्ताने पहा.

संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णानी या प्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले.

अर्जुन म्हणाला, हे भगवान , हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे.

भगवान म्हणाले , तुझ्या दिव्य चक्षुद्वारे तू जे रूप पाहात आहेस या मूळ स्वरुपात मला कोणीही पाहू शकत नाही. अनन्य भक्तीने हे ज्ञान-दर्शन लाभते. दर्शनामुळे मा‍झ्या तत्त्वात प्रवेश होतो.

हे अर्जुना! मा‍झ्या विशुध्द भक्तीमध्ये संलग्न होऊन, माझ्याप्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो.

Tuesday, 25 March 2025

अध्याय दहावा विभूतियोगः निवडक श्लोक

 

 






बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः । सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ १०-४ ॥

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः । भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ १०-५ ॥

निर्णयशक्ती, यथार्थ ज्ञान, असंमूढता, क्षमा, सत्य, इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख-दुःख, उत्पत्ति-प्रलय, भय-अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती-अपकीर्ती, असे हे भूतांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात.  

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्‌ । ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०-१० ॥

त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात.


तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ १०-११ ॥


त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच    

 त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूप दिव्याने

 नाहीसा करतो.


Monday, 24 March 2025

अध्याय दहावा ४२ विभूतियोग (श्रीभगवंतांचे ऐश्वर्य )

 

 


ऐकण्यात गोडी ठेव, तुझे कल्याण इच्छितो, काही गोष्टी  पुन्हा सांगतो. माझा प्रभाव ना देव जाणतात ना महर्षि. दोन्ही ही महान आहेत. सर्व प्रकारच्या देवांचे आणि महर्षीचे मूळ मी आहे. मी जन्मरहित आहे, मीच उगमस्थान आहे.  हे जो ओळखतो तो मोह न ठेवता, पातकातून मुक्त होतो. सत्यता, शम, निग्रह, तप, दातृत्त्व, संतोष, अहिंसा, समता, क्षमा,  नैतिक गुण, बुद्धी आणि ज्ञान भौतिक भाव. लाभालाभ, जन्म, नाश स्थूल, निर्मोहता भाव माझ्या पासूनच उत्पन होतात. सात महर्षि, चार मनु हे माझ्या संकल्पातून उत्पन्न झाले. हा माझा विस्तार नीट जो जाणतो त्याला भक्तियोगाचा लाभ होतो. सर्वांचे मूळ आणि प्रेरणा माझ्यापासून आहे हे जाणुन माझी भक्ती करतात. ईश्वर चिंतनात मग्न राहून ते आनंदात राहतात. अश्या प्रकारे एकमेकांस बोध देत, सदासर्वदा भगवंताचे कीर्तन करत आनंदाने असतात, भगवंताला प्रेमपूर्वक भजतात त्यांना मी स्वत:हून भेटतो. मी ज्ञान-दीप प्रकट करतो आणि अज्ञानरुपी अंधकार घालवितो.

अर्जुन म्हणाला, तू व्यापक, सगुण, निर्गुण निराकार आहेस. तू मोक्ष धाम आहेत. असित, देवल, व्यास, नारद आणि तू स्वत: याला पुष्टी दिलेली आहे,

तू सांगीतले ते सत्य मानतो. देव, दानव तुझे रूप जाणत नाही. परमेश्वराचे रूप परमेश्वरा शिवाय कोण जाणणार?  तुझ्या असंख्य विभूती आहेत, मला दिव्य विभूती सांग. तुझे निरंतर चिंतन कसे करावे, कसं जाणावे?  कोणकोणत्या विविध रुपात तुझे ध्यान करावे हे सांग. हे जनार्दना! विभूतीचे विस्ताराने वर्णन करून सांग.

भगवंत म्हणाले,  बरं, माझ्या दिव्य विभूती सांगतो, माझा  विभूतीं विस्तार कधीच संपत नाही. आत्मा रूपाने मी सर्वांच्या हृदयात राहतो, सर्व प्राणीमात्रांचा मी आदी, मध्य, आणि शेवट आहे. पुढे भगवंताने विविध विभूती सांगितल्या आहेत. 

या विभूतीचे चिंतन गुण विकासासाठी आहे.

१) आपल्या ठिकाणी जो गुण दिसत असेल त्याचा उत्कर्ष साधणे.

२) ज्या गुणाची उणीव दिसत असेल त्या विषयी आदर वाढविणे.

घट घट मे साई रमता, कुटक वचन मत बोल रे. - कबीर. 

२१ व्या श्लोकापासून विभूती वर्णन. विभूतीचे सार, गुण विशेष.

 

·       आदित्यांत महाविष्णू : बारा महिन्याचे बारा आदित्य. ह्यांची रूपे सौम्य,प्रखर,आवृत इत्यादी असली तरी विष्णू एकच. आदित्यांतील अधिदैवत.

·       सूर्य : अधिभूत होय. वर डोक्यावर दिसतो तो सूर्य आधिभौतिक.

·       मरीची : मरीची म्हणजे जल. पाऊस घेऊन येणारा मोसमी वारा श्रेष्ठ.

·       नक्षत्रांत चंद्रमा – सौम्य, सेवामुर्ती आहे. चंद्र २७ दिवस २७ नक्षत्रांना भेटतो, चंद्र भ्रमण.

