Tuesday, 18 March 2025

अध्याय सातवा ३० ज्ञानविज्ञान योग (भगवद ज्ञान ):

 

 


 

या अध्यायाची सुरवात भगवंत करतात, पार्थ!

माझ्यावरील प्रेम भावनेने योगाभ्यास करत तू मला पूर्णपणे कसा जाणू शकशील हे ऐक.  विज्ञानासह ज्ञान तुला सांगतो त्यानंतर अजून काही जाणून घ्यावं अस वाटणार नाही.

लाखात एखादाच आत्मसाक्षात्कारा साठी झटत असतो त्यापैकी एखादाच मला तत्त्वत: जाणतो. (पंच महाभूतं) पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या आठ भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. ही अपरा प्रकृती.  सर्व जीव सृष्टीने सर्व जग व्यापले ती दुसरी परा प्रकृती. सगळी भुते ह्या दोन प्रकृतीच्या संयोगातून निर्माण झाली आहेत. मी मूळ आहे मी शेवट आहे.

जगात हे जे सर्व आहे ते दोन प्रकृतीपासून निर्माण झाले. ह्या पलीकडे काहीच नाही. ज्या प्रमाणे मणी धाग्यात ओवलेले असतात तसे सारे जगत मा‍झ्यात ओवलेले आहे.

मी पाण्यातील रस  आहे,

चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे,

वैदिक मंत्रामधील कार मी आहे.

आकाशातील शब्द मी आहे,

पुरुषामधील पुरुषार्थ मी आहे.

पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे,

अग्निमधील उष्णता मी आहे.

प्राणि-मात्रात आयुष्य मी आहे,

सर्व तपस्व्याचे तप मी आहे.

सर्व भूतांत बीज-शक्ती मी आहे,

बुध्दिमंतात बुद्धी मी आहे,

तेजस्व्यांत तेज मी. 

वैराग्य-युक्त निष्काम काम कर्म कारणा-या बलवंताचे बळ मी.

धर्मास धरून जी वासना,इच्छा  असते ती मी आहे.

सात्त्विक, राजसिक, तामसिक हे सर्व भाव मा‍झ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात.

 

मी प्राकृतिक गुणांच्या आधीन नाही तेच मा‍झ्या आधीन आहेत. सगळे लोक गुणांत अडकून पडले आहेत त्यामुळे गुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी माया शक्ती अतिशय जटील आहे. जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हीन वृत्तीने, मूढ विचाराने, दुराचारी वर्तनाने माझा आश्रय सोडून आसुरी संपत्तीचा म्हणजेच दंभ, दर्प, अभिमान याचा आश्रय घेतात.

ईश्वराविषयी जिज्ञासा असलेले जिज्ञासू,  विश्वहिताची चिंता करणारा हितार्थी, ईश्वराविषयी  तळमळणारा आर्त , निरंतर चिंतन करून ईश्वराला गाठू पहाणारे ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात. ज्ञानी आत्म्याद्वारे ईश्वराला भजतो, तो ईश्वरात मिसळलेला आहे. त्याला मी प्रिय आहे, मला तो प्रिय आहे. नि:संशय हे सर्व भक्त उदार आहेत. परंतु मा‍झ्या ज्ञानामध्ये जो स्थित झाला आहे, त्याला मी मा‍झ्या स्वत:प्रमाणेच मानतो. तो सर्वोच आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. अनेक जन्म आणि मृत्युनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो सर्व गोष्टीचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो.

 

ईश्वराच्या नावानेही जो सकाम उपासना करतो तो  वस्तुत: देवतोपासकच आहे. परमेश्वर ज्याची जी श्रद्धा ती दृढ करीत असतो. त्यामुळे त्या त्या जीवाच्या विकासाला वाव मिळतो. देवतोपासक समजतो की फळ त्याला त्याच्या त्या देवतेने दिले. फल दातृत्व शक्ती ईश्वराशिवाय अन्यत्र असूच शकत नाही. अन्य देवतांची उपासना करतात त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. माझे भक्त माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. मला पूर्णपणे न जाणणा-या अल्पबुध्दी लोकांना वाटते की मी पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. अज्ञानी लोकांना  माझी जाणीव होत नाही, त्यांना कळत नाही कि मला जन्म ,मृत्यू नाही.

हे अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेलं, वर्तमान काळात घडत असलेलं, भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणीत नाही. इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत, ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरुपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. जरा-मरणापासून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत, ते माझ्या भक्ती द्वारे माझा आश्रय घेतात. त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. पूर्णपणे मत्परायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञाचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्युसमयी सुध्दा मला जाणू शकतात. साकार सृष्टी, सृष्टीची वाढ करणारं चैतन्य, जीव आणि निरहंकारी पुरुष ही तिन्ही मिळून सृष्टी बनते. या तिन्ही मध्ये भगवंताला पाहायचा अभ्यास करील तो अंतकाळी सावध राहील.

No comments:

Post a Comment