Friday, 7 March 2025

अध्याय दुसरा - संकल्पना, विचार मांडणारे निवडक श्लोक.

 




नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।  उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २-१६ ॥

असत्‌ वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्‌ वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्‌ । विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ २-१७ ॥

ज्याने हे सर्व जग-दिसणाऱ्या सर्व वस्तू-व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही.

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥

हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही; कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२॥

ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. 

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।  न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२- २३॥

आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.  

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २-२४ ॥

आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर आणि सनातन आहे.

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।  तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-२७ ॥

 जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही.

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत । अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥२- २८॥

 हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा. 

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥२- ३८॥

 जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥२- ४७॥

तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. 

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥२- ५०॥

समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥२- ५६॥

दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥२- ६३॥

रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.  

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥२- ६९॥

सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. 

No comments:

Post a Comment