अर्जुनाने विचारणा केली
आहे, तुमच्या भक्तीमध्ये जे सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे
अव्यक्त ब्रह्माची उपासना करतात या पैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानतात. म्हणजेच काही
सगुण भक्ती करतात तर काही निर्गुण भक्ती करतात. या दोहोतून कोणता भक्त, देवा तुला
प्रिय आहे?
भगवान म्हणाले जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि श्रद्धेने माझी सतत उपासना करतात ते माझ्या मते सर्वोत्तम होत.
जे सर्व इंद्रियांचे संयमन करून सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, सर्वव्यापी परम सत्याची उपासना करतात ते सर्वाच्या हिताशी संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात.
अव्यक्तोपासना अतिशय कठीण आहे. जे माझे पूजन करतात, सर्व कर्मे मला अर्पण करतात, माझ्या ठिकाणी मन स्थिर करून अनन्यभावाने भक्ती करतात, माझे ध्यान करीत असतात. हे पार्थ , त्याचा मी जन्ममृत्युरुपी संसार सागरातून त्वरित उध्दार करतो.
मन बुद्धी मला अर्पण कर अश्या रीतीने तू नि:संदेह माझ्या मध्येच वास करशील. मन माझ्या ठिकाणी स्थिर करता येत नसेल तर भक्तियोगाच्या तत्त्वांचे पालन कर. अश्या रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा कर.
भक्तियोगाच्या विधीविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर. कर्म केल्याने सिद्धी प्राप्त होईल. माझ्यासाठी कर्म करण्यात असमर्थ असशील तर कर्मफलांचा त्याग करून आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. प्रयत्नाने ज्ञान लाभेल. त्यामुळे गोडी वाढेल आणि तन्मयता होईल. मग पूर्ण फलत्याग साधेल. शीघ्र शांती देईल.
जो कोणाचाच द्वेष करीत नाही, मनात सर्वांविषयी दया, मैत्री जपतो, मी माझे करत नाही, सुख दु:खा मध्ये समभाव राखतो. सदैव तृप्त, आत्मसंयमी, दृढ निश्चयी आणि मन, बुद्धी मला अर्पण करतो तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे.
जो न लोकांस कंटाळे, ज्यास कंटाळती न लोक. जो हर्ष आणि दु:ख, भय आणि चिंता या मध्ये समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे. जो शुध्द, कुशल, चिंतारहित, दु:खमुक्त आणि फलप्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे.
न उल्लासे न संतापे त्याचं काही मागणे नाही, ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे, असा भक्त मला प्रिय आहे.
शत्रू मित्र तसेच मनापमानात समत्व राखतो. शीत-उष्ण, सुख-दु:ख, स्तुति-निंदा या मध्ये समभाव राखतो. सदैव शांत आणि मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो ज्ञानामध्ये स्थित असतो, भक्तीत लीन असतो तो मला अत्यंत प्रिय आहे.
जे या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण
करतात. मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने जोडले जातात ते मला अधिक प्रिय आहेत.
No comments:
Post a Comment