ध्यानयोगाच्या
सुरवातीलाच सांगितलं आहे. मला स्वत:चा उध्दार करून घ्यावयाचा आहे. मी पुढे
जाणार उंच उडी घेणार. उद्धरावे स्वये
आत्मा.
मनुष्याचा हात धरून पुढे नेण्यासाठी, उंच नेण्यासाठी गीता.
मनुष्याने आपला व्यवहार शुध्द करून परमोच्च स्थिती गाठावी हीच गीतेची इच्छा आहे.
फलाची अपेक्षा न ठेवता जो कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो
तोच खरा संन्यासी आणि कर्मयोगी होय.
संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. मनुष्य
इंद्रीयतृप्तीच्या इच्छांचा त्याग करीत
नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वत:ची अधोगती
होऊ न देता, स्वत:चा उध्दार केला पाहिजे.
मन हे मित्र तसेच शत्रूही आहे. ज्याने मनाला जिंकले
त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे.
जर मन जिंकता आले नाही तर तेच मन परम शत्रू होते. मन जिंकले त्याला
परमात्मा प्राप्त झालेला असतो. त्याने शांती प्राप्त केलेली असते. तो सुख-दु:ख,
शीत-उष्ण, मान-अपमान, दगड-सोने इत्यादी समदृष्टीने पाहतो. तो शत्रू,मित्र,उदासीन,मध्यस्थ,परका,सखा,
साधू असो कि पापी सर्वांकडे समबुद्धीने पाहतो.
साधकाने इच्छा आणि संग्रह सोडून, एकांत स्थळी एकटे राहून आत्म्याचे ध्यान करावे. पवित्र
स्थान पाहून, जे उंच नाही आणि खोलगट नाही अश्या स्थानी दर्भ,चर्म
आसनावर वस्त्र घालून बसावे. मन, इंद्रिय यांचे संयमन करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध
करण्यासाठी योगाभ्यास करावा. साधकाने शरीर, मान,
मस्तक म्हणजेच मेरुदंड सरळ रेषेत ठेवून
नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. श्वासोश्वास सहज असावा. संयमित मानाने
भयरहित होऊन आत्मशुद्धि साठी एकाग्र
व्हावे. या प्रमाणे नियमित अभ्यास करून योगी मोक्षावस्थेत लाभणा-या शांतीचा अनुभव
घेतो.
यासाठी नियमित नेमका आहार, आवश्यक तेवढीच झोप घेणे
महत्त्वाचे. आहार, निद्रा, विहार, क्रिया करण्याचा सवयी नियमित करतो. तो
योगाभ्यासाद्वारे दु:खा पासून मुक्त होऊ शकतो. अभ्यासाने मानसिक कार्य नियमित
करतो. सर्व भौतिक इच्छा आकांक्षा पासून मुक्त होऊन अध्यात्मा मध्ये स्थित होतो.
त्याला योगयुक्त झाल्याचं म्हटलं जातं.
योग्याभ्यासाद्वारे मन सांसारिक मानसिक क्रियांपासून
पूर्णपणे संयमित होते त्याला समाधी असे म्हणतात. या स्थितीत मनुष्य विशुध्द
मनाद्वारे आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो.
सत्यापासून ढळत नाही. या सत्याची प्राप्ती झाल्यावर,
मोठमोठ्या संकटांमध्ये विचलित होत नाही. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व
भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनन प्रक्रियेने इंद्रियं संयमित केली पाहिजेत.
मन आत्म्यात स्थिर करावे, स्वत:हून काहीच चिंतू नये. चंचल आणि अस्थिर मन भरकटते
त्याला आत्म-चिंतनात लावावे. एकदा गोडी लागली कि मन शमते, निर्मळ मनात आत्म्याचे
प्रतिबिंब उमटते. तेच उत्तम सुख.
जो सर्व
प्राणीमात्रात स्वत:ला पाहतो आणि स्वत:त सर्व प्राणीमात्र पाहतो. सर्व परमेश्वर
आणि परमेश्वरच सर्व. प्रथम आपण आणि अन्य ह्यातला भेद नाहीसा होतो आणि परमात्मा आणि
आपली एकात्मता अनुभवतो. हे अर्जुन जो आपल्याला
आहे तसेच इतरांना सुख दु:ख आहे. हे जाणतो आणि सहानुभूतिनी वागतो तोच
परिपूर्ण योगी.
अर्जुन म्हणाला, मन चंचल आणि अस्थिर आहे त्यामुळे ही
योगपद्धती कठीण आहे. हे कृष्ण! मन चंचल, हट्टी आणि बलवान असल्यामुळे वायुला
नियंत्रित करण्यापेक्षा मनाला संयमित करणे कठीण आहे.
भगवान म्हणाले चंचल मनाला संयमित करणे नि:संशय अत्यंत
कठीण आहे पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे.
संयमवंताला अभ्यास-वैराग्याने योग साधतो. संयमा शिवाय योग शक्य नाही.
अर्जुन विचारतो, हे कृष्ण! आरंभी योगमार्गाचा स्वीकार करतो, नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होऊन योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अश्या अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला पतित होत नाही का? हे कृष्ण! हा माझा संशय आहे, कृपया दूर कर.
श्री भगवंत म्हणाले हे पार्थ!
शुभकार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकात विनाश होत
नाही. जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृतीनी प्रभावित होत नाही. योगभ्रष्ट
योगी गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. दीर्घकाळ
योगाभ्यासात अपयशी ठरलेला, अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो. असा
जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माचा दिव्य चेतनेचे पुनरुजीवन करतो, पुन्हा
प्रयत्त्न करतो. पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर योगाभ्यासाकडे आकृष्ट
होतो. आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुध्द होऊन अधिक प्रगती साधण्यासाठी
प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा शेवटी अनेकानेक जन्मजन्मान्तराच्या अभ्यासानंतर
सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते.
भगवंत अर्जुनाला आज्ञा करतात तू योगी हो कारण योगी
तपस्वी, ज्ञानी, सकाम कर्मी पेक्षा श्रेष्ठ आहे. अशा सर्वांगी
आत्मज्ञानी योग्यांमध्ये जो योगी भक्त होऊन राहतो तो भगवंताला विशेष प्रिय
वाटतो.
No comments:
Post a Comment