Wednesday, 5 March 2025

अध्याय पहिला : ४६ अर्जुन विषादयोग:

 



श्रीकृष्ण शिष्टाई असफल झाली. युध्द अटळ झालं.  अर्जुन , कृतनिश्चयाने आणि कर्तव्य भावनेने कुरुक्षेत्री दाखल झाला. वीर-वृत्तीच्या उत्साहाने कृष्णाला म्हणतो “ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर, म्हणजे कोण माझ्याबरोबर लढण्यासाठी जमले आहेत. अर्जुन सभोवार नजर फिरवितो, दोन्ही बाजूला आपल्याच नातेवाईकांचा, सग्या-सोय-यांचा मेळावा दिसतो. तो बघून अर्जुनाची स्वजन सक्ती जागृत होते. तो गलितगात्र होऊन युद्ध करायला टाळता झाला. आसक्ती जन्य मोहाने त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासली आणि मग त्याला तत्त्वज्ञान आठवले.  विषाद झाला, यालाच फिलोसोफिलाझेशन म्हणतात. अर्जुन अहिंसेची, संन्यासाची भाषा बोलू लागला. त्याचा मोह  स्वधर्मविरोधी होता. अर्जुन धर्म-संमूढ झाला होता. त्याच्या स्वधर्माच्या आड येणारा मोह, ममत्व , आसक्ति दूर करण्यासाठी श्री कृष्णानी गीता सांगीतली, गीतेचा जन्म स्वधर्माच्या आड येणारा जो मोह त्याच्या निवारणार्थ आहे.  शेवटी भगवंतानी प्रश्न केला अर्जुना, गेला का तुझा मोह? अर्जुन म्हणाला देवा, मोह मेला, स्वधर्माचे भान झाले.

पहिल्या अध्यायात एकूण सहभागी सैन्य, वीर ,योद्धे  सैन्याची रचना इत्यादीचे तपशील येतात. पांडवांचं सात अक्षौहीणी सैन्य, कौरवांचं अकरा अक्षौहीणी सैन्य एकूण अठरा अक्षौहीणी सैन्यांनी महाभारताचं युद्ध लढलं.

मोहग्रस्थ अर्जुनाच्या शरीराला कंप सुटला आहे. त्याने कृष्णाला अनेक प्रश्न विचारले.. युद्धात कल्याण दिसत नाही. स्वजनास मारून सुखी कसे व्हावे? कुल क्षयाचा महा दोष लागेल, कुल धर्म बुडेल, कुळी अधर्म पसरेल, वर्ण संकर होईल. कुळधर्म बुडविला म्हणून नरकात जावे लागेल. असं युद्ध करावं का?

अर्जुनाला झालेलं दु:ख , विषाद.

No comments:

Post a Comment