Saturday, 15 March 2025

अध्याय पाचवा. कर्मसंन्यासयोगः निवडक श्लोक

 


 

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः । सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ५-७ ॥

ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहातो.  

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः । तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्‌ ॥ ५-१६ ॥

परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करते. 

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्‌ । स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्‌ ब्रह्मणि स्थितः ॥ ५-२० ॥

जो पुरुष प्रिय वस्तु मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तु प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला, संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो.

योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः । स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ ५-२४ ॥

जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. 

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌ ॥ ५-२६ ॥

काम-क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो.  

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः । प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ ५-२७ ॥

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः । विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ ५-२८ ॥

बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून, ज्याने इंद्रिये, मन व बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की, तो सदोदित मुक्तच असतो.  

 


No comments:

Post a Comment