·       वेदात सामवेद : गाण्याला सुलभ, त्यावेळच्या रागामध्ये त्यांना बसविले आहे,पन्नास एक मंत्र सामवेदाचे आहेत.  बाकी ऋग्वेदातील निवडलेले आहेत. गाता येतो म्हणून श्रेष्ठ. भगवान श्रीकृष्ण स्वत: सामवेदी होते.

·       देवात इंद्र : पाऊस पडणारा.

·       चेतना म्हणजे जीवन शक्ती.

·       इंद्रियांत मन : मनाच्या आधारे बाकी इंद्रिय चालतात म्हणून मन श्रेष्ठ.

·       कुबेर – यक्ष रक्ष योनीत. कुबेर जगातील सर्व धनाचा स्वामी.

·       अग्नी  आठ वसू  मध्ये अग्नी.    वसू  म्हणजे वसती स्थानाच्या देवता.

o   स्वच्छ पाणी, आप 

o   मोकळी हवा, अनिल

o   भरपूर प्रकाश, प्रभास

o   उषेच दर्शन , प्रत्यूष

o   दिशा सूचक, ध्रुव

o   चंद्रभोगी आंगण, सोम

o   टणक जमीन, धरा

o   अग्निहोत्राची व्यवस्था, अग्नी

 

·       मेरू – उच्च शिखरामध्ये

·       पुरोहीतात बृहस्पती : वाणीची अधिदैवत. ओंकार प्रतिक, गणपती रूप.

·       स्कंद सेनानीत : स्कंद आणि गणपती दोघे बंधू.  कुमार ही म्हणतात.

·       जलात सागर. गंभीर, शांत, खोल.

·       एकाक्षर ॐकार

·       महर्षित भृग:  ब्राह्ममिमांसेचा जीज्ञासु, वरुणशिष्य.

·       जप सर्व यज्ञात : मंत्रादिकांची तदर्थ भावनापुर्वक पुन: पुन: आवृत्ती. जप करून त्याच्या अर्थाचे पुन: पुन: चिंतन करावे.

·       हिमालय : शांत, निश्चयाची मूर्ती, स्थैर्य प्रतिक.

·       अश्वत्थ : पिंपळ मृतांच्या दहनक्रीयेला प्रशस्त मानलेला. संसाराच्या अनित्यतेचा स्मारक. अ+श्व + त्थ  = अ -नाही , श्व -उद्या - त्थ -  टिकणारा . उद्या न टिकणारा दिनभंगुर. वृक्ष म्हणजेच कापला जाणारा व्रश्च  (व्रश्चनात वृक्ष) 

·       नारद  देवर्षी मध्ये भक्ती करणारा, गुणगान करणारा, द्रष्टा ऋषी म्हणजेच दृष्टी असलेला पुरुष.

·       गंधर्वातील चित्ररथ

·       कपिल मुनी – सिद्ध पुरुष.

·       घोड्यात उच्चै:श्रवा  : समुद्र मंथनातून उत्पन्न

·       गजेन्द्रात ऐरावत

·       मनुष्यामध्ये राजा.

·       आयुधा मध्ये वज्र  तपस्येच, त्यागाचं लक्षण

·       गाईत कामधेनु

·       प्रजोत्पदानात  कामदेव   उत्पत्ति हेतू.

·       सर्पात  वासुकी

·       नागात शेषनाग

·       जलात वरुण देवता

·       अर्यमा आर्य मनाचा , आर्याचा मानीव पूर्वज.

·       यम नियती देवता. ओढणारा मी यम

·       दैत्यात प्रल्हाद परम भक्त , निर्भयता

·       मोजणा-यात  काळ मी , काळाचे सतत भान, क्षणघटिका दिकांनी जीवनाचे मापन करणारा.

·       पक्षात गरुड पशु मध्ये सिंह

·       वेगवंतात वायू, वीरा मध्ये राम, नदी मध्ये गंगा, नदी म्हणजे नाद करणारी.

·       सर्व विद्या मध्ये आधात्म विद्या,सृजनाचा आदी,मध्य,अंत , तर्काशास्र मध्ये सत्य.

 

आनंद : संतोष, निश्चिंत वृत्ती , लीला-विनोद. “लीला विनोदे संसार तरिजे रया.” - ज्ञानदेव

श्लोक  ८ : सर्व प्रेरणा परमेश्वराची आहे हे ओळखून वाट्यास आलेले काम त्याची भक्ती समजून करीत जावे.

श्लोक  ९ : सारे चिंतन आणि जीवन परमेश्वराला वाहून सहकार वृत्तीने एकमेकांस बोध देत देत हरी कीर्तनात रंगून जावे.

श्लोक  १० : अशी निष्काम भक्ती करणारास ईश्वरकृपेने यथाकाळी सहजच ज्ञान लाभ होत असते.

श्लोक  ११ : या ज्ञानाची क्षेम चिंता ही भक्ताला करावी लागत नाही.

कर्म , भक्ती, ज्ञान, मोक्ष चार श्लोकात.

अज्ञान तम घालवी

हे सगळं जाणून काय करशील अर्जुना! शंभरापैकी एकाच अंशाने सारे विश्व व्यापले आहे.