अर्जुन विचारतो, तू कर्म संन्यास सांगतो , कर्मयोग पण करायला सांगतो मग संन्यास आणि कर्मयोग यातलं लाभदायक कोणतं?
भगवान सांगतात, मोक्षप्राप्ती साठी संन्यास आणि कर्मयोग दोन्ही सारखेच.
भक्तियुक्त कर्म, कर्म संन्यासा पेक्षा उत्तम. जो द्वेष करीत नाही, आपल्या
कर्मफलाची आकांक्षा ठेवत नाही. त्याला संन्यासीच म्हटलं जातं. वस्तुत: दोन्ही मार्ग भिन्न नाहीतच. हे जाणणे
महत्त्वाचे. कोणत्याही मार्गाचे चांगल्या
रीतीने अनुसरण करेल त्याला त्या मार्गाचे फळ मिळतेच. केवळ सर्व कर्मापासून संन्यास
घेतल्याने सुखी होऊ शकत नाही. भक्ती मध्ये लीन झालात तर ब्रह्म प्राप्ती होऊ शकते.
कर्मयोगी आत्मा विशुध्द करतो, इंद्रिय
जिंकून आत्मविजय मिळवितो, सर्व भुतांमध्ये स्वत:ला पाहून आत्मविस्तार करतो ,
व्यापक होतो. योगी, संन्यासी सर्व कर्मे करतो, हि
सर्व कर्मे इंद्रियांचा स्थायी भाव
आहे हे, तो जाणतो. कोणत्याही कर्माचा त्याच्या मनावर,
चित्तावर संस्कार उमटत नाही. योगीजन आसक्तीचा त्याग करून केवळ शुध्दिकरणा साठी काम
करतो. निष्ठेने भक्ती करणारा सर्व मला समर्पित करतो त्याला शांती प्राप्त होते. जो
फळाचा लोभ धरतो तो बांधला जातो. कर्माचा
त्याग करतो तो संन्यासी. फलाचा त्याग करतो तो योगी,कर्मयोगी.
संयमी पुरुष नवद्वार असलेल्या शरीरात सुखी राहतो. जीवाचे कर्तृत्व त्यांचा
स्वभावाने बनते. कर्माची मूळ प्रेरणा, प्रत्यक्ष हातून होणारे कर्म, त्यातून निमार्ण होणारे
फळ हे काहीच ईश्वर घडवून आणत नाही. परमेश्वर कुणाही जीवाचे पाप-पुण्य स्वत:वर घेत
नाही. अज्ञान गेले की ज्ञानाचा ईश्वरी प्रकाश दिसतो. मनुष्याची बुद्धी, मन,
निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याचे
दोष धुतले जातात आणि मुक्तीपथावर अग्रेसर होतो. विनम्र साधुव्यक्ती यथार्थ
ज्ञानाच्या आधारे ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ या सर्वांना समान दृष्टीने पाहतो. समत्वाचा
आदर्श समोर ठेवून वागू लागलो म्हणजे समत्वाचे
क्षेत्र व्यापक होत जाऊन शेवटी ब्रह्मसाम्याचा अनुभव येऊ शकतो. प्रिय वस्तू
प्राप्त झाली तर हर्षून जात नाही, अप्रिय वस्तू मिळाली तरी शोक करत नाही. त्याची
बुद्धी मोह रहित होऊन ब्रह्मा मध्ये स्थिर झाली असं म्हणतात. बाह्य गोष्टीत सुख
नाही हे जो जाणतो. सुख अंतरीच आहे हे जाणून तो ब्रह्माच्या ठायी एकाग्र होऊन
अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. इंद्रियापासून मिळणा-या सुखाचा शेवट असतो हे तो जाणतो.
त्यामुळे त्यात तो रमत नाही. मरण येण्यापूर्वी इंद्रियांना आवर घालून काम क्रोध
जिंकून काम आणि क्षोभ वृत्तीचा नीरास केला
तर सुखी होतो. अंतरंगात ज्याला सौख्य आणि प्रकाश लाभला त्याला योगी होऊन
ब्रह्म-निर्वाण मिळते. जे काम क्रोध आणि सर्व भौतिक इच्छा पासून मुक्त आहेत.
आत्मसंयमी आणि पूर्णत्वासाठी प्रयास करतात त्यांना भविष्यात ब्रह्म मुक्ती मिळते.
विषयांचा संयम करून दृष्टी दोन्ही भुवयांमध्ये एकाग्र
करून श्वासोश्वास समान ठेवून मन,बुद्धी आणि इंद्रियांना आवरून इच्छा, भय आणि क्रोधापासून
मुक्त होतो. परमेश्वर, यज्ञ, तपाचा भोक्ता आहे. सर्व साधना, कर्म समर्पण करावयाचे. ईश्वराशी
सख्य साधायचे म्हणजेच मित्र, सखा, सोयरा अशी भावना ठेवून साधना केली तर सांसारिक
दु:खापासून शांती प्राप्त होते.
कर्मयोग आणि संन्यास याचा समन्वय करणारा पाचवा अध्याय.
No comments:
Post a Comment