Thursday, 13 March 2025

अध्याय चौथा. ज्ञानकर्मसंन्यासयोगः निवडक श्लोक.

 

 


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥

हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.

 परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा । इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥

कर्मांच्या फळांची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही. 

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः । अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥

कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण कर्मांचे तात्त्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे.  

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥

जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहील, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे.

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।  ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥

ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात.

यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः । समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥

जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही.

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन । ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ४-३७ ॥

कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो.

 न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥

या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. 

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥

जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत्प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो.  

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥

अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख.

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ । आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥

हे धनंजया(अर्जुना), ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत.  

 तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः । छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥

म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा, विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा.

No comments:

Post a Comment