Wednesday, 12 March 2025

अध्याय चौथा ४२ ज्ञानकर्मसंन्यासयोग ( दिव्य ज्ञान ):

 


 

भगवान या अध्यायाची सुरवात करताना म्हणतात   अविनाशी योग, दिव्य ज्ञान मी प्रथम सूर्याला सांगीतले. सूर्याने मनुला सांगीतले त्यांनी इक्ष्वाकुला. अश्या गुरु शिष्य परंपरेद्वारे पुढे प्राप्त झाले. काळाच्या ओघात हि परंपरा खंडित झाली. अर्जुन शंका उपस्थित करतो. सूर्य तुमच्या पेक्षा खूप जेष्ठ आहे. प्रारंभी तुम्ही सूर्याला सांगितल्याचे म्हणता हे कस काय?  भगवान म्हणतात, तुझे आणि माझे या पूर्वी अनेकानेक जन्म झाले आहेत. मला ते सर्व आठवतात तुला आठवत नाहीत.

मी अजन्मा आहे. तरी प्रत्येक युगायुगात मी दिव्य रुपात अवतीर्ण होतो. धर्म गळून पडतो, अधर्म डोके वर काढतो तेव्हा धर्म स्थापण्यासाठी, संताचं रक्षण करण्यासाठी, दुष्कृत्याचा नाश करण्यासाठी मी जन्म घेतो.

साधना करून जे भय, तृष्णा, क्रोध यापासून मुक्त होतात, मा‍झ्या आश्रयाला येऊन सेवेत एकरूप होऊन मला जाणतात त्यांना माझे प्रेम प्राप्त होते. परमेश्वर ज्याच्या त्याच्या आवडीचे फळ त्यांना देत असतो. जसे कर्म करावे तसे फळ मिळणार यालाच  कर्म विपाक म्हणतात. प्रकृतीच्या तीन गुण आणि अनुरूप कर्मांना  अनुसरून चार वर्ण पडतात. जरी हि व्यवस्था झाली तरी मी या सर्वांपासून मुक्त आहे कारण मला फळाची आकांक्षाच नाही.

कर्म म्हणजे काय त्यापासून मुक्त कसं व्हायचे हे जाणून घे.

कर्म म्हणजे बाहेरची स्वधर्माचरणाची स्थूल क्रिया. या बाहेरच्या कर्मात चित्त ओतणे म्हणजेच विकर्म. कर्माबरोबर मनाचा मेळ पाहिजे. हा जो मनाचा मेळ ह्यालाच गीता विकर्म म्हणते. हृदयातील ओलावा जर बाह्य कर्मात नसेल तर ते स्वधर्माचरण शुष्क,कोरडे राहील. कर्माबरोबर विकर्म आले म्हणजे हळूहळू निष्कामता अंगी बाणते. कर्मात विकर्म ओतले म्हणजे कर्म दिव्य दिसू लागते.  कर्मात विकर्म मिळविले तर कितीही कर्म केलं तरी श्रम जाणवत नाही. मन शांत स्थिर आणि तेजोमय राहते. कर्मात विकर्म ओतल्याने ते अकर्म होते. हे जाणणारा बुद्धिमान कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो. हे कोणाला शक्य होते. ज्याचे प्रयत्न इंद्रिय तृप्ती साठी नसतात. ज्ञानी संकल्पजन्य काम सोडून उद्योग करतो आणि ज्ञानाने कर्म जाळतो. नित्य तृप्त, निराधार आणि काम-वासना न ठेवता सतत कामात मग्न राहतो. सर्व इच्छा, व्यर्थ संग्रह सोडून जीवनावश्यक वस्तूंसाठी कर्म करतो. सहजपणे मिळेल त्यात गोडी मानतो.

साधकांसाठी गीतेन  पंच महायज्ञ उपदेशिले आहेत. 

परमेश्वराची जीवनीय द्रव्यांनी पूजा, द्रव्य-यज्ञ देवताराधनरूप यज्ञ.

जप-यज्ञ साधनेचा ध्यास, नामस्मरणाच्या रुपात प्रगट होतो.

तपोयज्ञ इंद्रियांचे विषय तोडून संयम सांधणे.

योग-यज्ञ शुद्ध झालेल्या इंद्रीयांचा उपयोग पारमार्थिक साधनेकडे करून घेणे. 

शेवटी ज्ञान-यज्ञ परमात्मचिंतन यातूनच पुढे आत्मज्ञान होते.

पाच महायज्ञ द्रव्य, जप, तप,योग चिंतन.     प्राणायाम आणि उपवास हे दोन गौण यज्ञ एकूण सात महायज्ञ

दोष निवारणा साठी    अध्ययन, व्रतनिष्ठा, ईश्वरभक्ती शुद्धी प्राप्त करण्यासाठी हि विकर्म आहेत

तिहेरी प्राणायाम १) पूरक – श्वास आत घेणे २) कुंभक – स्थिर ठेवणे ३) रेचक – श्वास बाहेर सोडणे.

चौथा प्राणायाम सांगतात बाह्य-अभ्यंतर- विषयाक्षेपी रस, रूप, गंध हे बाह्य विषय आणि मानसिक वृत्ती म्हणजे आतले विषय या सर्वांचा विक्षेप करणारा,काढून टाकणारा चौथा प्राणायाम. श्वास बाहेर टाकला कि आतले विषय सगळे निघून गेले. मग आत परमेश्वराची स्वच्छ, निर्मळ हवा आली असे म्हणत श्वास आंत घ्यायचा.

प्राणापान म्हणजे  प्राण – बाहेर सोडला जाणारा श्वास , अपान – आत घेतला जाणारा श्वास.

सर्व यज्ञात ज्ञान यज्ञ श्रेष्ठ. सर्व कर्माची पूर्तता ज्ञानात होते. म्हणजेच आत्मज्ञानात. अश्या ज्ञानाने मोहाचा नाश होतो. पापांचा नाश होतो. कर्मांचा नाश होतो. खरं तर अश्या ज्ञानाने, सर्व प्राणिमात्रात साम्य दिसतं आपला आणि परका भाव निघून जातो, मोह दूर होतो. सत्संग सारख्या विकर्माने पापं दूर होतात. कर्माचे विकर्म आणि विकर्माचे  अकर्मात रुपांतर होऊन कर्माच्या कष्टाची जाणीवच राहत नाही.

ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही. कर्मयोगाने युक्त असलेल्याना ज्ञान अंत:करणात स्वयमेव प्राप्त होते.  श्रद्धेने ज्ञान मिळते. ज्याने इंद्रिय संयमित केली आहेत, त्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम शांती लवकरच प्राप्त होते.

ज्याला ज्ञान नाही, श्रद्धा नाही तो संशयी. याला काहीच प्राप्त होण्याचा संभव नाही. काही प्राप्त झालं तरी त्यावर हि संशय घेईल.

अर्जुना, अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत  ते ज्ञानाने दूर कर. योगयुक्त होऊन ऊठ आणि युध्द कर. .

  

No comments:

Post a Comment