अर्जुन विचारतो , हे केशव! मला प्रकृती, पुरुष,
क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान,
ज्ञेय बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे.
भगवान म्हणाले , हे कौतेया! या शरीराला क्षेत्र म्हटलं
जाते आणि जो या शरीराला जाणतो तो क्षेत्रज्ञ होय.
सर्वात वसणारा क्षेत्रज्ञ मीच आहे हे जाण. क्षेत्र-
क्षेत्रज्ञ मधील भेद जाणणे म्हणजे ज्ञान
होय.
क्षेत्र कोण कसे त्याचे विकार कोणते. क्षेत्रज्ञ
कसा कोण हे थोडक्यात सांगतो. क्षेत्र आणि
क्षेत्रज्ञाचे ज्ञान विविध ऋषिनी विविध ग्रंथात सांगीतले आहे. हे ज्ञान सर्व कारण
परिणामांसहित वेदांत सुत्रा मध्ये आले आहे.
पंचमहाभूते, अंहकार,
बुद्धी, अव्यक्त, दहा
इंद्रिये, मन पाच इंद्रिय विषय इच्छा,
द्वेष, सुख, दु:ख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित
थोडक्यात क्षेत्र म्हटलं जाते.
नम्रता,
निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, अध्यात्मिक गुरूला शरण जाणे,
पावित्र्य,स्थैर्य, आत्मसंयमन,
इंद्रिय विषयांचा त्याग, अंहकार रहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादी मधील दु;ख दोष
जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट
आणि अनिष्ट गोष्टीमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती,
एकांतवासाची उत्कट इच्छा, परम सत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे
असे मी घोषित करतो या व्यतिरेक जे आहे ते अज्ञानच आहे.
ज्ञेय
म्हणजे जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. माझ्या आधीन असणारे ब्रह्म
जगताच्या कार्य-कारणांच्या पलीकडे आहे. सर्वत्र त्याचे हात, पाय,
नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून
आहे. परमात्मा हा सर्व इंद्रियाचे मूळ आहे तरीही तो इंद्रीयरहित आहे. तो सर्व
जीवांचा पालन कर्ता असून अनासक्त आहे. प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे आणि सर्व
प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे.
परमसत्य
हे चराचर प्राणिमात्रांच्या आत आणि बाहेर आहे. सूक्ष्म असल्यामुळे पाहता आणि जाणता
येत नाही. दूर असले तरी जवळ आहे. परमात्मा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे
वाटला तरी तो विभक्त नसतो. तो एकमेव आहे. तो पालनकर्ता आणि संहारकर्ता असल्याचे
जाणले पाहिजे. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो अंधकाराच्या
अतीत आहे. तो अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे. आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या
हृदयात आहे. क्षेत्र, ज्ञान ज्ञेय याचे थोडक्यात वर्णन केले आहे. हे जाणून
मला प्राप्त होऊ शकतो.
भौतिक
प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे त्रिगुण आणि विकार भौतिक
प्रकृतीपासून उत्पन्न होतात. प्रकृती सर्व
भौतिक कार्य-कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटलं जाते तर जीव संसारातील विविध सुख
दु:खाच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत
भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे.
तो महेश्वर, देखरेख करणारा,अनुमती
देणारा तो परमात्मा म्हणून जाणला जातो. जो
भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार यातील तत्त्व जाणतो त्याला
मोक्षप्राप्ती होते.
परमात्म्याची
अनुभती अंतरातील ध्यानाद्वारे, ज्ञानाच्या अनुशिलनाद्वारे, आणि निष्काम कर्माद्वारे
करता येते. प्रमाणित व्यक्तींकडून परमपुरुषासंबंधी ऐकून उपासना करून जन्म-मृत्यूचा मार्ग पार
करतात. चर आणि अचर असे जे काही पाहत आहेस, ते
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगा पासून निर्माण होते. जो मनुष्य सर्व
देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणा-या परमात्म्याला पाहतो आणि जाणतो, नश्वर देहातील
आत्म्याचा आणि परमात्म्याचा विनाश होत नाही तो यथार्थ रूपाने पाहतो, जो मनुष्य
सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने पाहतो तो मनामुळे स्वत:ची अधोगती होऊ
देत नाही, तो परमगतीला प्राप्त होतो. जो पाहतो कि शरीर सर्व कर्मे करते आणि आत्मा
अकर्ता आहे, तो सत्य पाहतो. विवेकी मनुष्य भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप
पाहण्याचे थांबवून जीवांचा कसा विस्तार झाला हे जाणतो तेव्हा त्याला ब्रह्माची
प्राप्ती होते.
अनादित्व,
निर्गुणत्व, अव्ययत्व, अकर्तुत्व हे दिव्य आत्म्याचे गुण आहेत. आकाश
सर्वव्यापी असून ते कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. देहात भरलेला आत्माही लिप्त
होत नाही.
एकमेव
सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो त्याच प्रमाणे शरीरात असलेला आत्मा
क्षेत्रज्ञ शरीराला, क्षेत्राला प्रकाशित
करतो. ज्ञान दृष्टीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील फरक जाणतात ते भौतिक प्रकृती
पार करून ब्रह्मपदी पोहोचतात.
No comments:
Post a Comment